कोकण गोवा भ्रमंती कोलगाव धुकं
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
धुक्यातली सकाळ
कोलगांव सावंतवाडी
क्रमशः भाग-३
दिनांक ७ मार्च २०२१
मोबाईलच्या गजरने जाग आली.
साडेपाचचा गजर बंद केला आणि रुमच्या बाहेर गॅलरीतून पहाटेचे दृश्य बघायला आतुरलो.पण काय बाहेरचं काहीचं दिसेना? म्हणून बल्ब पेटविला अन् बघतोय काय तर, बल्बच्या प्रकाशात धुकंच धुकं सगळीकडे दिसत होतं.झाडंही धूसर दिसत होती.एक छान सुंदर दृश्य उजडायच्या वेळी बघूया असं मनाशी ठरवून रुममध्ये आलो.नित्यकर्मे उरकायला सुरुवात केली.तदनंतर बाहेर पडलो .
सभोवताली विहंगम नयनरम्य दृश्य बघायला मिळाले.सगळीकडे धुक्याची पांढरीशुभ्र रजई पसरली होती.अंगणात येऊन कुतूहलाने सर्वत्र पाहता धुकेच धुके चोहीकडे दिसत होते.झाडं वेली काळ्या पांढऱ्या रंगछटेत नक्षीसारख्या दिसत होत्या.पायवाटही धूसर झाली होती. त्याच वेळी मीही लाल पायवाटेने हळूहळू निसर्गातील वेचक, धुक्यात हरविलेली दृश्ये टिपत चाललो होतो. सकाळच्या प्रहरी अनवट वाटेने धुक्यातील निसर्गाचे सौंदर्य अवलोकन करत अर्धाएक तास रफेट करुन आलो.
सकाळचं चालणंही झालं आणि धुक्यातील सकाळचा मनसोक्तपणे आनंद घेता आला.
स्नेहदर्शन निवास नावाप्रमाणेच आदरातिथ्याने स्नेह वृद्धिंगत करणारं होतं.आवश्यक गरजेसाठी संपर्क साधलाकी स्तरावर कृतीयुक्त प्रतिसाद मिळाला होता.मिठ्ठास आणि शांतपणे बोलणं, मनमोकळे -पणाने चौकशी करणं,यास्तव आपुलकीची ठिकाण वाटलं.हे निवासस्थान नीरव शांततेत आणि रमणीय ठिकाणी सावंतवाडीच्या जवळ आहे.सर्वत्र हिरवीगार फुलझाडे दिसतात.कोकणचा मेवा काजूगर लगडलेले झाड पहिल्यांदाच इतक्या जवळून बघायला मिळालं.हिरवे पिक्के काजूगर छबीत टिपले.आमच्या गाडीवरही दवबिंदूनी पखरण केली होती.काचेवरील दवबिंदूची छानच नक्षी मनात भरत होती.ड्रायव्हरने थोड्यावेळाने कागदाने काच लखलखीत केली.तदनंतर आम्ही सावंतवाडीकडे प्रस्थान केले.खिडकीतून सभोवताली धुक्याची दुलईचे पांघरूण बघत बघत निघालो होतो.थोड्यावेळाने उन्हं आली.
सूर्यनारायणाचे दर्शन झाले,किरणांनी धुकं विलग केलं अन् सावंतवाडीचे निसर्ग सौंदर्य आमच्या नेत्रात सामावू लागलं.गर्द झाडीतून जाणारा चढ उताराचा वळणा वळणाचा रस्ता होता.त्यावरील मैलाचे दगड बघून ,आपल्या इप्सित स्थळाचं अंतर किती राहलय हे लक्षात येत होतं..मैलाचे दगड मागे जात होते तर आम्ही पुढे सरकत होतो.
क्रमशः भाग-३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com
Comments
Post a Comment