भटकंती भाग क्रमांक-१७४ संगमेश्वर मंदिर,सासवड
भटकंती भाग क्रमांक-१७४
🌹☘️🍂🌹☘️🍂🌹🌹☘️🍂🌹
प्राचीन संगमेश्वर मंदिर, सासवड
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
हडपसर परिसरातील मित्रवर्यांची स्नेहभेट झालेनंतर सासवड मार्गे नारायणपूर वरुन घराकडे मार्गस्थ व्हायचं होतं म्हणून आम्ही सासवडला दिवे घाटातून निघालो.नेहमीप्रमाणे गाणी ऐकत आणि विविधांगी गप्पाष्टक करत अंतर कमी होत होते.संतश्रेष्ठ कैवल्याचे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पंढरीचीवारी याच घाटातून जातानाची चित्रफीत ,चित्रे अनेकवेळा बातम्यातून बघितलेले नजरेसमोरून येत होते.घाटातच एके ठिकाणच्या सेल्फिपाईंट जवळ गाडी बाजूला घेतली.आणि तिथलं निसर्ग सौंदर्य बघत बघत सेल्फिबध्द केले. घाटाच्या खाली पायथ्याच्या मस्तानी तलावाचे दृश्य हिरवळीत उठावदार दिसत होते.ते पाहून तदनंतर घाटमाथ्यावरुन चालतच पुढे निघालो.दिवेघाट समाप्तीच्या एके ठिकाणी डाव्याबाजूला कड्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची उभी विशाल मुर्ती डोळेभरून पाहिली.वारीच्या वाटेवरील कमानी शेजारी फोटोग्राफी करुन सासवडला निघालो. नारायणपूरला बाहेरुन जाण्याऐवजी गावातून जाण्याची इच्छा सारथ्य करणाऱ्या मित्राच्या कानावर घातली.त्याने चौकापुढून राईट घेऊन गाडी गावातून घेतली.
सासवड हे तालुक्याचे ठिकाण असून प्राचीन धार्मिक तीर्थक्षेत्र,ऐतिहासिक परगणा आणि साहित्यिक वारसा लाभलेले प्रेक्षणिय स्थळ आहे.बसस्थानकावरुन साधारणपणे एक किमी अंतरावर नदीकाठी सर्वच स्थळे आहेत. रस्त्याला लागूनच पुरंदर वाडा आहे.तो भव्य दिव्य वाडा इतिहासाच्या पाऊलखुणा अधोरेखित करतो.तेथूनच पुढे काळ भैरवनाथाचे विशाल मंदिर आहे.चौकशी करत करत आम्ही लांबूनच दिसणाऱ्या प्राचीन संगमेश्वर मंदिराजवळ पोहोचलो.जिथं गाडी पार्क केली होती.तिथल्या बोर्डाने आमचे लक्ष वेधले.
"महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराव जगताप यांचे समाधीस्थळ."असा बोर्ड होता.बोर्डाजवळच पूर्वाभिमुख छोटेखानी घुमटी पाहून विनम्र अभिवादन केले.नतमस्तक झालो.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शूरवीर निष्ठावंत सरदार गोदाजीराव जगताप यांच्या शौर्याचे स्मरण झाले.सरदार गोदाजीराव जगताप म्हणजे शिवकाळातील इतिहासाचे मानाचे पान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार गोदाजीराव जगताप सासवड परगण्याचे देशमुख स्वराज्यासाठी झालेला पहिला रणसंग्राम (खळद बेलसर लढाई) गाजविणारे सरदार, प्रतापगडाच्या युध्दात मर्दुमकी गाजविलेले समशेर बहाद्दर सरदार तर शेवटच्या काळातील ३५००० पायदळी फौजेची सरनोबतकी असलेले पराक्रमी स्वामीनिष्ठ सरदार गोदाजीराव जगताप यांची वैभवशाली कारकीर्द नजरेसमोर आली.
तदनंतर आम्ही चांबळी नदीवरील छोट्याशा सेतूवरुन मंदीराकडे निघालो.सासवडचे सुपुत्र शहीदवीर कर्नल प्रसन्न गोळे यांना भारतमातेचे रक्षण करताना १८अॉगस्ट १९९८ रोजी जम्मू- काश्मिर येथील गुरेझ सेक्टर येथे हौतात्म्य आले होते.त्यांच्या देशभक्तीच्या सन्मानार्थ व प्रेरक आठवण सदैव रहावी.म्हणून नगरपालिकेने या पुलास त्यांचे नाव दिले आहे.पुलावरुन नभांगणाचे सायं दृश्य बघत आम्ही सात पायऱ्या खाली उतरलो.समोरच उंच कठड्यावर उभारलेले प्राचीन काळातील देखणी वास्तुरचना असलेले पाषाणातील मंदिरशिल्प, कऱ्हामाई आणि चरणावती वा भोगवती (चांबळी) या नद्यांच्या संगमावर वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लक्षवेधी ठरलेले संगमेश्वराचे मंदिर नजरेत भरले.दोन नद्यांच्या संगमाच्या मध्यभागी छोटेखानी टेकडीवर पाषाणात बांधलेले वेगळ्या रुपातील मंदिर दृष्टीस पडते.असे मंदिर पहिल्यांदाच बघितल्याने कुतूहल वाढले.
