माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१५२
माझी भटकंती भाग क्रमांक-१५२
कोंढावळे मुरा
एक रात जंगल वस्तीत
क्रमशः भाग-७
थोड्यावेळाने तिन्हीसांजेला काशिनाथच्या घरी पोहोचलो.लगेच त्याला रानातनं घरुन आलेली गुरं घरातल्या दावणीला बांधण्याचं काम लागलं.आज बऱ्याच वर्षांनी जंगलातल्या सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन झाले.आता थंडीची जाणीव होत होती.काळोख पडताच अंगणातल्या सोलरदिव्याचे एलएडी दिवे पेटले.त्याचा मंद प्रकाश पडला होता.
भटकंतीला येणाऱ्या पर्यटकांनी सामाजिक बांधिलकीचा प्रकाश सोलरकिट दिवा देवून घर आणि अंगण प्रकाशाने उजळवले होते.
भटकंतीला येणाऱ्या पर्यटकांनी सोलरकीट दिल्याचे काशिनाथच्या वडिलांनी सांगितले.
ओटीवरच्या चुलीजवळ टाकलेल्या घोंगडीवर बसलो.मस्तपैकी शेकोटी पेटवली होती.
त्याच्या धगीने आणि हात शेकण्याने ऊब मिळत होती.अशी ऊब मिळवायला दोन्ही कुत्र्याची पिल्लं आणि मांजर माझ्या पुढयात येऊन चुलीच्या जवळ जात होते.घरातल्या पडवीत बैलं,गायी आणि वासरं असं गोकुळच होतं.'तीन चार गायींच्या धारा काढाय लागत्यात ,त्याचे वडील बोलले.तेवढ्यात बॅटरी आणि मोबाईल घेऊन अनिकेत आला.
अधूनमधून प्रश्र्नोत्तरांसारख्या आमच्या शेती, भटकंती ,श्वापदांच्या थरारक कथा आणि शाळा याविषयी गप्पा चालल्या होत्या.माझ्या फोनची रिंग वाजली आवाजाचा एकमेकांना समजावा म्हणून मी घराबाहेर पडताना दारावर माझं डोकं आदळलं, थोड्याशा झिणझिण्या आल्या. दरवाज्याची उंची कमी होती हे गडबडीत लक्षात आलं नाही.अंगणात प्रकाश सर्वत्र असणाऱ्या काळोखात पिठूर चांदणं फुलल्याचं दिसत होतं.जाधव सरांशी मोबाईलवरून बोलताना दातांचा आवाज होऊन हुडहुडी भरल्यासारखं झालं.अंगात जर्किन असूनसुद्धा वाहणाऱ्या वारं अंगाला चांगलंच झोंबल,हाताचे तळवेसुध्दा गारठले.अगदी कसतरी बोलून पळतच घराकडे दरवाजातून नतमस्तक होऊन गेलो.चुलीतल्या आगीची धग लागताच पूर्वस्थितीवर आलो.
अनिकेतच्या मोबाईलवरील कीर्तन व गाणी ऐकत शेकत होतो.गायींच्या धारा काढून झाल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो.पाहुणचार आदरातिथ्याने करत होते.मस्तपैकी पावट्याची भाजी, आमटी,
चपाती ,भाकरी ,दही भात असा रुचकर चुलीवरच्या बेत होता.मस्तपैकी जेवण झाले.आज दिवसभर भ्रमंतीने शतपावली न करताच बिछान्यावर पहुडलो.बॅटरी डाउनमुळे मोबाईल निपचित पडला होता.एरवी टि.व्ही.चा कार्यक्रम पहात ऐकत अथवा हातात येईलत्या पुस्तकांची पानचाळत नाहीतर फेसबुकवरील लेख वाचत निद्रेची वाट पहावी लागायची. पण आज अड्याकडे बघत ,अधूनमधून इकडं तिकडं फिरणारी पिल्ल नजरेत घेत.
गुरांची रवंथ होताना हलणाऱ्या तोंडाकडे बघत,मान हालविल्याने गळ्यातील घंटीचा आवाज ऐकत आणि अंधारात चकाकणारे डोळे बघत मनात विचारांची रवंथ चालली होती.आज सकाळपासून इथपर्यंत घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटना प्रसंगाची रवंथ चालली होती.
सकारात्मक घटना मनाच्या कप्प्यात साठवून नकारात्मक घटनाप्रसंग तत्काळ हटवून टाकत होतो.आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करुन दुर्ग गडवाटेतील पाडा,वाडीवस्तीवर आपलेच बांधव दुर्गम अशा जंगलझाडोरा आणि श्वापदांची तमा नबाळगता कशी राहतात 'याची डोळा यांचे देही ' अनुभूती मिळाली.एक दिवस भटकताना निसर्ग आपणाला मनमोहक दिसतो,पण याच परिसरात नेहमी राहणाऱ्यांचे कसं जगणं घडतं हे भेटीनं समजलं.अशा ठिकाणी कोणतीही साधनसुचिता आणि रस्ते नसताना दुर्गम, दुर्लक्षित क्षेत्री राहणाऱ्यांना मानाचा सलाम! आजची शिवजयंती मनाच्या कोंदणात दरवर्षी डोळ्यांसमोर येवून पायी भ्रमंतीची आठवण करून देत राहिल.तोंडाशी पिल्लं आणि पायाशी बसलेल्या कुत्र्याच्या साथीत कधी झोपी गेलो हे समजलेच नाही.शुभ रात्री
क्रमशः भाग-७
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment