पुस्तक परिचय ५२-पाझर मातृत्वाचा





           पुस्तक परिचय

  ४# पाझर मातृत्वाचा

संपादक-श्री गणेश तांबे

प्रकाशन-आई प्रकाशन वाठार(निं.)फलटण 

-------------------------------------------

या देवि सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:||

दिला जन्म तू विश्व हे दाविलेस 

किती कष्ट माये सुखे साहिलेस

जिण्यालागी आकार माझ्या दिलास

तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस….

वाड्मयक्षेत्रातील भीष्माचार्य आदरणीय ग.दि.माडगूळकर यांचे काव्यपुष्प आईच्या सेवापरायणतेचे सुविचार अधोरेखित करतात.

आई या संस्कार अन् विचारांचे कृतीपीठ ''पाझर मातृत्वाचा"या गणेश तांबे संपादित अक्षरशिल्पात भावभावनांचे अनेक पैलू सुखदुःखाच्या आठवणी ,घटना आणि प्रसंगाचे पदर अलगद उलगडलेले आहेत. 

आमचे मित्रवर्य स्नेही श्री गणेश तांबे यांची मातोश्री सिंधूबाई भगवान तांबे असाध्य आजाराचा धैर्याने सामना करताना नकळत येणाऱ्या वेदनांची जाणीव म्हणजे ,"आई प्रतिष्ठान."स्वकर्तृत्वाच्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण होताना आईने केलेल्या काबाडकष्टाचा अन् विचारांच्या शिदोरीचा वस्तुपाठ म्हणजे हे अक्षरशिल्प आहे.

पाझर मातृत्वाचा या पुस्तकाचे संपादक ,आई प्रकाशनाचे प्रकाशक आणि आई प्रतिष्ठानचे संस्थापक श्री गणेश तांबे अशी तिहेरी भूमिका साकारुन "पाझर मातृत्वाचा"या पुस्तकाचे आईच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी संपादन केले आहे.तर प्रकाशन केले स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती दिनी. आणि  क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून प्रथमावृत्ती लोकार्पण केले.

  या मातृहृदयाच्या व्यक्त झालेल्या भावनांचा लेखं रसग्रहण करताना  नकळत नेत्रे पाणवतात.वाचकांना क्षणभर जन्मदात्राची आठवण येते.अन् मन तिच्या भोवती रुंजी घालत हृदयात कोरलेल्या क्षणांचा पट साक्षात उभा राहतो.छोट्या लेखकांच्या बालसुलभ मनाला भावणाऱ्या निबंधापुरत्या न राहता त्या भविष्यातील कर्तृत्ववान व्यक्तींची मातेप्रति व्यक्त होणारं संस्काराचे अक्षरचांदणंच आहे.

मातृसंस्कृतीचे महनमंगल स्त्रोत्र समाजशिक्षक साने गुरुजी नंतर आईप्रधान शब्दसंस्काराचा वसा आपण "पाझर मातृत्वाचा"या आपल्या पहिल्याच संपादित आवृत्तीत अक्षय करुन ठेवला आहे.

            आई प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'आई ' विषयावरील निबंधस्पर्धेतील भावस्पर्शी शब्द साजास एकाच वेळी मुलं-मुली किशोर- किशोरी युवक-युवती, तरुण-तरुणी, महिला- पुरुष,शिक्षक-शिक्षिका आदी सर्वजण लिहित्या आणि बोलत्या वयातील व्यक्तिंच्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

त्यांचे आईविषयीचे विचार पाझर मातृत्वाचा या अक्षरशिल्पात संपादित केले.ही एक मौलिक कामगिरी आपल्या हातून घडलीय.हे सारं श्रेय आपण आपल्या मातेला समर्पित केले.

 संपादक श्री गणेश तांबे सरांनी आईच्या आजारपणात केलेल्या सेवासुश्रुषेची कहाणी अत्यंत भावस्पर्शी शब्दातून व्यक्त केल्याने वाचताना हृदयस्पर्शी होऊन दाटून कंठ येतो.

आसवांचा बांध फुटतो.आजारातून बरे होण्यासाठी, मातेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे आपले कुटुंबिय आपले.आईच्याच मायेने आपण आईची सेवा केलीत.कोणतीही कसर सोडली नाही.आपणासारख्या प्रेमळ 'मायलेकास' त्रिवार मंगलवंदन. 

  या पुस्तकास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा संदेश देवून या पुस्तकाचा गौरव केला आहे.तर भारतीय संविधान दिनी( सव्वीस नोव्हेंबर)

डॉक्टर प्रभाकर रामचंद्र पवार मराठी विभाग प्रमुख मुधोजी महाविद्यालय फलटण यांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी ओजवता आलेख आपल्या सहज सुलभ शब्दात सर्वंकष रसग्रहण मांडले आहे.सुक्ष्मपणे लेखातील विचार मौक्तिके वेचली आहेत.यातील सर्वच लेख आईचे जीवनवास्तव चितारणारे अनेक मातांचे व्यक्तिचित्र आहे.कार्यकर्तृत्वाचे अनेक  बिरुदावलीने आयुष्यातील ठळक माईल स्टोनचा चौफेर वेध घेतला आहे.

  आई,आपली इतरांची अन् साऱ्यांची , कोणत्याही शब्दात न मानणाऱ्या मायमाऊलीच्या या मायेला वाहिलेली शब्दफुलं वेगवेगळ्या ओंजळीतली!

म्हणजे पाझर मातृत्वाचा होय.

संपादकीय मनोगतात आईचं ममत्व अन् उपकार यावरील वास्तव स्थिती वाचून मन उद्विग्न होते.ते म्हणतात.'खरतर कोणती आईआपल्या मुलांवर उपकार करीत नसते किंबहुना प्रत्येक आईची तशी भावना नसते. पण समाजामध्ये वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांची संख्या, रस्त्यावर इतरत्र फिरताना पाहिलेल्या माऊलींकडे बघून वाटतं समाजातील काही घटकांना आईने केलेल्या उपकाराची जाणीव होणे गरजेचे वाटतं. या पुस्तकाला सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या सर्व ज्ञात- अज्ञात हातांचे कृतज्ञतापूर्वक आभार त्यांनी मानलेत.

 अनेक कर्तृत्ववान व्यक्तींंच्या जीवनात आईचे अढळस्थान लेखातून व्यकक्त. झालेलाआ वाचताना मनस्वी आनंदही होतो.भावभावनांचे पैलू पानोपानी रसास्वाद घेताना दिसतात.अनेकांचे लेख वास्तव घटनेचे दर्शन घडवितात.वाचताना समरस एकरुप  होऊन   वाचक जातील. समर्पक काव्यरचना, सुविचार आणि वेचे यांनी लेख आशयघन व परिपूर्ण झाले आहेत.

 यातील काही मनाचा ठाव घेणारे लेखन

  गरीबीशी संघर्ष करत मोलमजुरी साठी दुसऱ्यांचे बांध धुंडाळणारी प्रसंगी टिकाव खोऱ्यांनी तळ्यावर काम करुन मुलांना चांगले दिवस येण्यासाठी आत्मबळ देणारी राजेश क्षीरसागर शिक्षणाधिकारी यांची आई


आयुष्यभर स्वत:च्या खुरप्यावर विश्वास ठेवणारी आणि आत्मविश्वासाने कष्ट करणारी श्री गजानन शिंदे यांची आई


माय निरक्षर असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी अन् आम्हाला शिकायला प्रेरित करणारी श्री रमेश गंबरे साहेब गटशिक्षणाधिकारी फलटण यांची आई


प्रतिकूल परिस्थितीतही पोटाला चिमटा देवून शाळेच्या दप्तराचे ओझं सोसणारी  प्राध्यापक अमोल चवरे यांची आई 


ममतेचा दर्श  मायेचा स्पर्श चेहऱ्यावर हर्ष

संस्कारांचा आदर्श अशी स्पर्शातली जादू केवळ आईजवळच आहे.

खरचं का ग आई,सात जन्म असतात का ?

आवडत्या माणसांबरोबर पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे,

तुझ्याच पोटी येण्यासाठी एक तरी तप करणार आहे.

अंजली गोडसे यांच्या लेखातील मायेच्या कर्तृत्वाची अर्थपूर्ण ओवी 

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस 

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी वेदनेनंतरची 'आई ग' पहिली आरोळी

मनाच्या अंगणात कायम घर करून जगण्याच्या इयत्तेत सदैव पुढं राहून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून भरभरून बोलणारी.

आपुलकीची नाती जोडून त्यांचे संवर्धन करणारी सुनील शेडगे सरांची चैतन्याची तेवत राहणारी ज्योत म्हणजे आई.


अनुभवली जेव्हा आईची गाथा

चरणी टेकविला मी माथा

मला उमजली माऊलीची गाथा

पुन्हा होईल का माझी माता

कोठेही न मागता भरभरून मिळालेली दान म्हणजे आई

विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान म्हणजे आई

अशा काव्यपुष्पाने आईचे कौतुकसिंचन करणारा जयश्री तांबे (वहिनी) यांचा लेख 


चरण आईचे हीच पंढरी,हवी कशाला वारी

इथेच माझा विठ्ठल अन् इथेच गं रखूमाई


मनात उठलेल्या वादळाला शांत करण्याची ताकद आईच्या शब्दात आहे.जिच्या आठवणी साठवण्यासाठीच असतात ती असते आई……. श्यामसुंदर मिरजकर आईची महती शब्दात मांडतात…

त्या तळहातावरील रेषात दडलेला असतो

तिने केलेल्या कष्टांचा इतिहास 

ते हात मातीत मळतात 

अन् त्या मातीतून फुलवितो हिरवे अंकुर

ते हात तापलेल्या तव्यावर पोळतात 

अन् त्यातूनच मिळतो जीवनरस .

||आई-वडीलांचं प्रेम कधी शब्दात मांडता येत नाही.आयुष्य संपल तरी त्यातून उतराई होता येत नाही.||

सर्वांनीच या पुस्तकाचे रसग्रहण करणे उचित ठरेल.यातूनच आई प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा चांगला प्रयत्न आई प्रकाशनाचे संपादक श्री गणेश तांबे यांनी केलाय.माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादिवशीच मित्रवर्य श्री गणेश तांबे सरांनी 'पाझर मातृत्वाचा'हे अक्षरशिल्प स्नेहभेट दिले.त्यामुळे हा दिवस माझ्या स्मृतिपटलात सदोदीत अधोरेखीत राहील.

############################

पुस्तकाचे नाव-पाझर मातृत्वाचा

संपादक-श्री गणेश तांबे

प्रकाशक-आई प्रकाशन वाठार निंबाळकर फलटण

आवृत्ती-प्रथम 

पृष्ठे-१२६

मुल्य- १२५₹

परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड