माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१५३





माझी भटकंती कोंढावळे मुऱ्हा भाग क्रमांक १५३
कोंढावळे मुरा …
एक सकाळ जंगलातली 
क्रमशः भाग-८
दिनांक-२० फेब्रुवारी २०२१
    सकाळी रामप्रहरी जाग आली.शहरातल्या वाहनांच्या गोंगाटापासून,रेडिओ अन्  टिव्हीवरील कार्यक्रमाच्या कोलाहलापासून आज अलिप्तता होती.पक्ष्यांचे पाखरांचे नैसर्गिक आवाज,गोठ्यातल्या वासरांचे आणि शेजारच्या घराकडच्या खुराड्यातल्या कोंबड्यांचे आरव ऐकत अंगणात आलो.
वाऱ्यानं केळीच्या पानांची सळसळ ऐकत चौहीकडे नजर फिरवलीतांबडा अन् भगवा रंग पुर्वेला आकाशी दिसत होता.थोड्याच वेळात लालबुंद सूर्यनारायणाचा तेजोमय गोळा पाहून नेत्र तृप्त झाले.उगवत्या सूर्याला नमस्कार केला.नित्यकर्मे उरकून सकाळी सकाळी माडगणीचा कडा उतरून पायउतार होण्याची सूचना अनिकेत करुन आपल्या सोबत खाली आई येत असल्याची वर्दी दिली.त्यामुळे परतीचा मनसुबा गणेशवाडी कडे न जाता पाटीलवाडी व्हाया माडगणी करून आल्यापावली आम्ही तिघे खाली उतरायला तयार झालो.
    शेतकऱ्याची खरी श्रीमंती त्याच्या दातृत्वात असते याची प्रचिती मला अनेकवेळा आली आहे.जसं माहेराला आलेल्या माहेरवाशिणीला 'वानोळा' म्हणून काहीतरी देतातच्,तसं मला त्यांनी शेतातला ताजा ताजा हरभरा,घेवडा व पावट्याच्या शेंगा आणि चिवचिवची फळं इत्यादी भाज्यांनी भरलेली पिशवी दिली, तीचं ओझं अनिकेतने हातात घेतलं.आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.मला सुखरुप शाळेत पोहचविण्याची काळजी दोघांनी घेतली होती.
पाल्यापाचोळ्याची वाट तुडवत आम्ही फर्लांगभर अंतर पार केलं, सकाळच्या पिवळ्या धम्मक ऊन्हात कमळगड आणि नवरानवरीचा डोंगर ठळकपणे दृष्टीस पडला.काल ढगाळ हवामानामुळे धूसर दिसणारा कमळगड आज प्रत्यक्ष कड्यावरुन पाहताना फारच आनंद झाला.
   कड्या जवळच म्हशी चरत होत्या ते पाहून अनिकेत म्हणाला,'सर,तिथं कोण दिसतयं वळाखला का?'मी तिकडं बघताच मान हलवून नकार दर्शविला.तेव्हा तो म्हणाला,'सर तो किसना हाय' मग त्याच्याकडे बारकाईने बघितले कानटोपी आणि स्वेटर घातलेला हातात काठी घेतलेला किसन आज गुराखी झाला होता.तिथूनच तो ओरडला,'सर निघाला व्हय,परत या फिराय' मी ही जोरात होय म्हणून पुढं चालू लागलो.आता कातळाची वाट आली होती.कालच्या तंगडतोडीमुळे उजवापाय उतरताना ठणकत होता.सावकाशपणे काठीवर भार टाकत मार्गक्रमण करत करत माडगणीचा कडा उतरत होतो.माझा मोबाईल बंद असल्याने अनिकेत त्याच्या मोबाईल कॅमेऱ्याने वेचक वेधक दृश्ये चित्रित करीत होता.माझेही फोटो आणि सेल्फिबध्द करत होता.कडा उतारताना अप्रतिम शूट केले.माडगणीची लोकं मध ,लाकूडफाटा आणि जोरखोऱ्यातील पाहुण्यांकडे याच वाटेने सतत जात असल्याने त्यांचा तो पायवाटेच्या हायवेच होता.
   जागोजागी पायऱ्यांची डागडुजी केलेली दिसत होती.कातळवाटेच्या एकीकडे अभेद्य कडा तर दुसरीकडे उभी शिळा होती.त्यातील कातळ वाटेने खाली उतरलो.भेटूया उद्या माडगणीच्या पाड्यावर....

क्रमशः भाग-८
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड