छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३७
छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची.
क्रमशः भाग २ माझी भटकंती भाग क्रमांक-१३७
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
चराचराला ऊर्जा देणारा स्त्रोत सूर्यनारायणाला बघत बघत आमचा प्रवास सुरु झाला.प्रत्येक दिवसाचं वेगळे पण असते.आज तर साहित्य,कला आणि निसर्गावर मनस्वी प्रेम करणारे कलासक्त व्यासंगी अवलियांच्या सहवासात सफर सुरू होती.लेखणी,वाणी आणि ब्रशच्या सामर्थ्याने कलाकृती निर्माण करुन स्वत:आनंदानुभव घेऊन इतरांना आनंद वाटणारे कलेचे उपासक.मग काय? गप्पांच्या विषयाला तोटाच नाही.वाईच्या क्वीड गाडीचे सारथ्य स्वत:उध्दव तर महाबळेश्वरच्या वॅगनर गाडीचे सारथी संतोषजी होते.१९८० च्या दशकातील हिंदीतील श्रवणीय आशयभरी गाणी ऐकत प्रवासातील अंतर कमी होत होते.गाणी ऐकताना नकळत रेडिओच्या सिलोन केंद्रावरुन सायंकाळी प्रसारित होणारी "बीनाका गीतमाला " आठवली.त्यातील अॅंकर आवाजके दुनियाके मसिहा श्री अमिन सयानी यांच्या बहारदार आणि मधूर आवाजाचे स्मरण गाणी गुणगुणताना झाली .गाणी ऐकत आजवरच्या केलेल्या निसर्ग सफरी,दुर्गभ्रमंती आणि शाळेच्या सहलीतील अचानक घडलेले घटना प्रसंग प्रत्येकजण आपोआपल्या खुमासदार शैलीत इतरांशी शेअर करीत होते. टोल नाक्यावरील सर्वच लेनला वाहनांची वर्दळ , त्यामुळं मोठीच रांग होती.विलंब होत होता.
शिवाजीराव महाबळेश्वरच्या गाडीतील अमितला मोबाईल वरून संपर्क साधून ते आमच्याच मागे येतायतना याची खातरजमा अधूनमधून करत होते.गप्पा आणि गाणी ऐकत कोडोली नाका आल्यावर लेफ्ट घेऊन हमरस्त्याला गुडबाय केला. रहिमतपूर मार्गे औंधकडे निघालो.उध्दव सरांनी बऱ्याच वेळा या रस्त्याने दोन चाकी चार चाकीत प्रवास केला असलातरी काही वेळा वाटेत उभी असणारी अनोळखी माणसं अथवा गाडी चालक यांना विनम्रतेने हाक घालीत.इप्सितस्थळाचा रस्ता विचारून आपली सवारी बरोबर चाललीय ना याची खात्री करत.
या रस्त्यावरुन वहानं चालविताना वेगाला लगाम घालून उखडलेल्या खडीच्या रस्त्याने गाडी चालवण्याची दोन्हीही सारथ्यांना कसरत करावी लागत होती. गाडीतल्या मित्रांची सफर सुखद व्हावा याच भावनेने गाडी हाकत होते.बराच रस्ता उरकल्यावर आम्ही औंधच्या फाट्यावर आलो.मागच्या गाडीशी संपर्क साधून वाट पहात उभे राहिलो.थोड्यावेळाने श्रीगणेशाने फलाहाराचा श्रीगणेशा केला.
पिवळीधम्मक मोसंबी सोलून त्यातील फोडी तिघांना दिल्या.त्या चाखत नुकताच सुरू झालेला साखर कारखाना लांबून पहात होतो.माळावर सर्वत्र पिवळसर गवताचा गालिचा दिसत होता.
परतीच्या पावसाने या भागात गर्जत धुवॉंधार बॅटिंग करुन शेतकऱ्यांची लाईन अॅण्ड लेन्थ खिळखिळी केली होती.त्यामुळे हातात येणाऱ्यापीकात पाणी साचलं होतं. माळरानची हिरवाई वाढत होती.एवढ्यात महाबळेश्वरची गाडी आमच्या नजरेच्या टप्प्यात आल्यावर उध्दवाने गुरव सरांनी संपर्क करुन ,'कुठं येऊ 'अशी विचारणा केली.तोवर मी दूरवरुन दिसणाऱ्या औंधनिवासिनी यमाई देवी डोंगर परिसराचे पहिलं चित्र मोबाईलने टिपले.अन् आमच्या दोन्ही गाड्या औंधगावाकडे निघाल्या.दोनएक किमी पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटले होते.एक गावात तर दुसरा मंदिराकडे
गावात जाणारा रस्ता सोडून राईट टर्न घेऊन आमची गाडी डोंगर चढणाला लागली.थोडसं पुढं गेल्यावर आपण गडावर जातोय हे लक्षात आले.गाडी थांबवून पुन्हा फोन.मंदिर बंद होते.गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता येणार नाही याची हुरहूर मनाला लागली.तेवढ्यात, 'अलिकडच्या नुकत्याच खडीकरण झालेल्या रस्त्याने सरळ यावे,' असे सरांनी सांगितले.मग रिटर्न घेऊन दुतर्फा असलेल्या झाडांच्या सावलीतून जाणाऱ्या सडकेने सरळ निघालो.थोड्याच अंतरावर अवलिया श्री राजेन्द्र गुरव सर,देवीचे पुजारी आमच्या स्वागताला अधीर झाले होते.....
क्रमशः भाग-२
माझी भटकंती भाग क्रमांक-१३७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment