माझी भटकंती दक्षिण भारत पाचवा व सहावा दिवस उटी भाग क्र--६१

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान






माझी भटकंती

🍃🔆🍃🔆🍃🔆🍃🔆🍃🔆
            माझी भटकंती

क्रमशः भाग---६१

दक्षिण भारत सन २००१
पाचवा  व सहावा दिवस
➖🍀➖🍀➖🍀➖🍀➖🍀
   🌀 हिलस्टेशन   उटी   

 आम्ही नामांकित बोटॅनिकल गार्डनला भेट दिली.. वनस्पतींची जैवविविधतेचे अनेक प्रकार पहायला मिळाले.वनस्पती झाडे आणि वेलींच्या  केलेल्या विविध रचना,लाॅनगवत, विविध प्रतिकृती, आकर्षक कंपाऊंड,
गवत व इतर झुडपांच्या पशुपक्षी, फुलांच्या  रचना पाहून मन थक्क झाले.विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली..... अचानक हवेत बदल होऊ लागला..थुई थुई पावसाची सुरुवात झाली.मग आम्ही तेथील जवळच्या रस्त्याने बाजारात गेलो.. तिथं बारीक पाऊस असतानाही बऱ्यापैकी गर्दी होती.. विविध स्टॉलवर   मसाल्याचे पदार्थ,
ड्रायफ्रुट,वेलचीचे अनेक प्रकार, चहा पावडर,औषधी वनस्पतींचे अर्क,तेल व विविध फेमस वस्तू पॅकिंगमध्ये उपलब्ध होते. विविध मसाल्याचे इसेन्स प्रथमच बघायला मिळाले होते.सर्वांनी सॅम्पल
पाहून आवश्यकतेनुसार खरेदी केले.मी लवंग तेल, चहा पावडर सॅम्पल,चंदन व गुलाबाचा इसेंन्स आणि मिक्स मसाला पाऊच इत्यादी खरेदी केली... पाऊस कमी-जास्त होत होता .पाऊस आणि आल्हाददायक वातावरण असल्याने मस्तपैकी कॉफीचा स्वाद घेतला.फिरत फिरत गाडी जवळ आलो...  गाडी घेऊन टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. चालत चालत टेकडीवर निघालो. बारीकशा पावसात सृष्टी सौंदर्य विलोभनीय दिसत होते.
आकाशातील ढग जवळून जातायत अस भासत होतं...थंडी वाजायला लागली....वाराही जोरात वहात होता.अन् पावसाची भुरभुर. अशा सृष्टीच्या वातावरणात आसमंत न्याहाळत व फोटोग्राफी करत होतो.माघारी परत  बाजारपेठेत आलो.चालता चालता इथं मुक्काम करायचा का ? का लगेच निघायच यांवर चर्चा केली... दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे.घाटाचा रस्ता ,रात्रीचा प्रवास आणि पाऊस  त्यामुळे इथंच थांबूया.त्यात थंडीचे दिवस आहेत.सर्वानुमते लॉजवर मुक्काम करायचे ठरले.... बाजारात आल्यावर आमची गाडी बघून चार-पाच जणांनी लॉजिंग लॉजिंग म्हणत घेराव घातला. ते बघून विठ्ठल म्हणाला ,'गुरुजी बघा ही काय म्हणत्यात.' मी म्हणालो, हमने बुकिंग किया है! घुमनेके लिए गये थे। 'असं म्हणल्यावर बाजूला झाले...
थोड्यावेळाने जवळपासच्याच एका  लॉजवर  मुक्काम केला.. पार्किंग मध्ये छानसा सर्वांनी मिळून स्वयंपाक केला. चिकन बिर्याणी,रस्सा आणि भाकरी मेनू होता.यथेच्छ  जेवलो.बाहेर थंडी चांगलीच जाणवत होती... पण रुममध्ये उबदारपणा होता... गप्पागोष्टी करत विश्रांती घेतली...

