माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१५१
माझी भटकंती भाग क्रमांक-१५१
कोंढावळे मुरा
माडगणीच्या कड्यावर
क्रमशः भाग क्रमांक-६
दिनांक १९ फेब्रुवारी २०२१
ढगाळ हवामानामुळे महाबळेश्वरच्या डोंगररांगेवरली हिरवाई,धोम,बलकवडी धरणं धूसर दिसत होती.ती नजरेआड करत करत माळानं चालत काळूबाई मंदिराजवळ आलो.झाडांच्या छायेत उघड्यावर देवदेवतांच्या दगडांच्या मुर्ती होत्या.जवळच सापडलेल्या कागदाचा उपयोग करून मघाच्या पानांच्या द्रोणातील पंचरंगी मातीच्या छोट्या कागदांच्या पुडया बांधल्या.तिथं निवदभोणं करायला दगडांच्या दोन चुली होत्या.रानच्या देवांना मनोभावे नमस्कार करून पुढं भटकायला निघालो.इथल्या झाडांच्या खाली सभोवती गांडूळ आणि इतर कृमींची मातीची ओबडधोबड आकाराची उंचवट्या सारखी घरं नजरेला पडत होती.
आता उतारानं चालताना पाय जड होत होते. काही वेळा भेलकांडतही होतो.कारण आज लय तंगडतोड झाल्याने उतरताना पायाचं गोळं दुखत असल्याची जाणीव व्हायला लागली.आधाराला आता खरोखरच काठीचा उपयोग होत होता.अचानकपणे टिपकायला सुरुवात झाली.आत्ता पाऊस सुरू झाला तर तन भिजणार मन गारठणार एक अनामिक हुरहुर वाटू लागली.टिपकणारा पाऊस थोडंसं पुढं गेल्यावर कमी कमी होत गेला.
झाडीतली वाट संपल्यावर समोरच घनदाट झाडीतला कमळगड आणि त्याच्या पुढील नवरानवरीचा डोंगर नजरेत भरला.अवेळी टिपकणारा पाऊस आणि गार वारं अंगावर घेत गडाचे सौंदर्य फोटोग्राफी टिपत होतो.सायंकाळ होत आली होती .
पावसाचा शिडकावा बंद झाला होता.कड्यावरुन तुपेवाडी आणि शिवाराचे हिरवे आयत-चौकोन दिसत होते.समोरच धरणाचा फुगवटा आणि त्या पल्याडची रायरेश्वर डोंगररांग नजरेत भरत होती.वळणावळणाच्या काळसर रस्त्याने ये-जा करणारी वाहने खेळण्यातल्या गाड्यांएवढी दिसत होती. मोकाट बाजूने वारं फवारा सोडलेल्या झोतासारखं अंगावर आदळत होतं.डहाळ्या आणि पर्णिकांतून सूसू करत घोंगावत जाणाऱ्या वाऱ्याचा आवाज घुमत होता. तसंच पुढे जंगलातल्या मळलेल्या पायवाटेने आंबोळकी आणि आंब्याची मोहरलेली झाडं बघत दुसऱ्या बाजूने कड्याला वळसा घालून परत धनगरवस्तीकडं निघालो होतो. वस्तीजवळच्या एका ठिकाणी गवताची तीन बुचाडं (गंजी) गोलाकार रचलेली होती.आगोटीला गुरांच्या चाऱ्याची तजवीज केली होती.कारण पाऊस गुरे घरातल्या पडवीतच् असतात.किशन आणि एकजण गव्हाच्या वावरात क्रिकेट खेळत होता.या दोघांना बघितल्यावर लगेच किसन म्हणाला,'आपण तीनतीन ओव्हरची दोन गड्यांची मॅच लावूया.' तुम्ही दोघं भाऊ आणि आम्ही दोघं.'मुलं खेळायची संधी शोधत असतात.खेळापुढं ऊन,तहानभूक विसरून जातात. सरलेल्या वर्षातील क्रिकेटचे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर आले.लगेच टॉस उडवून ट्रायल बॉल टाकून खेळ सुरू झाला.अधिमधी रणाआउट,वाईड ,रणा आणि एलबी वरुन चिडाचिड व्हायची.पण मिनिटात पुढं खेळ सुरू व्हायचा. ते खेळत होते आणि मी तिथल्याच जंगलातल्या झाडोऱ्याची आणि शेतीच्या कामाची पाहणी करत होतो.एका खळ्यात गव्हाची मळणी होऊन ऊफणणी चालू होती.वारं आलं की हातातल्या पाटीतलं एका हाताने पाटी हलवून खाली पडताना भुसकाट वाऱ्याव लांब जात होतं तर गहू पाटीखाली पडत होते.वारं नसलकी पाटी डोक्यावर घेऊन वाऱ्याची वाट बघावी लागत होती.
काही वेळा वानरांचा कळप आल्याचा दिसताच मुलं हाकारी करीत नाहीतर त्यांच्यावर तिथूनच गॅटीने(लगोरी) दगड मारुन त्यांना हुसकावून लावीत.
तासाभराने खेळ थांबला, अनिकेत दळण घेऊन माडगणीला दळायला निघाला.आम्ही दोघं घराकडे निघालो.यांच्या वस्तीत लाईटची सोय नाही.त्यामुळे दळणदळायला जंगलवाटेने कडा उतरून माडगणीत जावे लागत होते.तिथं उपलब्ध असणाऱ्या घरघंटीवर दळण दळतात.बॅटरी आणि मोबाईलसुध्दा चार्जिंग करायला माडगणीतल्या ओळखीच्या घरी ठेवावे लागत होते.तंत्रज्ञानाची साधने दुर्गम क्षेत्रात पोहोचली आहेत, पण लाईट सुविधा नसल्याने वापर करायला तंगडतोड करत कसरत करायला कशी लागते. मोबाईल रेंज येणाऱ्या ठिकाणी टांगून कसा ठेवायला लागतो हे प्रत्यक्ष पाहिला मिळालं.भेटूया उद्या .
क्रमशः भाग-६
माझी भटकंती भाग क्रमांक-१५१
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment