पाऊले चालती प्रवासवर्णन
मनोगत
मित्रहो, गतसालापासून कोवीड-१९च्या संसर्गापासून सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन झाले.घरुनच काम करावे लागले.
आवश्यकतेनुसार बाहेर पडावे लागत होते.या काळातील उपलब्ध वेळेचा सदुपयोग करण्यासाठी घरबसल्या फेसबुकवर शेअरिंग करताना बरचसे फोटो बघताना आत्तापर्यंत केलेल्या भटकंतीच्या स्मृती नजरेसमोर तराळत होत्या.यावेळी कलाविष्कार क्रिकेट क्लब आयोजित 'क्रिकेटसामने', आणि 'गावाकडची रस्सा पार्टी' याचं वर्णन सहज गंमत म्हणून फेसबुकवर शेअर केले.ते आमचे पत्रकार मित्र श्री सुनील शेडगे (अप्पा) यांनी उपक्रमशील ग्रुपमध्ये शेअर करायला सांगून माझ्या लेखणीला चालना दिली.व्यक्त होण्याची उर्मी मिळत गेली.दरम्यानच्या काळात स्नेहबंधू श्री शिवाजी निकम यांनी 'छांदिष्ट 'समुहात मला अॅड करून तिथंही दररोज लेख पाठवण्याची गळ घातली.केंद्रप्रमुख दीपक चिकणे सरांनी भ्रमणध्वनीवरुन माझ्या लेखाचे कौतुक करुन प्रोत्साहन दिले.मग आजपर्यंत झालेल्या भटकंती,प्रवास,सहली,पर्यटन,दुर्गकिल्ले भेटींचा आलेख उपलब्ध फोटोवरून स्मरण करीत साठवणीतल्या आठवणी,माझी भटकंती या शीर्षकाने शब्दांकित करायला लागलो.
मग क्रमशः लेख शेअर करायला सुरुवात केली. वाचक शिक्षकमित्रांच्या, फेसबुक मित्रांच्या वेळोवेळी फोनवरील,लेखी स्वरूपातील आणि भेटीतून मिळालेल्या प्रतिक्रियेने लेखनात रुची निर्माण झाली.मग लिहीत राहिलो.एकेक करता ५० भाग झाले.
बऱ्याच मित्रांनी कौतुक करुन पुस्तकाच्या रुपात वाचायला आवडेल.अशा प्रतिक्रिया दिल्या.शतक पूर्ण झालेवर तर आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश तांबे यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला.फलटण टुडे सोशल मिडिया चॅनेलवर अभिप्राय न्यूज प्रसिद्ध केली.तर सुनील शेडगे सरांनी लेखमालेचे शतकपुर्तीचा गौरवाप्रित्यर्थ 'मुसाफिर' लेख सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.अनेकांनी शुभेच्छा देऊन पुस्तक प्रकाशित करण्याची प्रेमळ सूचना केली.
माझा निम्म्यापेक्षा जास्त सेवाकाळ वाई तालुक्यातील धोमधरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोंढावळे येथे झाला आहे.या परिसरातील सह्याद्रीच्या कुशीतील रायरेश्वर, केंजळगड,कमळगड आणि पांडवगड तर महाबळेश्वर,कोळेश्वर,आणि महादेव डोंगररांगा भुरळ घालतात.त्यामुळं बरीच ठिकाणं पदभ्रमंतीने फिरलो.याशिवाय अनेक प्रेक्षणिय पर्यटन स्थळांना भेटी दिल्या.कोंढावळे गावातील समवयस्क दोस्त,ओझर्डे गावातील दोस्त,वाशिवली केंद्रातील शिक्षकमित्र ,
स्नेहीजन ,छांदिष्ट अवलिया,अॅमिक्याबिलीटी मैत्री परिवार,कुटुंबिय आणि तत्कालीन विद्यार्थ्यांच्या समवेत सफरी घडल्या.ती प्रवासवर्णने ''पाऊले चालती" पुस्तकरूपाने प्रकाशित होतेय.
हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी हातभार लावणारे प्रकाशिका सौ स्नेहल निकम,मुद्रक,मुखपृष्ठ डिझायनर आणि अजय प्रिंटिंग प्रेस,कराडचे श्री नितीन जठार यांचेसह भटकंतीत सहभागी मित्र परिवार आणि खास लेखनाला वेळ देणारे माझे कुटुंबीय यांचे हृदयपूर्वक कृतज्ञतापूर्वक आभार!
रवींद्रकुमार गणपत लटिंगे
लेखक,ओझर्डे-वाई
Comments
Post a Comment