शुभरात्री_______________________________________________➖➖
   दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून परिसरात मी, निंबाळकर व वाडकर फिरायला  जायला बाहेर आलो तर बुरंगाट पडत होतं.. त्यामुळे बेत रद्द केला आणि शुचिर्भूत व्हायला  सुरुवात केली.
सकाळचा चहापाणी व नाष्टा उरकून आवराआवर केली.लाॅजिंग चेक आउट झाले.बाहेर थुईथुई पाऊस पडत होता. उघडण्याची शक्यता वाटत नव्हती.गाडीच्या कॅरिअर वरील बॅगा व इतर साहित्य भिजू नये म्हणून प्लॅस्टिक कागदाने आच्छादित करुन बांधले...
  उटीच्या निसर्गरम्य ,मनमोहक आणि उत्साहवर्धक सौंदर्य स्थळांच्या आठवणी मनात साठवून म्हैसूर कडे प्रस्थान केले.. वळणावळणाचे रस्ते , डोंगराच्या उतारावरील चहाचे मळे ( बागा ) ,खोल दरी पहाताना मस्तच लोकेशन दिसत होते.गाडीत उटीची चर्चा चालू असताना ड्रायव्हरने गाडी अचानक थांबविली...तो खाली उतरला आणि पुढच्या काचेच्या जवळ काहीतरी करत होता.ते पाहून विचारले, 'काय झाले? ''वायपर  का चालत नाही ते चेक करतोय.''तो म्हणाला.बारीक  पावसाचे थेंब काचेवर उडालेले वायपरने स्वच्छ होत नव्हते.
वायपरचा स्वीच चालू केला तरी वायपर आहे त्याच जागी ढिम्म... तो फिरत नव्हता. त्याचे दुरुस्तीकाम होईपर्यंत. आम्ही जवळच्या चहाच्या मळ्यात जाऊन अवलोकन केले.चहाचे मळे खुपच सुंदर दिसत होते.  डोंगराच्या उतारावर टप्प्याटप्प्यावर चहाची झाडं एकमेकांत विणलेली दिसत होती.सुंदर रचना .जणू हिरवीगार मखमल पसरली आहे.सोबतीला धुक्याची दुलईचे पांघरुण सुंदर आविष्कार डोळे भरून पाहत होतो. चहाची झाडं पहिल्यांदाच पहायला मिळाली..सुपर दृश्ये दिसत होती... फोटो काढतानाच्या पोजवर त्याने छान कमेंट केली .तो म्हणाला,' फोटोत गळ्यापर्यंत हिरवीगार झाडी आणि वरती रंगीत चेहरे' पाहून डिडोनियाच्या कुंपणावर पक्ष्यांचा थवा बसलेला दिसतोय....त्याने  सगळ्यांचे वैयक्तिक स्काय इज द लिमिट टाईप फोटो काढले...ग्रुप फोटोसेशन केले.. थोडावेळ झाल्यावर विठ्ठलने ड्रायव्हरला विचारले,' झालं का काम'..त्याने मानेनेच नकार दर्शविला.... मग बापू व विठ्ठलने काच चुना व तंबाखू लावून चांगली घासून काढली आणि पेपरने पुसून चकचकीत केली.लख्ख काच केली.तोपर्यत वायपर काय चालू झाला नाही.. सगळे गाडीत बसलो.
    'नवी गाडी असून वायपर चालत नाही मजी काय.?'पिंट्या बोलला.. 'मालकाकडे कंप्लेंट करा', वाडकर म्हणाले.
शिवाजीराव म्हणाले ,"होत असं कधी-कधी".
श्री बेलोशे ड्रायव्हर काहीही न बोलता तशीच गाडी चालवत होता...दहाऐक किलोमीटर गेलो की ड्रायव्हर गाडी स्लो करून उजव्या हाताने काच पुसायचा.पुन्हा वेग वाढवायचा  असं बऱ्याच वेळा त्याने  केले.. नंतर घाट रस्ता संपत आला तसं लख्ख प्रकाश दिसला.ऊन 
पडायला लागलं.पावसाची भुरभुरही कमी झाली होती.. त्यामुळे गाडीचा वेग वाढला. आम्ही आता म्हैसूर कडे निघालो होतो...
भेटूया  नंतर ऐश्र्वर्यसंपन्न शहरातील प्रेक्षणिय स्थळांची भ्रमंती करायला.... 

 🔅🍀🔅🍀🔅🍀🔅🍀🔅
क्रमशःभाग क्रमांक-६१

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे,वाई

https://raviprema.blogspot.com


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड