कोकण गोवा भ्रमंती कुणकेश्वर,देवगड




कोकण गोवा निसर्ग भ्रमंती,खाद्यसंस्कृती कुणकेश्वर,देवगड पर्यटन 
 दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१५
 साधारणपणे रात्रीच्या आठच्या दरम्यान आमची सवारी काळोखात कुणकेश्वर कडे निघाली.गुगल मॅपच्या भरवशावर आणि वाटेतल्या दिशा दर्शक बोर्ड वाचून आमचा प्रवास चालला होता.गाव आल्याचं दिसताच नाव काय असेल ते दुकानाच्या पाट्या आणि नावाचा फलक बघताना आढळतं.लांबूनच "मिठबाव" नावाची पाटी दिसताच गाडी साइडला हळू घ्यायला लावून गावाच्या नावाच्या फलकाचा फोटो काढला.तेव्हा ध्यानात आलं की झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालवणी बोलीभाषेतील मालिका "गाव गाता गजाली" या मालिकेतील चित्रीत स्थळ असणारं गाव.पुढं वाटेतील एकाला विचारुन रस्ता बरोबर असल्याची खात्री केली.
सारथी गाडी चांगलाच दामटवित होता.सपाट भागात चांगलाच वेग वाढला होता.पुढं राईट घेऊन गाडी उताराला लागली होती.समोरच कुणकेश्वर मंदिराची नेत्रदीपक रोषणाईत सजलेली आरास आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खांबावरील दिव्यांची ओळ नजरेस पडली.समुद्र किनाऱ्यावर अंधूकसा प्रकाश दिव्यांचा दिसत होता.एव्हाना नऊ वाजले होते.मंदिराजवळ पोहोचताच लगबगीने प्रवेशमार्ग बघत होतो.तेव्हा पूजासाहित्य भांडाराची आवराआवरी करणारे विक्रेते म्हणाले,'मंदिर बंद झाले आहे.सकाळी सात वाजता सुरू होईल,सकाळी या.गाडीच्या दुरुस्तीसाठी विलंब झालेने,वेळेत पोहोचलो नाही.त्यामुळे बाहेरूनच श्रीशंभो महादेवाला मनोभावे नमस्कार केला.     
     कुणकेश्वर मंदिर दर्याकिनारी उंचवटयावर उभारले आहे.मंदिराचा इतिहास प्राचीन व रहस्यमय आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपतीशिवाजी महाराजांनी केला होता.देवाच्या नावावरुन गावाचे नांव कुणकेश्वर पडले आहे.कोकण भूमीतील पवित्र धार्मिक तिर्थक्षेत्र दक्षिण काशीम्हणून प्रसिद्ध आहे.कणकेच्या राईत वसलेला, कणकेच्या बनातला ईश्र्वर तो कुणकेश्वर. शांततेत तिथं फक्त किनाऱ्यावरील दगडांवर फुटणाऱ्या लाटांची गाज कानात घुमत होती.कलात्मक मंदिर आहे.तदनंतर
देवगडला मुक्कामी निघालो.
    पुढं गावाजवळ डावीकडे वळण्याऐवजी बोलण्यात व्यस्त असताना उजवीकडे वळून निर्वहान रस्त्यावर बुंगाट गाडी संकेतने  पळविली.आपण परत त्याच रस्त्यानी निघालोय चालकाला एक-दोन वेळा बोललो.
मिठबाव पर्यंत परत आलो तिथं रस्त्याच्या कडेला मोबाईलच्या तंद्रीत असणाऱ्या तरुणांना देवगडचा मार्ग विचारला.त्यातील एकाने,'मंदिरापासून रस्ता आहे,परत माघारी जावा.'अन् गुगलतर २४ किमीवरील वेगळाच मार्ग दाखवत होता.मग गाडी वळवून पुन्हा मंदिरा जवळ आलो एक दोघांना देवगडचा रस्ता विचारला,
एकाने पाहुणा आहे दुसऱ्याला विचारा असं सांगितलं,
तदनंतर गाडी थांबवून पुढं एका तरुणाला विचारले त्याने दोन मार्ग सांगितले,जवळचा मार्ग मंदिरापासून किनाऱ्याने जातो,पण तो चालू नाही,तुम्ही डावीकडून लांबच्या मार्गानेजावा.अनवट ठिकाणी कुणावर विश्वास ठेवावा असं वाटलं.त्यानेच दुसऱ्याला मोठ्या आवाजात हाक मारुन विचारले ,'की देवळाजवळून देवगड रस्ता चालू झालाय का ?'त्याने सांगितले,'हो'.मग आम्ही पुन्हा एक-दोन वेळा विचारत विचारत अंधाऱ्या रस्त्याने सावकाश निघालो.खरचं रस्त्याचे रुंदीकरण नुकतेच झालेले दिसत होते.एका बाजूला टेकडी अन् दुसऱ्या बाजूला सागरकिनारा अतिशय जवळ दिसत होता. पुढं एके ठिकाणी रस्ता दगडा मातीचा लालभडक आढळला तर पुढे खाडीवरील पुल ओलांडून देवगडला पोहोचलो.स्टॅण्डकडे जायला वळलो ते पुढं बंद असलेल्या कॉलनीतल्या रस्त्याला गेलो.एका दुचाकी वरून उलट दिशेने जाणाऱ्याला स्टॅण्डरस्ता विचारल्यावर तो म्हणाला,माझ्या मागोमाग या मी त्याच बाजूला निघालोय.रिव्हर्स टाकून गाडी त्याच्या मागोमाग घेतली.पाचेक मिनीटानंतर, त्याने थांबून सरळ जावा,पुढं स्टॅण्ड आहे.असं सांगितले,त्यालाही धन्यवाद दिले.मग आम्ही सरळ पुढे जाऊन जेवणासाठी बसस्थानकासमोरील हॉटेल संतोषी जवळ आलो.दहा वाजून गेले होते.काउंटरवर जेवण मिळेल काय याची चौकशी केली.होकार येताच आत गेलो.
मस्तपैकी कोळंबी थाळी आणि शाकाहारी भोजनविथ आमरस अशाथाळ्या मागविल्या.कोकणात आल्यावर खासियत असलेल्या मस्याहारी मेनूवर यथेच्छ ताव मारायचा.इथही मेनूफलकावर विविध माश्यांच्या नावांची थाळ्यांची यादी बघायला मिळाली.
     थोड्यावेळाने आलेल्या भोजन थाळीतील पदार्थांवर ताव मारुन भरपेट जेवण केले.मस्तच् कोळंबी फ्राय आणि मसाला होता.सोबत अप्रतिम चवीच्या सोलकढीनं जेवणाची लज्जत वाढवली.काउंटरवर बीलपेड करत असतानाच हॉटेल मालकास लाॅजिंग विषयी चौकशी केली.त्यानेलगेच अदबीने फोन लावून रुम आहे काय? याची इतरस्थ विचारणा केली.उपलब्ध आहे कळल्यावर फोन माझ्याकडे देवून बोलायला सांगितले,मी ही दराची चौकशी करून एक एसी रुम बुक केली व पाचच मिनिटांत येतोय असं सांगून फोन परत केला.
त्याने लगेच एका वेटरला लॉज दाखवायला दुचाकीवर पाठविले.त्यांनी दाखविलेल्या औदार्यास धन्यवाद देवून आभार मानले.अन् मेनरोड वरील श्रीधर रेसिडेन्सीमध्ये निवासाला गेलो.शुभरात्री.
क्रमशः भाग-१५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड