मैत्री टूर लवासा माऊंटन लेक सिटी भाग क्रमांक-१४५



🦋🍁🌿💫🦋🍁🍀  
 मैत्री टूर 
भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी
२२ नोव्हेंबर २०२०
माझी भटकंती भाग क्रमांक-१४५ 
क्रमशः भाग क्रमांक-४
〰️〰️〰️〰️〰️〰️
वरसगांव धरण व लवासा माऊंटन लेक सिटी
 🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁
लवकर सकाळी उजाडताना दिसणारे निसर्ग सौंदर्य बघायला कॉटेजच्या बाहेर पडलो.लॉन वरुन चालत चालत फेरफटका मारायला सुरुवात केली.सकाळच्या प्रहरी विहंगम दृश्य बॅंक वॉटरचे दिसत होते.पुर्वेला आभाळाला लाली आली होती.अथांग शांत निळेशार पाणी,
मधूनच पाखरांची किलबिल कानावर पडत होती.पल्याडच्या डोंगरांचे विहंगम दृश्य नजरेत भरत होते.पाण्यावरुन येणारा हलका गार वारा शरीराला स्पर्शून गारवा देत होता.डोंगर झाडीचे जलाशयातील प्रतिबिंब मनाला भुरळ घालत होते.या सकाळच्या प्रहरातील चेतना देणारं उत्साहवर्धक वेचक दृश्य मोबाईलमध्ये साठवण्याची लगबग सुरू होती.हळू हळू लालसर आभाळाची जागी सोनेरी प्रकाश किरणात आसमंत आणि सृष्टी न्हाहून निघत होती.अप्रतिम बहारदार नजारा छायाचित्रात साठविला. निसर्गनिर्मित दृश्याला साजेशी सजावट निसर्ग लेक व्ह्यूची नजरेत भरत होती.मऊ लुशलुशीत लॉन,रंगीबेरंगी फुलझाडे आणि शोभिवंत झाडांची नक्षी आनंदानुभव देवून मनोरंजन करत होती.चढ उताराच्या जागेचा कलात्मक पद्धतीने उपयोग करून लेक विव्ह्यूचा नजारा वाढविला होता.
झोपाळ्या बसून अलगदपणे झोका घेत समोरचा डोंगर पाण्याचे दृश्य बघण्याची मजाच काही और वाटत होती.मन अनेकविध दृश्ये पाहून तिथंच रेंगाळत होते.पण काही वेळाने मनाला आवर घालून फ्रेश व्हायला कॉटेजवर आलो.मित्रांची आवराआवर सुरू होती.
      मग सर्वांनी छानपैकी विविध पोजमध्ये मनसोक्त फोटोग्राफी केली.शुटिंग  केले.एक सुंदर निसर्ग सौंदर्य बघून समाधान वाटले.तिथंच नाष्टा आणि चहापान करुन एक किमी अंतरावरील लवासा सिटी बघायला निघालो.मुळशी तालुक्यातील दासवे गावाजवळ शहरातील गोंगाटापासून दूरवर जलाशय आणि डोंगराच्या कुशीत वसवलेली "लवासा सिटी" चकाचक रस्ते, छोटेसे धरण आणि डोंगराच्या पायथा,माथा आणि मध्यावरील मोकळ्या जागेचा कलात्मक पद्धतीने उपयोग करून टुमदार बंगले,रो हाऊस आणि संस्थांचे इमले बघायला मोहळ घालतात.धरणाच्या भिंतीवरुन चोहीकडे निसर्गरम्य दृश्याची लयलुट करायला तरुणाईची गर्दी होती.निसर्गाच्या सहवासात देखणं शहर वसविले आहे.माऊंटन लेक सिटी लवासा या नावाप्रमाणेच आपणाला चोहीकडे अनेकाविध सिन्स बघायला भुरळ पडते.
"दुरवर दिसणारं निळेशार पाणी
पक्ष्यांच्या किलबिलाटाची सदाबहार गाणी
चोहीकडे घनदाट डोंगरझाडीची वनराई
तनमनाला सुखाचा विरंगुळा देई"
पर्यटकांसाठी हरतऱ्हेच्या सुविधा उपलब्ध आहेत.पर्यटकांना आकर्षित करायला प्रेक्षणिक स्थळ बनविले आहे.वारेमाप दृश्ये टिपायला सिन गॅलरी कलात्मकतेने रसिकतेने बनविली आहे.
नौकाविहाराची सोय आहे.
भटकंतीही रमतगमत घडते.
परदेशीय इटलीतील पोर्तोफिनो शहराच्या धर्तीवर हे शहर वसविले आहे.सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात पुण्यापासून अंदाजे ६० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. मनाला विरंगुळा देणारं निसर्गरम्य ठिकाण आहे. सुमारे दोन तासांचा फेरफटका मारुन आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.दासवे घाटातून प्रवास करीत करीत मुठा नदीवरील टेमघर धरण परिसर बघून मारणेवाडी येथे श्री भास्कर पोतदारच्या शाळकरी मित्राच्या शेतातल्या घरी पाहुणचार घेतला.ताम्हिणी मुळशी-पुणे रस्त्याने मेगाहायवेला आलो. दुपारचे जेवण सायंकाळी हायवेच्या साई दरबार हॉटेलमध्ये करून खंबाटकी घाटातल्या हॉटेलमध्ये चहापान करुन मैत्री टूरचा समारोप केला..
माझी भटकंती भाग क्रमांक-१४५

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड