कोकण गोवा भ्रमंती सिंधुदुर्ग मालवण





कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 
  मालवण चौपाटी पर्यटन 
 दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१३
        सांजवेळच्या रम्य माहोलात आम्ही मालवणच्या मनमोहक किनारी पोहोचलो.मासळी बाजराचे दृश्य दृष्टीला पडले.तिथं खासियत असणारी मासळी पर्यटक खरेदी करतहोते.विशेषत:सुरमई,पापलेट,झिंगे आणि कोळंबी प्रकारचे मासे सर्वत्र दिसत होते.उत्साही खवय्ये मासळी कापून कशी स्वच्छ करतात हे निरखून बघत होते.मोठ्या बोटींतील मासळी किनाऱ्यावर आणायला छोट्या बोटींचे नावाडी आतुरतेने वाट बघत होते.छोट्या मोठ्या बोटींची शिडं फडकतानाचे दृश्य मनाला भुरळ घालत होते.पलीकडे हौशी पर्यटक वॉटर स्पोर्टसचे खेळखेळण्यात रममाण झाले होते.
    सांजच्या दिवाकाराचे दृश्य मस्तच दिसत होते.ते टिपण्यात मश्गुल झालो होतो.अस्ताला जाणाऱ्या सूर्याने मुक्तपणे गुलालाची उधळण केली होती.
रंगछटेत ढग माखले होते.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारश्याचा आणि दर्यावरील पराक्रमाचा साक्षीदार देणारा जलदुर्ग" सिंधुदुर्ग किल्ला" त्याच्या निसर्ग सौंदर्यात बोटींची सजावट उठावदार दिसत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली मालवण भूमी आणि मालवणच्या सागरातील शिवलंका म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला बघण्याच भाग्य मिळणे म्हणजे जणू पर्वणी असते.तीन वर्षांपूर्वी सहकुटुंब या दुर्गावर भ्रमंती केल्याची आठवण आली.समोरच्या  किल्ल्यातील वैभवशाली ठेवा डोळ्यासमोर असा ठाकला.दक्षिण कोकणातील जंजिरा असलेला हा दुर्ग दर्यावरील पोर्तुगीज,डच आणि इंग्रजांच्यावर वचक रहावा ,जरब बसावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने कुरटे बेटावरील काळ्याभिन्न अभेद्य खडकावर हा किल्ला सन १६६४ साली बांधला. हा दुर्ग आरमाराचे प्रमुख केंद्र होते.दुर्गभ्रमंतीला दर्यात बोटीनं २ किलोमीटर अंतर कापत जावे लागते.किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे.पुढं गेल्यावर मारुतीचे छोटेसे मंदिर आहे.तेथूनच बुरूजावर जाण्याचा मार्ग आहे.आवश्यक ठिकाणी टेहळणीसाठी बुरुज बांधले असून, किल्ल्यामध्ये पोहचल्यावर किल्ल्याचे वैशिष्ठ्येपूर्ण बांधकाम लक्ष वेधून घेते.
दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे चुन्यात उमटलेले ठसे आहेत. हे ठसे संरक्षित करून जपून ठेवलेले आहेत. सुमारे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे व हाताचे ठसे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. हे ठसे छोटी घुमट उभारून त्यात जतन करून ठेवलेले आहेत.या किल्ल्याच्या तटबंदी वरुन सहज फेरफटका मारता येतो.
    बंदुकांतून शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी तटाला छिद्रं आहेत.तिथं दही बाव,दुधबाव व साखरबा या नावाच्या तीन गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत.
किल्ल्याच्या सभोवती तटबंदी आहे.या तटाची पायाभरणी महाराजांच्या हस्ते झाली होती.या तटबंदीवरुन दर्याची विशालता भव्यता मनात रुंजी घालते.इथं शिवराजेश्वरांचे देवालय असून मंडपात महाराजांची आसनस्थमुर्ती आहे.अशा वास्तुंना भेट दिली की गौरवशाली इतिहासाने आपण भारावून जातो.छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी,या जयघोषणेने अभिमान वाटतो.चैतन्य सळसळून स्फुर्ती मिळते.मालवण पर्यटनाला हौशी आणि गडभ्रमंतीची आवड असणारे पर्यटक आवर्जून भेट देतात.कारण इथल्या दर्याचं क्षितीजापर्यंत दिसणारे  सौंदर्य मनाला भुरळ घालते.आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक सिंधदुर्ग किल्ला,नितळ स्वच्छ आणि रमणीय किनारे तारकर्ली,देवबाग,वायरी जवळच आहेत.अनेकविध समुद्रातील रॉक आणि बेट बघायला मिळतात. मालवण किनाऱ्याजवळ समुद्रातील जैवविविधताही प्रेक्षणिय आहे.तसेच अस्सल मालवणी पद्धतीचे अनेक चमचमीत आणि चटकदार मस्याहारी मेनू खवय्येगिरीची फरमाईश पूर्ण करतात.त्यामुळे पर्यटक मालवणलाच पसंती दर्शवितात.मालवणच्या किनाऱ्यावरील सूर्यास्ताचा मनमोहक नजरा मनात साठवून आम्ही सागरी मार्गाने कुणकेश्वर मंदिराकडे कूच केले.
क्रमशः भाग-१३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड