माझी भटकंती भाग क्रमांक--१७३ मेटतळे









माझी भटकंती भाग क्रमांक--१७३


 समाजभान जपायला मदतीचा हात देवूया|

संवेदनशील भावनेने खारीचा वाटा उचलूया|| 

       महाबळेश्वर मेटतळे परिसर

चराचरांना संजीवनी देणारा पाऊस अचानक कर्दनकाळ ठरुन लोकांच्या डोळ्यातून आसवं गाळू लागला.मनं विषण्ण झाली.

जुलै महिन्यातील २२व २३जुलै रोजीच्या कोसळलेल्या उच्चांकी अतिवृष्टीने सह्याद्रीच्या डोंगरांगात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, पूरपरिस्थिती निर्माण झाली.रौद्ररूपामुळे नदीकाठच्या डोंगराच्या कुशीत पायथ्याशी राहणाऱ्या वाडीवस्तीत हाहाकार उडाला.काही ठिकाणी घरं जमीनदोस्त झाली.शेतीवर वरवंटा फिरला नदीकाठची शेती दगडधोंड्याखाली गाडली गेली.दळणवळणाच्या साधनातील छोटेखानी पूल उध्वस्त झाले.रस्ते खचले, घाटरस्ते दरडी कोसळल्याने बंद झाले.

 आंबेनळी घाट दुरुस्ती मुळे बंद असल्याने वाहनांना प्रवेश बंदी महाबळेश्वरातूनच होती.

फक्त मदतकार्य करणारी छोटी वाहने मेटतळे पर्यत जात होती.विशेषत:महाबळेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या, डोंगपायथ्याच्या ,

मध्यांवरच्या गावांना सर्वात झळ बसली.अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे येथील स्वयंसेवी संस्था आणि वाईतील शिक्षक मित्रपरिवार एका रविवारी शिरवली येथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यासाठी मेटतळे येथे पोहोचलो.त्या दिवशी दीप अमावस्या होती म्हणून दीप उत्सव साजरा केला. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून ज्ञानरुपी दीप दान करण्याचा प्रयत्न केला.तदनंतर उपस्थित ग्रामस्थांना किराणा साहित्य कीट दिले.यावेळी माझे डी एडचे वर्गमित्र दीपक भुजबळ बापूंची अनाहूतपणे भेट झाली.ते ही गोगावलेवाडीतील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी आले होते.

  महाबळेश्वर परिसर म्हणजे भारताचे नंदनवन सह्याद्रीच्या डोंगरांगांचे मनमोहक आणि भुरळ घालणारे निसर्ग सौंदर्य.पण उच्चांकी ढगफुटीने हिरव्यागार कॅनव्हासवर अनेक ठिकाणी ओरखडे ओढलेल्या दरडींच्या मातकट लाल  रंगातील पाऊलखुणा आता ठळकपणे पावलोपावली दिसत होते.मदतीचे कार्य संपन्न झाले नंतर आंबेनळी घाटातील मेटतळे गावच्या पुढं ओसंडून वाहणारा धबधबा बघायला निघालो.जलप्रपाताच्या रौद्ररूपाने खचलेला- तुटलेला रस्ता पार वाहून गेला होता.राडारोडा दगडगोटे गडगडत गेलेले दिसत होते.रस्ता दुरुस्तीचे काम यंत्र आणि मनुष्यबळाचा वापर करून सुरू होते.एरव्ही धबधब्याचे दर्शन झाले की मनाला आनंद व्हायचा.तनमनात भुरळ  घालणाऱ्या दुधाळ धबधब्याखाली ओलंचिंब भिजण्याची हौस निर्माण व्हायची.पण आता तोच हवाहवासा वाटणारा धबधबा भयावह वाटत होता.तरीही सेल्फी काढण्याची मनिषा निर्माण झालीच.मग नितीन देसाई सर ,ज्ञानेश्वर जाधव सर,आणि श्र्लोक समवेत छबी टिपली.

प्रतापगड,मकरंद गड आणि परिसराचे विहंगम दर्शन नजरेने घडत होते.अवखळ कोयनेच्या काठावरील झाडीत लपलेली गावं दिसत होती.

आणि गावाशेजारी दिमाखात उभ्या असणाऱ्या रांगांवरील कोसळलेली वसरं(दरडी) ठळकपणे दिसत होती.व्हायरल क्लिपमध्ये बघितलेल्या  रौद्ररूपातील धबधब्याच्या जलप्रवाहाने कडेलोट झालेल्या खुणा जागोजागी दिसत होत्या.धबधब्याजवळील मातीतही पाय रोवत होते.

    तद्नंतर आम्ही सर्वजण क्षेत्रमहाबळेश्वरकडे निघालो.अधूनमधून पाऊसाची हलकी थुई थुई नाचणारी सर अधूनमधून येत होती.मध्येच धुकं वाटत होतं.त्यातच संथ गतीनं पाऊस नाचत होता.मेघांच्या पखाली रित्या होऊन डोंगर माथ्यावरुन कापूस पिंजल्यासारख्या अलवार  अलगदपणे गती घेत होत्या.ते नवलाईचे दृश्य नजरेला खिळवून ठेवत होते.मखमली धुक्याने जलधारेशी निकटतम मैत्री केली होती. संधीप्रकाशात सभोवतालचे विहंगम दृश्य नजरेत भरत होते.ते बघतच आम्ही क्षेत्रावर आलो.एव्हाना पाऊस रिमझिम पडायला लागला होता.

   धार्मिक स्थळातील शक्ती आणि भारतीची ऊर्जा देणारी मंदिरे ,कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कडीकुलूपात बंदिस्त होती. तरीही पर्यटक भटकंती करतच होते.प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरचे  नयनरम्य सौंदर्य प्रत्येकालाच मोहिनी घालते.

दाटं धुकं अन् रिमझिम पाऊस

अंगावर घेत भिजण्याची हौस|

थंडगार करतेय तनमनाला

जणू आनंदाचा पाझर ओलावला||

प्रवास दिनांक -८ऑगस्ट २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड