कोकण गोवा भ्रमंती रेडी गणेश मंदिर
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
रेडी गणेश मंदिर ता.वेंगुर्ला पर्यटन
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग-७
निसर्गरम्य ठिकाणांचा मनमोहक अनमोल ठेवा अवलोकन करत काजू ,फणस,माडा पोफळींच्या झाडीत लपलेली वाडी वजा छोटी छोटी गावं बघत निघालो होतो.तदनंतर आम्ही तेरेखोलची खाडी ओलांडून आपल्या राज्यात प्रवेश केला.महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव रेडी.
हे गाव मॅगेनीज खनिजांच्या खाणींचे साठे असणारे बंदर आहे.येथून जवळच 'तेरेखोल' किल्ला आहे.गोवा सरकारने त्यांचे हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे.गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात या खंडाने क्रांतिकारकांना आसरा देण्याचे काम केले आहे.
"यशवंतगड " महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टी वरील शेवटचा किल्ला.खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर बांधलेला किल्ला आहे.समुद्रातील खाडी मार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवणे आणि संरक्षणासाठी उभारला आहे.ही ठिकाणंही प्रेक्षणिय आहेत. मोबाईलरेंज गुडूप झाली होती.त्यामुळे रेडी गाव आल्यावर एके ठिकाणी गणेश मंदिराची चौकशी केली.त्याने 'लाल रस्त्याने सरळ दोन किलोमीटर जावा,'असे सांगितले.सडक असून लालभडक रस्ता होता.खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा लाल धूरळा उडू नये म्हणून सगळा रस्ता टॅकरने पाण्याचे शिंपण केले होते. त्यामुळं चिखलसदृश रस्ता दिसला. रस्त्यावरच केवळ बुरंगाठ पडलंय आणि रस्ता ओला झालाय असं दिसतं होतं.पुढं आल्यावर गणेश मंदिराकडे जाणारा दर्शक फलकावरील बाण पाहून गाडी उजवीकडे वळवली.येताजाता खनिज घेऊन जाणारे लाल पिवळ्या डंपरचीच रस्त्याव वर्दळ होती.
लांबूनच नव्याने उभारलेल्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले.गाडी पार्क करून आम्ही मंदिरात उतरत्या रस्त्याने निघालो.तुरळक प्रमाणात भाविक होते.हे देवस्थान रेडीगावातील नागोळेवाडीत आहे.मंदिराचा कळस तीन टप्प्यांचा असून वेगळ्याच धाटणीचा आहे.मंदिराच्या पश्चिमेला समुद्र किनारा आहे.
गर्भागृह,सभामंडप आणि बाहेरील बाजूस मंडप आहे.
येथील श्री गणपती बाप्पाची मूर्ती द्विभुजाधारक असून स्वयंभू आहे.ती जांभ्या दगडात कोरलेली आहे.आज पहिल्यांदा बघावयास मिळाली.मनोभावे भावभक्तिने जोडीनं बाप्पाला नमस्कार केला.तदनंतर सभागृह पहाणी करत असताना इथं समुद्र किनारी गणपती बाप्पा कसे प्रकट झाले.त्याच्या माहितीचाफलक सभामंडपात लावलेला आहे.तदनंतर आम्ही रेडी बीच बघायला लाल मातीतल्या वाटेने निघालो.
क्रमशः भाग-७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com
Comments
Post a Comment