कवयित्री बहिणाबाई चौधरी
🌹☘️🍂🌹☘️🍂🌹🌹☘️🍂🌹🌹☘️🍂
माझी माय सरसोती
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत जीवनाचे सार आपल्या कवितेतून कथन करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांची जन्म दिन ....
शेती माती अन् नाती यांची महती सहज सोप्या ओवीतून वाक् शैलीत व्यक्त करणाऱ्या भूमीकन्या बहिणाबाई…..
"मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला तरी येत पिकावरं "
'अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला'
घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना ओवीसारखं काव्य सुचले. आणि तेच काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. ओठांवर गुणगुणत रहावे अशा त्यांच्या कविता आहेत.आज घर आणि शेतातील कवितांचे भावविश्व सहज सुंदर समर्पक शब्दांत व्यक्त होऊन विचाराला चालना देणाऱ्या त्यांच्या सगळ्या रचना आहेत.
काव्यसृष्टीतला हा चमत्कार खरोखरच 'माय सरसोतीनं लेक 'बहिनाच्या' मनी पेरलेली गुपित'च आहे ! कागद अन् शाईचा स्पर्शही न झालेल्या 'कबीराची वंशज' शोभावी, अशी कवयित्री म्हणजे बहिणाबाई !!
आज त्यांचा जन्मदिन
” माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिणाईच्या मनी
किती गुपितं पेरली,
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता भागवत
पावसांत समावत
माटी मधी उगवतं ”
मायेची(आईची) महती सांगताना बहिणाबाई चौधरी असं रचनेत म्हणतात.शेतात अन् घरात काम करत असताना अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली.प्रतिभा ही कुणा सुशिक्षित विचारवंताची जहागिरी नसते, हेच खरं. प्रतिभेचा साक्षात्कार हा नैसर्गिक असतो आणि ज्याचं अंत:करण शुद्ध नि आत्मा पवित्र असतो, त्यालाच तो होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी.
"जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल" असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.तसेच बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रमही मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला होता.
संसाराविषयाची त्यांची ओवी यथार्थ दर्शन घडविणारी आहे.
"अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मीयते (मिळते) भाकर''
ओवीतून कवितेतून काव्य वाड्मयाचे ग्रामीण विद्यापीठ म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचना.जीवनाची ओवी गाणाऱ्या बहिणाबाई चौधरींचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला दिले आहे.जयंती निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यरुपी साहित्यास विनम्र अभिवादन ❗
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂
Comments
Post a Comment