माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१५४
माझी भटकंती कोंढावळे मुरा
भाग क्रमांक-१५४
कोंढावळे मुऱ्हा .
माडगणी आदिवासी पाडा आणि उत्तरार्ध
क्रमशः भाग क्रमांक-९
दिनांक २० फेब्रुवारी २०२१
समोरच धरणाचा जलाशय,कड्याखाली माडगणीची वीस पंचवीस घरं दाटीवाटीने झाडांच्या सानिध्यात दिसत होती.एका बाजूला हिरवट रंगाची पत्र्याची इमारत प्राथमिक शाळेची ठळकपणे दृष्टीस पडली. पायथ्याला तुपेवाडीची तांबट आळी आणि हिरवंपिवळं शिवार नजरेला पडत होतं. अनिकेतने ओळखीच्या ठिकाणी घरासमोरील मेंढरा़च्या समवेत माझा फोटो काढला.आमच्यातील बोलण्याने त्याच्या काही मित्रांनी हाळी मारली.अनिकेत रेणावळ्याला लवकर निघालोय,तिथल्या टूर्नामेंट खेळायला जायचयं.येतोस काय?त्याने मी ही खालीच निघालोय,नंतर सांगतो मी असा म्हणून घरात दोस्ताकडे गेला.मी पायात बूट होते म्हणून बाहेरचं बसलो.नंतर चहा पिताना आत गेलो, चहाऐवजी दुधाचा ग्लास हातात मिळाला.दुध रिचवताना इतरांशी ओळख झाली,कोंढावळ्याची गुरुजी अशी ओळख झाल्यावर त्यांनीही बोलायला सुरुवात केली.
जर्सी, टॅकसूट आणि कॅप घातलेली चारपाच खेळाडू बघितल्यावर तर क्रिकेट फिव्हर चांगलाच दुर्गम भागातील तरुणाईत कमालीची पाहून मनस्वी आनंद झाला.मॅच खेळायला शुभेच्छा दिल्या! कुतूहलाने त्या मुलांकडे चौकशी केली , तुम्ही कधी सामने भरविलेत काय?तर लगेच होकार दिला,'सर चार-पाच दिवसांनी आमच्या इथंही सामने हाफपीच सामने असून पाच हजारांचे पहिले प्राईज आहे.तुम्ही या बघायला.. भारताच्या राष्ट्रीय खेळ हॉकी पेक्षा जनमाणसामध्ये सवंग लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असणारा क्रिकेट खेळ किती रुजलाय याची प्रचिती आली.येथील सर्व खेड्यांची नाळ मुंबई नगरीशी पहिल्यापासूनच जोडलेली असल्याने गावाकडे ही गावोगावी क्रिकेटचे सामने भरविले जातात.
तोच त्यांच्या दृष्टीने "वल्डकप". एकमेकांना हाका देत आठ-दहा जणं खेळायला भराभरा निघाले.
शाळेच्याजवळ उभं राहून फोटोग्राफी करायला निघालो तेवढ्यात बाजूच्या घरातून अनिकेतला हाक मारली, त्यामुळे तो घरात गेला आणि हातात चहाचा कप घेऊन आला.तिथचं दगडावर बसून चहा पीत असताना समोर लक्ष वेधले.भल्या मोठ्या दगडावर आणि झाडांच्या फांद्यांवर गुरांसाठी चारा रचून ठेवला होता.छानच गवताचं बुचाडं (गंजी )दिसत होत्या.
शाळेजवळ फोटोग्राफी करुन आता तिघेजण कड्याखालून उत्तरेला टोंगेकडे निघालो.वस्तीच्या नाचणी आणि वरीची छोटी छोटी उतरती खाचरं दिसत होती.ऊन्हाची जाणीव होऊ लागली.घामाच्या धारा वाढायला लागल्या.तसंच पुढं वीस एक मिनीटांनी टोंगवर पोहोचलो.
सकाळी लाकडाचा भारा खाली विकायला घेऊन गेलेल्या महिला आणि मुली डोक्यावर अंदाजे पाच-दहा किलोचे कसलेतरीओझं घेऊन येताना आम्हाला आडव्या आलेल्या.त्या दोघांच्या ओळखीच्या होत्या,' काय घेऊन निघालाय ?' अनिकेतने त्यांना विचारले.
एकदोघीने मीठ आणल्याचे सांगितले.टोंगवरुन आता कोंढावळे पाटीलवाडी आणि रायरेश्वर केंजळगड दृष्टिस पडले. वाटेने चालताना अनिकेत ने एक-दोन वेळा आईला ,रेणावळ्याला खेळायला जावू का? म्हणून विचारले.शेतीच्या कामाची लगबग आणि धांदल असल्याने नकार दिला, कामं झाल्यावर खेळं असंही सांगितलं.वाशिवलीचा डोंगराच्या पायथ्याने किरोंडेकडे जाणारी डांबरी सडक चांगलीच चकाकत होती.
ठणकणाऱ्या पायांकडे डोळेझाक करत हळूहळू काठी टेकत उतरत शाळेजवळ आलो.शाळाआल्यावरच मला अनिकेत ने भाज्यांची पिशवी भेट दिली. त्या दोघांचे मनपुर्वक आभार मानले.प्रथम निपचित पडलेला मोबाईल चार्जिंगलागोपीच्या दुकानात लावून शाळेत आलो. शांतपणे खुर्चीत बसलो.बऱ्याच दिवसांची कोंढावळे मुऱ्हाभेट संपन्न झाली होती.खुर्चीतून समोरच दिसणारा गणेशवाडीवरचा कडा मात्र मला विचारत होता,'मनाशी ठरवलेली भेटीची ओढ कधी संपन्न करणार ?'जंगलव्याप्त परिसरातील वस्तीची भटकंती सफल झाली…समाप्त
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
मस्तच
ReplyDelete