छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३६
🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁
छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची.
क्रमशः भाग-१
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
अखेर ठरलं
छांदिष्ट्य समुहातील मित्रांची आॅनलाईन सहविचार सभा आमचे गुरुतुल्य मित्र श्री दीपक चिकणे सरांनी रविवारी सायंकाळी सात वाजता आयोजित केली.त्यातील महत्त्वाचा विषय खरसुंडी येथील श्री रमेश जावीर सरांच्या काष्ठ्यशिल्प संग्रहालयाला भेट देणे आणि जातायेता निसर्गरम्य ठिकाणी वेचत जाणं .वाटेवरल्या छांदिष्टवेड्या अवलियांशी गप्पागोष्टी करणं.
व्हाटसअपच्या आभासी माध्यमातून जडलेल्या मित्रांशी प्रत्यक्ष भेटून हितगुज करणे.असा सभेचा विषय होता.इथं प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली.
उपस्थितातील प्रत्येकाचा एकच सूर दोन-तीन दिवसांतच नियोजन फायनल करुन जाऊया.कारण मी , शिवाजी आणि उध्दव गेली दोन-तीन महिने एकमेकांशी फोन झालाकी फलटण,खरसुंडी आणि भरतगांवला मित्रांना भेटायला जायचं नियोजन कधी करायचं हा एककलमी विषयावर गप्पा झोडायचो,पण काही ठरत नव्हतं.शिवाजीच्या बोलण्यातून चिकणे साहेब आणि महाबळेश्वरचे इतर मित्रही इच्छुक असल्याचे समजले.मग लवकरच नियोजन करायचे ठरता ठरत नव्हते.अखेर दिवाळीच्या पुर्वेला छांदिष्टय समुहातील अष्टमित्र मुशाफरीला मंगळवारी सकाळच्या प्रहरी जाण्याचे अखेर ठरलं.
आदल्या रात्री उद्या फिरायला जाणार आहोत,पण डबा घेऊन येण्याची चिकणे सरांनी केलेली सूचना शिरसावंद्य मानून पत्नीशी बोललो.एरव्ही फक्त अंघोळ करून भटकंतीला बाहेर पडणारे.उद्या सकाळी सात वाजता जाणार आहे.
साडेपाचच्या गजराने जागं आली अन् आवरा आवरीला सुरुवात केली.नुकतीच थंडी पडायला सुरुवात झालेली गार स्पर्शानेजाणीव झाली.महाबळेश्वर आणि वाईकरांमध्ये मध्यस्थी करुन संपर्क साधण्याचं अवघड काम शिवाजीने लीलया पेललं.मला पावणेसातला फोन आला.'साडेसात पर्यत वरची मंडळी वाईत येतायतं.त्यांना आमदार गुळाचा चहा पिण्याची तल्लफ झालीय.' मी , 'ओके' म्हणून फोन ठेवला.आणि उध्दवला फोन केला.अचूक वेळेत मला घेऊन आम्ही दोघे कॉलेज रस्त्याला कॅनाॅलजवळ गेलो.शिवाजीराव तयारीतच आले होते.मग रिटर्न घेऊन आम्ही तिघे तडक आमदार गुळाचा चहा सेंटरवर पोहोचलो.गरम कपड्यात होतो तरीही थंडी वाजत होती.हळूहळू कोवळी उन्हाची किरणे पडायला सुरुवात झाली.थोड्याच अवधीत महाबळेश्वरचे छांदिष्ट्य मित्रांची गाडी आली.
त्यातील दोन ओळखीचे ( संयोजक श्री दीपक चिकणेसर आणि श्री अमित कारंडे सर)एक चेहरा रसाळ वाणी आणि काव्या लेखाने परिचित झालेला(श्री संतोष ढेबे).एक चेहरा अनोळखी होता. चहावाले ,'अगोदर चहा घ्या,पैसे नंतर द्या,थंडीनं गार होतोय.' असं अदबीने बोलला. सगळ्यांना चहा दिला. चहा पीत पीत त्याही चेहऱ्याचा परिचय चिकणे सर आणि उध्दवाने आपल्या शैलीत केला(श्री संतोष शिंदे सर ).चहाचा घोट घेत कसं जायचं यावर चर्चा झडली.सगळेच फिरस्ते असल्याने एकमत होणं कठीण असतं पण उध्दवाने मार्ग आखायचा आणि त्यावर दुसऱ्या गाडीतल्या सारथ्याने मार्ग चोखाळत गाडी दामटायची.चहा नंतर सफरीला मार्गस्थ झालो.वाटेतच वाईतील सदाशिवनगरात आमचे सन्मित्र लेखक आणि गायक श्री श्रीगणेश शेंडे सर सहभागी झाल्यावर फोर प्लस फोर टोटल एट कोरम पूर्ण झाला.व्यासंगाने छंद जोपासणारे मुशाफिर मुशाफिरीला निघालो.यात फोटोग्राफर,निसर्गवेडे,
दुर्गभ्रमंतीकार,लेखक ,कवी,संग्राहक ,चित्रकार, समीक्षक,क्रिडा समन्वयक, मॅरेथॉनपटू ,निवेदक असे छांदिष्ट्य . प्रत्येकाच्या वैशिष्ट्यपूर्ण छंदाने इतरांशी वेगळा आयाम बिरुदावली मिळवलेली होती. निखळ मैत्री जोपासणारे दोस्त .
पहिलं ठिकाण थांबण्याच..
औंधच्या अवलियाची..
क्रमशः भाग--१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती भाग क्रमांक--१३६
Comments
Post a Comment