दगडी पायऱ्यांवरून आपण मंदिरात प्रवेश करतो.
साधारणपणे पंचवीस पायऱ्या छोटेखानी घाटावरुन चढून आपण सभामंडपात येतो.पाच टप्प्यात दगडी पायऱ्या असून प्रत्येक टप्प्यावर रुंद कठडे आहेत. तेथून समोर नदीवरील छोटासा बंधारा आणि पूल दिसतो. पायऱ्या चढून गेल्यावर आपण छोटेखानी अंगणात येतो.तिथं मध्यभागी नंदी आहे.तसेच आतील सभामंडपातही मध्यभागी नंदी आहे.मंदिर पुर्वाभिमुख हेमाडपंथीय असून सभामंडप, गाभारा व गर्भागृह असे भाग आहेत.मंदिरातील दगडी खांबांवर व तुळय्यांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. आतील गाभाऱ्यात पिंड आहे.शांत व भावपूर्ण वातावरणात मनोभावे दर्शन घेऊन भस्म ललाटी लेपून बाहेर पडलो.तदनंतर सभामंडपातील प्रवेशद्वारातून आम्ही कऱ्हा नदीच्या काठावरील घाटाकडे जाताना मंदिराची बाहेरील बाजूने नजर वेधली .ते कुतूहलाने बघतच राहिलो.पाठीमागील भिंतीवरील चौथरा ते कळसापर्यंत अप्रतिम कोरीव काम केलेले आहे.वेलबुट्टी,फुले पाने आणि तोरणांचे नक्षीकाम केलेले आहे.कळसापर्यंत नक्षीकाम केलेले दिसते.दोन्हीकडे प्रांगणात दीपमाळा आहेत.तिथल्या उत्साही चैतन्यमय समयी सूर्य अस्ताला जाताना दिसणाऱ्या आकाशातील मनमोहक सोनेरी तांबड्या छटा बघत छानपैकी विविध पोजीशनमध्ये फोटोग्राफी केली.नंतर छोटेखानी बांधलेल्या घाटावर शांतपणे बसलो.तेथून सूर्यनारायण अस्ताला जातानाचे विलोभनीय दृश्य दिसत होते.
श्रावणमासात संगमेश्वर मंदिराचे दर्शन झाल्याचा आनंद मित्रांच्या चेहऱ्यावर झळकत होता.प्राचीन मंदिर बघायला मिळाल्याची टिप्पणी आणि पुस्ती जोडत सगळेच फाईव्ह स्टार मित्र काठावरच थोडावेळ रमलो.याच परिसरात संगमेश्वर,चांगावटेश्वर, सिद्धेश्वर,नारायणेश्वर अशी देखणी मंदिरे आहेत.पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची समाधी,पुरंदरे वाडा, सासवड नगरीचे प्रमुख दैवत काळभैरवनाथाचे मंदिर आणि ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू सोपानदेव महाराज यांची समाधी कऱ्हा नदीच्या काठी आहे.सगळा परिसरच धार्मिक व इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे.
जवळच नदीनाम महात्म्याचे कऱ्हाबाई मंदीर आहे.तर रस्त्याच्या पलीकडं ज्यांनी चौफेर लेखन करुन साहित्य क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी अक्षरशिल्पांची मोहर उठविली असं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आचार्य प्र.के.अत्रे नामाभिधानाचे उद्यान आहे. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.आपल्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे करणारे, तर वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे करणारे आचार्य प्र. के. अत्रे. मराठीतील नावाजलेले प्रसिद्ध लेखक,कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, पटकथा लेखक, राजकीय नेते आणि उत्कृष्ट फर्डे वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आचार्य प्र.के.अत्रे यांची जन्मभूमी सासवड.त्यांचे आत्मचरित्र "कऱ्हेचे पाणी" यात बालपण व या परिसराची माहिती मिळते.
तदनंतर आम्ही आमच्या एका मित्राच्या ओळखीच्या रामबाग परिसरातील स्नेही सौ व श्री फडतरे यांच्या फोनवरील विनंतीवरून त्यांच्याकडे चहापानासाठी चौकशी करत गेलो.त्यांचा नुतन आधुनिक पध्दतीची रचना असलेला बंगला पाहून चकितच झालो.तेथील डेकोरेटिव्ह पुरातन चिजवस्तू पाहून हरकलो.त्या चिजवस्तूंची छबी मोबाईल मध्ये टिपली. तदनंतर गच्चीवरुन नभांगणाची नयनमनोहरी दृश्यांचा नजारा बघत बघत सर्वांच्या भेटीची समुहछबी टिपली.नुकतेच पाहिलेले संगमावरील 'संगमेश्वर'मंदिराचे दृश्यं गच्चीवरुन तिन्हीसांजेला आकाशाच्या क्षितीजावर अप्रतिम दिसत होते.तदनंतर स्वरचित काव्यसंग्रह व प्रवासवर्णन अशी दोन पुस्तके पाहुण्यांना भेट दिली.चहापानाचे आदरातिथ्य घेऊन घराकडे मार्गस्थ झालो.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂
-----------------------------------------------
प्रवास दिनांक -२४ऑगस्ट२०२१
लेखन दिनांक-२७अॉगस्ट २०२१
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद ताई
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete