माझी भटकंती भाग क्रमांक-१७२क्षेत्रमहाबळेश्वर कृष्णाई मंदिर










माझी भटकंती-१७२ 

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

   क्षेत्रमहाबळेश्वर कृष्णाई मंदिर

श्रावणात बरसती रिमझिम पाऊस धारा सोबतीला घोंगावत येणारा गार वारा 

पावसाळ्यातील आरसपाणी सृष्टीचे रुप नजरेत साठवायला.रिमझिम बरसणाऱ्या पावसात मनसोक्त ओलंचिंब व्हायला.हसत खिदळत मौजमजा करायला अनेकांची पावलं महाबळेश्वरकडे ओढ घेतात.बऱ्यापैकी तुरळक प्रमाणात पर्यटक दिसत होते.आम्ही पंचगंगा मंदीर आणि महाबळेश्वर-अतिबळेश्वर मंदीराकडे पावलांनी ओढ घेतली.परंतु देऊळ बंद असल्याने दरवाज्यातूनच मनोभावे मुखदर्शन घेऊन परत वळलो.तिथं पाच नद्यांचा उगम झाला आहे म्हणून त्या मंदिरास पंचगंगा मंदीर संबोधले जाते.वाहन तळाच्या उत्तरेला खाऊची दोन-तीन दुकाने आहेत.तेथील पुर्वेकडील दुकानाजवळील 'कृष्णाई मंदीर' नावाच्या फ्लेक्सच्या पाटीने आमचे लक्ष वेधले. ते मंदीर पंचगंगा मंदीरासारखेच दिसत होते. त्याच्या वैशिष्ट्यावर चर्चा करत असतानाचा एक पर्यटकाने आमचे कुतूहल वाढविले.तो पटकन म्हणाला, ' खाली जवळच कृष्णाई मंदिर आहे.ते उघडे आहे.तुम्ही चालत जाऊ शकता'.मग एकमेकांशी बोलून आम्ही पार्किंगच्या पूर्वेला कोपऱ्यातील छोट्या रस्त्याने चालत चालत त्या मंदिराकडे भिजतच निघालो. थोड्यावेळाने आमच्या नजरेस कृष्णाई मंदिर पडले.रस्त्याच्या बाजूने पाठमोरी आकृती मंदिराची दिसते.बाह्यांगावर सर्वत्र पांढऱ्या रंगाची फुले दिसत होती.काळ्या पाषाणातील मंदिरशिल्प दिसू लागले.

    पाठीमागून पुढं आल्यावर कृष्णेच्या खोऱ्यातील  निसर्ग दृश्याचे अप्रतिम दर्शन होते. तदनंतर आम्ही कुतुहलाने,नवलाईने आणि जिज्ञासू वृत्तीने मंदिर बघण्यात हरवून गेलो.या मंदिराचा पुर्ण ढाचा पंचगंगा मंदीरासारखाच आहे.हे मंदिर पुर्वाभिमुख असून ते कृष्णाई, कृष्णामाई ' मंदिर नावाने ओळखले जाते.अलिकडेच पुरातत्व खात्याने या मंदिराचे उत्खनन करून उलगडा केला आहे.प्राचीन अनमोल ठेवा जतन केला आहे. 

पुर्वेकडून बघितले की आपणाला दोन्हीकडे ओसऱ्या(ओवरी) दिसतात.तसेच मध्यभागी जलकुंड असून उतरायला पायऱ्या आहेत.दोन्ही ओसऱ्यांना जोडून मध्यभागी समोरच कृष्णामाईचे मंदिर आहे.त्याचा दरवाजा बंद असल्याने आत जाता आले नाही.गाभाऱ्यात काळोख होता.मोबाईल विजेरीच्या उजेडातील अंधूक प्रकाशात आतील मुर्ती आणि शिवलिंग अस्पष्ट दिसले. तेथील पायऱ्या उतरून आपण गोमुखाजवळ येतो.       

  कृष्णा, कोयना,वेण्णा,गायत्री आणि सावित्री या मुख्य पंचगंगा मंदिरातील पाच धारा एकत्र येऊन गोमुखातून पहिल्या जलकुंडात पडतात. त्याच प्रमाणे येथेही कृष्णा मंदिरातून एक मूळधार भूमिगत होऊन गोमुखातून वाहते. जलकुंडात उतरायला चारही बाजूने दगडी पायऱ्या आहेत.मंदिरांचे बांधकाम घडीव दगडीत नक्षीदार आहे.त्यामुळे सर्वत्र बारकाईने बघण्याचे औत्सुक्य निर्माण होते.दोन्ही बाजूच्या ओसरीवर दहा पूर्ण खांब असून दोन अर्धस्तंभ आहेत.स्तंभ आणि छतावर नक्षीकाम केलेले आहे.बरेचसे कमळाच्या फुलाचे आकार दिसतात.तर दोन खांब महिरपीने जोडलेले आहेत.मंदिराच्या उजवीकडे एक जलकुंड असून त्यालाही पायऱ्या आहेत.ते ही घडीव दगडाचे आहे.मंदिराच्या पुढे उजवीकडे लगतच स्वतंत्र एक बांधीव दगडाचा चबुतरा (समाधी) असावा.तोही बांधीव दगडाचा असून वरुनही बंदिस्त छत आहे.बाजूने दगडाची कमान आहे.मंदिरापुढे थोड्या अंतरावरच कडा आहे.त्यास कृष्णा कडा म्हणतात.कड्यावर रेलिंग लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत.जवळून एक छोटासा धबधबा खाली कोसळत असतो.

     समोरच उळुंबवलकवडी धरणाचा फुगवटा,कोळेश्वर डोंगररांग आणि कमळगडाचे विहंगम दृश्य आपल्याला खिळवून ठेवते.संधिप्रकाशात मातीमिश्रीत गढूळ पाणी ठळकपणे दिसते.

सुंदर दृश्यमान नजारा रमणीय वातावरणात बघण्याची मजाच काही और असते.येथूनच खऱ्याअर्थाने कृष्णानदीचा प्रवाह आवेग घेतो. गोमुखातून वाहणारी धार,जवळचा धबधबा आणि कड्याखालील जलाशय बघितला की कृष्णानदीचे खोरे आणि आमच्या भागातील जीवनवाहिनी 'संथ वाहते कृष्णामाई'गीताच्या ओळींचे स्मरण झाले.

ऋषितुल्य गीतकार ग.दि.माडगूळकर यांनी रचलेले, प्रसिद्ध गायक बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेले संथ वाहते कृष्णामाई या कृष्णधवल चित्रपटातील 

'संथ वाहते कृष्णामाई|

तीरावरल्या सुखदुःखांची|

जाणीव तिजला नाही|

नदी नव्हे ही निसर्ग- नीती|

आत्मगतीने सदा वाहती |

क्षेत्र महाबळेश्वर येथून उगम पावलेली कृष्णामाई प्रवाहताना अनेक धबधबे ओहळ नाले आणि बहिणी रुपी नद्यांना  कवेत घेत महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा आंध्रप्रदेश या राज्यातून १४०० किलोमीटरचा प्रवास करत मच्छलीपट्टण जवळ बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीच्या तिरावरील अनेक ठिकाणं धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात व  नामांकित आहेत.आडबाजूला दुर्लक्षित असलेले प्राचीन मंदिर बघितल्याचे मनाला समाधान वाटले.नवीन माहितीची भर पडली.मंदिर परिसरातील आकर्षक दृश्ये छानपैकी  नजरेत आणि मोबाईलमध्ये क्लिक करुन साठवली.काही वेळ पाऊस अंगावर घेत,

भिजत गप्पा मारत गाडीजवळ पोहोचलो.अन् तद्नंतर परतीचा प्रवास सुरू झाला. आपलं गावं ज्या कृष्णामाईच्या काठावर व खोऱ्यातील आहे.त्या भागातील आम्ही गावकरी शेखर जाधव शरद यादव अभिजित सणस,प्रसाद राऊळ आणि पुणेस्थित मित्रमंडळी समवेत आपल्याच जीवनदायिनी कृष्णा नदीचे उगमस्थानाचे मंदीर अनाहुतपणे बघायला मिळाल्याचे मनस्वी समाधान लाभले.



"संथ वाहते कृष्णामाई"

प्रवास दिनांक-८/८/२०२१

लेखन दिनांक-१६अॉगस्ट २०२१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड