कोकण गोवा भ्रमंती रेडी बीच






कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्य संस्कृती वेंगुर्ला तालुका पर्यटन 
          रेडी बीच 
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग-९
एव्हाना चारही राॅक पाईंट बघून झाल्याने बोटमनने बोटिंग प्रदक्षिणा पूर्ण करायला दुसऱ्या मार्गाने मूळ जागी बोट आणली.आरपार  दगडाच्याच दावणीला बोटीचा दोर बांधून बोट थांबविली.आम्ही किनाऱ्यावर आलो.बोटीच्या जवळ उभे राहून फोटो टिपले.
वाऱ्याच्या झोतावर बोटीवरील भगवाध्वज अभिमानाने डौलत होता.त्यास अभिवादन केले.आजही छत्रपती शिवाजी महाराजांची अलौकिकता जलदुर्ग किल्ले गड संपत्तीच्या इतिहासाची साक्ष देतात. याची जलदुर्ग बघताना मनोमन प्रचिती येते.तदनंतर खडकाळ किनारा बारकाईने न्याहाळू लागलो. जागोजागी खडकाला पडलेल्या खड्ड्यांमध्ये किनाऱ्यावरुन येणाऱ्या लाटांचे पाणी खेळत होते.त्याचे फोटो शुट करताना खाली बसून खडकाकडे नजर वळली,तर तिथल्या खडकांना असंख्य छोटी मोठी छिंद्र पडलेली दिसून आली.त्या बिळात सागरी जीव आगमन गमन करत होते.विशेषत: छोटे मोठे सागरी खेकडे बघायला मिळाले.सागरी शैवालाचेही थरही खडकावर दिसत होते.एके ठिकाणी तर तळहाताच्या आकाराच्या खेकड्यांची तुरुतुरु चालणारी रांगच बघायला मिळाली.फोटोची क्लिक करेपर्यंत पाण्यातील दगडात दिसेनासे झाले. बीचच्या उजव्या किनाऱ्याला उंचच उंच काळेभिन्न ओबडधोबड खडक होते.त्यांपैकी काहींचा खुर्ची,सोफा,पलंग आणि बेड सारखा आकार नजरेला दिसत होता.एक दोन खडकतर एकावर एक ठेवून चवड मांडल्या सारखी दिसत होती. लाल मातीवरुन आकाशाकडे झेप घेणारी नारळाची झाडे ,काठावरील जणू काही मांडून ठेवल्यासारखे खडक आणि जाडसर पिवळी रेती बघितल्यावर वेगळाच सागर किनाऱ्याचा कॅनव्हास दिसतो.
वरच्या पाषाणावर पोहचायला उड्या मारत ,कसरत करत जावे लागते.अथांग सागराचे निळी छटा नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले पाणी आकाशाला जवळ करत होते. या नवलाईच्या खडकाळ बीचचे सौंदर्य मनात अधोरेखित करीत होतो.छानपैकी मस्तच मनसोक्त फोटोग्राफी करुन अथांग दिसणाऱ्या सागराचे भव्यरुप नयनात साठवत तिथून काढता पाय घेतला. कारण कितीही वेळ अवलोकन केले तरी डोळे अतृप्त राहतात.दृश्य भावनांना आवर घातला.उन्हानं जीवाची काहिली झाली होती.घामाच्या धारा चेहऱ्यावर येत होत्या. मग लिंबूपाण्याचा आस्वाद घेऊन आठ किलो मीटरवरील सागर किनाऱ्याचे सौंदर्य आणि ऋषितुल्य साहित्यिक गुरुवर्य वि.स.खांडेकर यांचे स्मृती शिल्प बघायला शिरोडा चौपाटीकडे मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग-९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड