आठवणीतील वारी ,लोणंद नगरी पंढरीची वारी
आठवणीतील वारी
जुलै २०१६
कैवल्याचा पुतळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा
________________________________________________________
लोणंद येथील बाजारतळावरील माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे काय वर्णन मी पामराने करावे... वैष्णवांचा मेळा आणि भक्तांची मांदियाळीने अवघी लोणंदनगरी माऊलीमय होऊन भक्तीरसात ओलीचिंब होऊन न्हाऊन निघते. आळंदी ते पंढरपूर पायवारी असते.समस्त वारकरी भागवत संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंगाला,आपल्या विठूरायाला भेटायला पायदिंडीने भेटायला जातात..बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
सगळं वातावरण माऊलींच्या नामघोषाने ,टाळमृदुंगाच्या गजरात आणि भजनकिर्तनाने प्रसन्न होते..वर्षभर बरकत होऊन सौख्य समृध्दीचा लाभ व्हावा म्हणून माऊलींच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यासाठी सर्व आबालवृद्ध भाविक लोणंदनगरीकडे अहोरात्र येत असतात..माऊली, माऊली ,ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम , विठोबा रखुमाई....
अशा मंत्रमुग्ध नामघोषाने, दर्शनाची भलीमोठी रांग आणि दिंड्या पताकांनी बाजारतळ भक्तीमय वातावरणात मंत्रमुग्ध होतो..
लोणंदच्या आमच्या पाहुण्यांच्या आग्रहास्तव आम्ही उभयता दिंडी सोहळा बघण्यासाठी गेलो....जुलै २०१६ मध्ये सौभाग्यवती आणि आई आदल्या दिवशी आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पालखी सोहळ्याच्या ओढीने लोणंदला पोहोचलो..पाहुण्यांचे निवासस्थान बाजार तळाजवळ होते.. त्यांच्या गच्चीवरुन पालखी सोहळ्याचे दृश्य पाहून मन हरखून गेले...... भाविकांची गर्दी..खाऊची दुकाने,दिंड्या ,त्यांचे तंबू आणि वहाने....पालखीरथ, मानाचा अश्व आणि पादुकास्थळाच्या सभोवताली दिंड्यांच्या राहुट्या..... पाहुणचार घेऊन दर्शन रांगेत उभे राहिलो.....एक तासाने मनोभावे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले......मन प्रसन्न झाले.... तिथेच भेटलेल्या केंद्रप्रमुख श्री सोळसकर (खंडाळा ) साहेबांची गळाभेट घेतली... माऊलींच्या दर्शनानंतर भेटलेले भाविक आणि वारकरी लहान-मोठे पणा विसरून आबालवृद्ध एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांच्या पाया पडतात.चरणस्पर्श करतात...केवढी ही लीनता आणि नम्रता ही वारी शिकवते... धोतर नेहरू शर्ट, डोक्यावर टोपी आणि कपाळावर बुक्का ,हातात टाळ आणि खांद्यावर भगवी पताका हा वारकऱ्यांचा प्रतिकात्मक रूप डोळ्याने ह्दयात संचित करत होतो....
तदनंतर दुपारच्या भोजनासाठी पाहुण्यांकडे आलो...त्यांच्याही घरी पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायवारी करणाऱ्या महिला वारकरी भोजन करीत होत्या.त्या बीड जिल्ह्यातील होत्या... दरवर्षी नित्यनेमाने लोणंदकर आणि परिसरातील भक्तगण आपापल्या यथाशक्ती इच्छेप्रमाणे भोजनदान,वस्तूदान,जलदान, अल्पोपहार, आणि विविध सेवा निस्वार्थी भावनेने सेवा करीत असतात. भक्तीच्या आनंदाला उधाण आलेले असते. जेवण झाल्यावर लोणंद ते तरडगाव पर्यत पायवारी करण्याचा आणि उभे रिंगण पाहून माघारी ही चालत येण्याचा मनोदय पत्नीने व्यक्त केला... आईनेही त्याला बळकटी दिली...आणि मग पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा इरादा पक्का झाला..... पालखी सोहळा मार्गस्थ होण्याचा बिगुल वाजला...
वारी पुढील प्रवासाला सुरुवात झाल्याचा संकेत सगळ्यांना दिल्याचेपाहुण्यांनी सांगितले...आम्हीही निरोप घेऊन माऊलींच्या रथामागे जोडीने हाताने टाळ्या वाजवित आणि मुखाने नामस्मरण करीत निघालो."माऊली माऊली रुप तुझे" काय वर्णावा वारीचा सोहळा.... आबालवृद्ध वारकरी आणि जनसमुदाय ,पुढे -मागे दिंड्या शिस्तबध्द पध्दतीने टाळमृदंगाच्या गजरात, टाळ्यांचा साथीने, भजनाच्या ठेक्यावर आणि मुखाने नामस्मरण करीत सोहळा पुढेपुढे चालला होता.
अनेक ओळखीचे मित्र, नातेवाईक भेटत होते... राम राम मंडळी, नमस्कार घडतच होता.... माऊली माऊली म्हणत क्षणभर गप्पा घडत होत्या...वारी दुतर्फा गरजेच्या वस्तूंची दुकाने थाटलेली होती...काही जमिनीवर तर काही वाहनात दुकाने होती...एक बाजूला दिंड्यांची वाहने जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता होता.रस्त्याच्या कडेला अनेकजण दानशूर भाविक विविध वस्तू,फळे,खाऊ, बिस्कीट पुडे,पाणी बॉटल इत्यादी सेवा मोफत पुरवित होते....एकमेका सहाय्य करू, गरजूंना मदत करु |
या भावनेने अनेकजण मदत करून वारकऱ्यांची सेवा करत होते...उन्ह पावसाचा खेळ सुरू होता....बुरंगाटासारख्या थुई थुई पाऊस धारा पडून नकळत तगमग कमी करत होता...माऊली रोपवाटिकेचे श्री बाळासाहेब कदमांचे सर्व कुटुंबीय टेम्पो करुन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
.आमची वारकरी सुमनवहिनी भेटल्यावर तिलाही साष्टांग दंडवत जोडीने घातला...आई ही लोणंदला आल्याचे कळल्यावर तिला फार आनंद झाला. माझी आई आणि ती शेतात काम करतानाची मैत्रिण. माझी गुरु बहिण सौ पुष्पा परामणे आणि दाजी श्री विलास परामणे यांचीही अनाहुत पणे भेट झाली... त्यांच्याही लीन होऊन पाया पडलो......पुढे पुढे गेल्यावर एका हॉटेलमध्ये सर्वांना चहापाणी केले... माझी मुलगी अ श्रेणीत पास होऊन इंजिनिअर झाली होती म्हणून सर्वांना पेढे वाटून आनंद साजरा केला.....
वारीत भारुड आणि भजनाच्या ठेक्यावर छान पैकी देहभान विसरून वारकरी फुगड्या झिम्मा खेळत होते.. विविध रचनेत नाच करीत होते..
तरडगाव फाट्यावर चांदोबाच्या लिंबाजवळ उभे रिंगण बघायला अलोट गर्दी होती... माऊलींचा मानाचा अश्व पळत पळत रथापर्यत येत असतो.... सभोवताली रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या असतात.
सगळ्या उपस्थितांची नजर माउलींच्या अश्वावर खिळलेली असते......याची देही याची डोळा मी प्रथमच तो रिंगण सोहळा बघितला....आणि सपत्निक माघारी चालत लोणंदला निघालो... वाटेतील एका जाकीटच्या दुकानातून वारीची आठवण म्हणून एक जाकीट घेतले.लोणंदस्टॅण्डला पोहोचलो.तदनंतर जनतेच्या अविरत सेवेचे व्रत घेतलेल्या लालपरी एस.टी.तून वाईला आलो...'एकदा तरी वारी अनुभवावी,'या उक्तीप्रमाणे आनंदानुभव घेऊन वैष्णवांच्या मांदियाळीत सहभागी झालो.... अवर्णनीय क्षण ते ..... बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम..... समानता आणि एकतेचा संदेश देणारी वारी...
चैतन्याचा भावभक्तीचा आनंदमय सोहळा
पाऊले चालती पंढरीची वाट,आस लागली विठूरायाच्या भेटीची,ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम!!!!!
माऊली माऊली रुप तुझे
ReplyDeleteमस्तच पालखी सोहळ्याचे वर्णन
ReplyDeleteविठ्ठल विठ्ठल,राम कृष्ण हरी
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete