कोकण गोवा भ्रमंती सावंतवाडी



कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 
          सावंतवाडी 
दिनांक ७ मार्च २०२१
क्रमशः भाग-४
   स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळातील छोटेखानी संस्थान सावंतवाडी होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी चढाई करून दुसरा खेम सावंत आणि लखम सावंत या दोघांचा दारुण पराभव केल्यानंतर ते पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले होते.
तदनंतर महाराजांशी पाचकलमी तह केला होता. स्वराज्याची सेवा फौजेनिशी करण्याचे कबूल केले होते.तदनंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील हे संस्थान देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात विलीन झाले होते.येथील राजवाडाही प्रेक्षणिय आहे.
     सुंदरवाडीची तदनंतर सावंतवाडी झाली.शहराच्या सभोवती दाट झाडी असून मध्यभागी आखीवरेखीव बांधीव मोती तलाव आहे.शहर वाशियांना फिरायला सभोवती पदपाथ आहे.सभोवती रस्ताहीआहे.
त्यावरुनही गाडीतून ही फेरफटका मारायला मजा वाटते.एका बाजूला तलावावर ऋषितुल्य कविवर्य "केशवसुत कट्टा " नगरपरिषदेने बांधला असून तिथं कविवर्य केशवसुत आणि कविवर्य वसंत सावंत यांच्या रसिक मनावर आरुढ झालेल्या गाजलेल्या कविता संगमरवरात रेखाटल्या आहेत. बसायला बाकांची सोय आहे.
कविवर्य केशवसुत आणि इतर नामांकित कविंनी इथं अनेकदा काव्य वाचन केलं होतं.त्यांच्या स्मृतींचा ठेवा जपायला कट्टा बांधलाअसून तिथं कविवर्य केशवसुतांची गाजलेली कविता
            तुतारी 
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने | 
रेखाटली असून तुतारीचे प्रतिकात्मक शिल्पही उभारले आहे. ही नगरी स्वातंत्र्यसेनानी , नामवंत लेखक, कवी,अभिनेते आणि खेळणी उद्योजक आहे.येथील कट्टयावर थोडावेळ शांतपणे बसून केशवसुतांची तुतारी कविता वाचन करून त्यांच्या साहित्याला विनम्रतेने प्रणाम करून तुतारीला अभिवादन केले. यापूर्वीचा माझा या शहराचा पर्यटनपट माझ्यासमोर तराळला. इयत्ता चौथीच्या भुगोलातील महाराष्ट्रातील शहरे व प्रसिध्दीची या पाठाची आठवण आली. सौ प्रभावती कारंजकर बाईंनी याची तरंगचित्रे केली होती. हा पाठ शिकवून झाल्यावर प्रत्येकाला शहरे-प्रसिध्दी पाठांतर करायला सांगायच्या ,त्यामुळे लाकडी खेळणी- सावंतवाडीची प्रसिध्द होती हे पक्क लक्षात राहिलेलं. हस्त कलेला जागतिक स्तरावर प्रसिध्दी मिळालेलं शहर बघायला रत्नागिरी येथे अधिवेशन असताना सन १९९१ ला आलो होतो ,त्यावेळी मुलांना खेळण्यासाठी टांगा घेतला होता.तर मित्रांसमवेत आलो होतो तेंव्हा लाकडी भरणी आणि विदुषक खेळणं घेतलं होतं ,त्याचवेळी गोव्याहून परतताना मोती तलाव्याच्या जवळील हाॅटेल गॅलेक्सी मध्ये दुपारचे मालवणी सामिष जेवण केले होते.तर तीन वर्षांपूर्वी आलो होतो तेंव्हा मोती तलावाभोवती फेरफटका मारून फोटोग्राफी केली होती. हातगाडी वरील वडापावची चव चाखली होती.तेंव्हा त्या गाड्याभोवती खवय्यांची वडापावसाठी झुंबड उडाली होती.असे अनेक प्रसंग नजरेसमोर आले. क्षणभर देहभान हरपले.तंद्रीतून बाहेर पडलो आणि गोव्याला जायला आठवणींची फोटो टिपून हायवेला मार्गस्थ झालो.

क्रमशः भाग-४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड