कोंढावळे मुरा भाग क्रमांक १४९
कोंढावळे मुरा
डोंगर पठारावरील वनराई व वस्ती
दिनांक १९फेब्रुवारी २०२१
क्रमशः भाग-४
पालापाचोळ्यातील मळलेली लालसर मातीतली पायवाट तुडवत आम्ही पुढे निघालो होतो.सगळीकडे घनदाटझाडी ,त्यातील जाळीदार उंचच उंच वाढलेल्या वेली,शेवाळलेल्या झाडांच्या फांद्या आणि बेफाम करणारं वारं अंगावर घेत आम्ही तंगडतोड करत होतो.साधारणपणे दहा वाजल्यापासून आमची भटकंती सुरू होती.जेवणाचे बारा वाजून गेले होते.भुकेची चाहूल लागली होती.पण निसर्गरम्य परिसरात झाडवेली आणि अनवट पाखरं बघताना तहानभूक हरली होती.वाटेतल्या वेलींची आकर्षक नक्षी,झाडांचे मुक्त आकार,मुंग्यांचे मेणामातीचे वाटोळे झाडावरचं घर,मव्हाचे कांदे आणि मध साठविण्यासाठी जंगलातल्या खोडात ठेवलेल्या पेट्या इत्यादी बघत चाललो होतो.झाडावरुन उड्या मारत आमचे दोन वाटाडे मजा करत होते.सुमारे अर्धा तास पाचोळ्याची वाट तुडवल्यावर थोड्यावेळात दोन घरे आणि शेती दृष्टिक्षेपात आली.आमची चाहूल घेऊन कुत्रं भुंकत काशिनाथच्या जवळ येऊन पायाशी खेळू लागलो.त्याच्या पाठी कुत्र्याची दोन पिल्लं धावत आली.त्यांना काशिनाथने उचलून घेतले. ही जंगलवाट अशीच पुढे जोर गावाकडे, कोळेश्वर पठारावरील मंदिराकडे आणि किरोंडे आणि जांभळी येथील कड्यावरील पठाराकडे जातंअसल्याची माहिती काशिनाथने दिली.लाकडाचा सरकता अडसर बाजूला करून शेणानं सारवलेल्या अंगणात आलो.
रथसप्तमी सणाला सूर्यप्रतिमा रांगोळीने रेखाटून सूर्य उगवताना पेटत्या शेणकुटावर गुंडगीत दुध उकळून ऊतू घालवायचे आणि नैवेद्य अर्पण केल्याचे ठळकपणे दिसले.अंगणातच केळीच्या बागा आणि चिवचिव फळांच्या वेलीने आमचे स्वागत केले.
अंगणातच घोंगड्यावर बैठक मांडली.काशिनाथच्या वडिलांनी नमस्कार घालून, त्यांच्या घरच्या मंदिराकडे घेऊन जायला अनिकेतला सांगितले.अनिकेत काशिनाथचा थोरला भाऊ त्याच्या बरोबर शेतातल्या वाटेने मंदिराकडे निघालो.परिघाभोवती घनदाट झाडी आणि आत वनशेती, देऊळ आणि घर होते.जणू काही देवाची देवराईच सभोवती.यापुर्वी छोटेखानी असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे दिसून आले.त्रिकोणी उतरतं कौलारु छप्पर त्यावर कळस आणि आतील गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावे लागले. थंडगार आणि आल्हाददायक वातावरण आतील.तिथं माती व वाळूचे शिवलिंग आहे.
शांतपणे थोडावेळ विसावलो.आता भुकेची जाणीव झाली होती.
फिरुन परतताना हरबऱ्याचे घाटे टपोरे भरलेले पाहून तोंडाला पाणी सुटले.दोन तीन डहाळे उपटून तिथचं हिरवे हरभरे खायला सुरुवात केली.काशिनाथ आणि किसन जवळील जामच्या झाडावर चढून जाम शोधू लागले.अनिकेतशी गप्पा मारत हरभरा खाणं सुरू होतं.त्याने मग कोळेश्वर मंदिर ,जोरची वाट भैरीची घुमटी आणि तिथून दिसणारा घाटमार्ग आणि कोकणचा भाग कसा आहे याची माहिती सांगत होता.
काशिनाथने हिरव्यागार बोराच्या आकाराची फळं हातावर ठेवली.ती खाताना गोड आणि सफरचंदाचा स्वाद लागत होता.जेवण तयार झाल्याची हाळी ताईंनी दिली.त्यावेळी अनोळखी बायामाणसं डोक्यावर आणि पाठीवर सामानाची पिशवी व हातात काठ्या घेऊन त्याच्या घरापुढे पाणी पिण्यासाठी थांबलेले दिसले.एकाने भरभर येऊन हरभऱ्याचे डहाळे उपटले आणि ते पाणी पिऊन पश्चिमेला निघाले.ते पाहून अनिकेत म्हणाला,सर ती माणसं जंगलातल्या वाटेने जोरवाडी निघाली आहेत.
जंगलातुन पुढं कडा उतरून खाली जाणार..
क्रमशः भाग-४
माझी भटकंती भाग क्रमांक-१४९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment