माझी भटकंती पालाना मांढरदेव भाग क्र--७६







🥀☘️🌳🥀☘️🌳🥀☘️🌳
           माझी भटकंती

        🔅क्रमशः भाग-७६
    🍁पालाना मांढरदेव🍁
                 नोव्हेंबर  २००९
 💫💫💫💫💫💫💫💫

   रायरेश्वरापासून सुरू झालेल्या डोंगररांगेच्या मांढरदेव टेकडीच्या कड्याखाली असणारी दुर्गम वाडी पालाना.पर्यायी शिक्षण साधनव्यक्ती असताना मांढरदेव केंद्राचे केंद्रसमन्वयक श्री सदाशिव रुईघरे सरांसोबत या ठिकाणी जाण्याचा योग आला..
वाई वरुन आम्ही दोघे मांढरदेव घाटाने मांढरदेवला आलो.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली श्री काळूबाई माता.मांढरदेवी मातेचे मंदिर मांढरदेव गावात डोंगरमाथ्याच्या टेकडीवर आहे. प्राचीन काळातील मंदिर आहे.आम्ही दोघेही मातेच्या दर्शनासाठी प्रवेशद्वाराजवळ आलो.भव्य व आकर्षक प्रवेशद्वार आहे.तेथून मंदिरापर्यंत पायऱ्या चढत जावे लागते.पायऱ्यांच्या एका बाजूला विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने बघत बघत आम्ही मंदिराजवळ आलो.रुईघरे सर त्याच भागातील अनपटवाडीचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी  या देवस्थानाची माहिती दिली.मंदिराचा आखीव रेखीव कळस आहे.
                देवळाच्या उत्तरेला दाट झाडी आहे.मंदिरासमोर दिपमाळा आहेत.नवरात्र उत्सवात आणि यात्रेला भाविकांची अलोट गर्दी असते.मांढरदेव देवस्थान ट्रस्ट आहे.मुख्यमंदिराभोवती इतरही छोटी मंदिरे आहेत.हा परिसर वनराई ने नटलेला आहे.तसेच आल्हाददायक आणि थंडगार वातावरण असते.गाभाऱ्यात जाऊन मातेचे दर्शन घेतले.देवीचे स्वयंभू स्थान आहे.मांढरगड व श्री काळूबाई मांढरदेवी विषयी अनेक आख्यायिका आहेत.तदनंतर आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, मांढरदेव या हायस्कूल मध्ये आलो.तिथं सरांनी दुचाकी लावली व आम्ही दोघे पायवाटेने चालत चालत पालान्याकडे निघालो.बरोबर मंदिराच्या उत्तरेकडील बाजूने चालत निघालो होतो.चालताना शिक्षण प्रापंचिक गप्पांचे शेअरिंग चालू होते... शिक्षणासाठी अनेक अडचणींवर मात करत शिक्षक कसा झालो यावरही दोघांच्या चर्चा सुरू होत्या..आम्ही कड्याजवळ आलो होतो.तिथून संपूर्ण वाडी  दिसते.प्राथमिक शाळेचे पत्र्याच्या शेडची इमारत नजरेत पडते.मोठ्याने ओरडले तर आवाजालाही प्रतिसाद मिळेल  असं वाटतं होतं.पण आता कडा उतरून घसरट्या खडकाळ वाटेने खाली जायचं होतं.रुईघरे सरांच्या संगतीने व मार्गदर्शनाखाली कडा उतरत होतो.उतरताना शरीर पुढं झुकल्याने झोकांड्या बसत होत्या... काही ठिकाणी खाली  बसत तेथील दगडांनाधरुन कड्यावरुन पाय उतार झालो.अंगाला घाम फुटला होता.दमछाक झाली होती.. त्यावेळी तिथं वस्तीशाळा होती.श्री नामदेव हिरवे स्वयंसेवक होते.आमचे स्वागत झाले.शाळेविषयी चर्चा झाल्या.हिरवे सर तर गडगेवाडीतून दररोज चालत येऊन कडा चढत-उतरत असत.पालान्याच्या सगळीकडेच डोंगरच डोंगर आहेत.
हल्ली वाडीत चार चाकी गाडी जाते जाग्या पर्यत रस्ता झालेचे  समाधान वाटले..तद्नंतर तोच कड्याखालील पायवाटेने चढत कड्यावर येतानाही दमछाक झाली. तेथून चालत चालत हायस्कूल पर्यत आलो.तिथं थोडे विसावलो..
_________________&___________________________________
     सन २०१६ला  रुईघरे सरांसोबत बालेघर आदिवासी पाडा इथंही शालेय कामकाजा संदर्भात गेलो होतो.मुख्याध्यापक श्री धोंडिबा पोळ,श्री सुरेश मोरे व श्री  कांबळे सर तिथं होते.आमच्या समवेत श्री नितीन फरांदे व मोहिते सर होते.आम्ही बालेघर येथून दिसणारा परखंदी परिसर पहायला कड्याजवळ गेलो होतो.तेथून परखंदी परिसर व डोंगरराच्या उपशाखेतील केंजळला जाणारा घाटरस्ता यांचं विहंगम दृश्य बघायला मिळाले. सोनजाई डोंगर, वैराटगड , पसरणी घाट,पांडवगडाचे दृश्य दुपारच्या वेळेत हिरवे पिवळे दिसत होते. वारं घोंगावत यायचं तेव्हा
आवाजाने कानबधिर व्हायचे. स्पर्शाने वेगळीच जाणीव व्हायची क्षणभर मजा वाटायची.... विहंगम निसर्गाचे दर्शन  बघितले..तदनंतर कड्यावरच फोटोग्राफी केली आणि तिथून रूईघरे सरांच्या घरी आलो.स्ट्राॅबेरीफार्मला भेट दिली.नुकतीच फळे यायला सुरुवात झाली होती.. लालचुटुक स्ट्रॉबेरीच्या आंबटगोड चवीचा आस्वाद घेतला.शेतीविषयी गप्पा झाल्या.चहापान घेऊन दोघेही मांढरदेव घाटरस्त्याने वाईत आलो.

क्रमशः भाग-क्र.७६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड