माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१४६






माझी भटकंती 
  कोंढावळे मुरा  
दिनांक १९फेब्रुवारी २०२१
    क्रमशः भाग-१
स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कोंढावळे प्राथमिक शाळेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.गतसाली शिवजयंतीच्या पुर्वसंस्थेला शिवनेरी गडावर भ्रमंती झाली होती.यावेळी कोंढावळे गावाच्या तिन्ही बाजूंनी विळखा घातलेल्या सह्याद्री पर्वताच्या पश्र्चिम घाटातील कोळेश्वर डोंगर रांगेच्यागावाजवळील डोंगर पठारावरील जंगलात भटकंतीला जायचं नियोजित होतं. या डोंगरसपाटीची उंची अंदाजे ३७००ते ४००० फूट असावी.धोम धरणाच्या मध्यभागी असणाऱ्या नवरा नवरी डोंगराच्या पश्चिमेला वमाडगणी आदिवासी पाड्याच्या कड्यावरील पठारावरील दुर्गम जंगलव्याप्त वस्ती आहे.ती कोंढावळे गावातीलच आहे. याच डोंगर मुऱ्यावरुन दररोज शाळेत पायी येजा करणाऱ्या मुलांच्या समवेत २५ वर्षांपूर्वी पाहिलेली जंगलवस्ती(धनगर व जंगम समाज बांधवांची) पुनश्च मनसोक्त फिरावी.मागील आठवणींना उजाळा देऊन तेथील वेचक ठिकाणं अधोरेखित करायला खरंच आतुरता वाटत होती.त्यावेळी मोबाईल नसल्याने
फोटो काढले नव्हते.
  आता निसर्गरम्य परिसराचे अवलोकन करून वेचक वेधक दृश्ये टिपावीत. कातळ वाटा,जंगलवाटा तुडवत शुध्द हवा आणि गर्द हिरव्या वृक्षाच्या संगतीत रफेट करावी. गरज भासल्यास एक दिवस त्याच वस्तीत रात्री मुक्काम  करुन जंगलातील सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य मनसोक्त न्याहाळून त्याची छबी कॅमेऱ्यात टिपावी.असं ठरवून मी, माझा विद्यार्थी काशिनाथ आणि त्याचा दोस्त किसन मला मुऱ्हाला घेऊन जाण्यासाठी डोंगर पायउतार करुन आले होते.किसन म्हैशीचं दुध घालायला पायथ्याशी असलेल्या कोंढावळ्यात येत असे.तिथं खाजगी पिकप वाहने दुधसंकलन  करतात.पाचेक लिटरची किटली होती.काशिनाथने माझ्या हातात काठी दिली.
जवळच्याच दुकानातून बिस्किटपुडे घेतले.पाणी बॉटल घेऊन आम्ही तिघेजण पाटीलवाडीच्या डांबरी सडकेनं निघालो.तेथील काही मुलींची आमच्या सोबत जंगलवाटा फिरायला येण्याची उमेद होती.पण रथसप्तमी सणामुळे काहींना देवदेव करायला रानात जावे लागले.त्यामुळे आदल्या दिवशी दहाएक जणांची फायनल संख्या एका हाताच्या बोटांवर आली.
      मग आम्ही तिघे त्रिदेव पाटीलवाडीला मागे टाकून सलग चढणीला लागलो.दोघंही तुरुतुरु  मळलेल्या लालवाटेने चालायचे.चढणाच्या वाटेने चालताना काठीचा आधार घेत निघालो होतो.ढगाळ हवामानामुळे ऊनसावलीचा खेळ सुरू असायचा.मध्येच लख्ख ऊन तर क्षणात सूर्यप्रकाश धूसर व्हायचा.पावलागणिक श्वासाची गती आणि घामाच्या धारा वाढायला सुरुवात झाली.दमछाक होऊन छातीचा भाता फसफसत होता.जर्किन काढून पिशवीत टाकले आणि पुढे पुढे निघालो.केंजळगड, रायरेश्वर दरा, धोम धरणाचे पाणलोट क्षेत्र पाठमोरी जात होते.सभोवतालचा परिसर न्याहाळत अनेक छब्या मनाच्या कप्प्यात साठवत तर आवडलेली दृश्य कॅमेऱ्यात टिपत कातळ पाषाण,
कुसळाचे पिवळे गवत ,छोटी छोटी झुडूपे आणि गवतफुलांना सेलिब्रिटी करत आम्ही फोटोग्राफी करत होतो.अधूनमधून पक्ष्यांचा किलबिलाट कोलाहल कानावर पडायचा तेव्हा तो कोणता पक्षी संचार करीत फिरतोय ते दोघंही सांगायचे.मुलांबरोबर जंगलातल्या घडणाऱ्या गमतीजमतीवर गप्पा मारत चढण चढत होतो.आम्ही आता दुसऱ्या टप्प्यात होतो.मातीची वाट जाऊन आता तेदगडाच्या ओबडधोबड वाटेने काठी टेकत पुढं जात होती.सूसू आवाज करत वाऱ्याची गूज ऐकत अन् त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने शरीराला गारवा वाढत होता.हळूवार फुंकर मारल्यासारखे वाटत होते. सुखद चेतना मिळायची.वाटेतीलच एका उंबराच्या झाडाखाली विसावलो.मुलं लगीच झाडावर चढून बसली.
पक्ष्यांसारखे आवाज काढत असताना, शिट्ट्या मारताना घारीचं स्वैरपण आकाशात भरारी मारत एकाच जागेवर पंखांची फडफड करत सावज हेरण्याचं दृश्य बघायला मिळाले.दोघांनीही त्याची अधिकची माहिती दिली.
           'सर ,अजून तिनं टप्पे चढल्यावर टोंग येईल.मग कड्याखाली आडवं चालायचय' काशिनाथ म्हणाला.'मलाही माहित आहे.', असे म्हणून मीही लगेच होकार दर्शवला.त्यांचे झाडावरचे मस्तपैकी फोटो खेचले.सकाळीच काहीच खाल्ले नव्हते म्हणून बिस्किटांचा एक पुडा फोडून दोघांना एकेक पॅकेट दिले.त्यातील निम्मी बिस्कीटे दोघांनीही मला देवू केली.बिस्किटे खाऊनमजलदरमजल करत कातळ वाटेने चढणमार्गाला लागलो.
क्रमशः 
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती भाग क्रमांक-१४६
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड