छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३९

 



🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक  १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची.
क्रमशः भाग -४ 
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️माणदेशी भागातून निघालो होतो.रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शिवारात रब्बीची ज्वारी रोपट्यात दिसत होती.काही ठिकाणी उसाचे क्षेत्रही दिसत होतं.पंधरा-वीस मिनिटांनी पळशी गाव पास करून पुढे आल्यावर उजवीकडे एकाच  टेकडीवर असणारा भूषणगड नजरेस पडला.गडावर जाणारी गाडीची वाट गर्दझाडीच्या ओळीमुळे  काहीअंशी दिसत होती.तेवढ्यात उध्दवने पूरक माहिती दिली,' मुख्य दरवाजापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो.' लगेच मी अमितला मोबाईलवरुन भेटीला जाण्याचा इरादा विचारताच त्यांच्याही गाडीत गडावर जाण्याचं बोलणं सुरु होतं.
मग काय भूषणगडावर जाण्याचं शिक्कामोर्तबच झालं.थोडं पुढं गेल्यावर गावाकडे जाणारा रस्ता दिसताच राईट टर्न घेऊन भूषणगड गावात आलो.गाडीवरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहकाला गडाचा रस्ता विचारला.त्याने गाडीवाट वरती बंद केलीय.गडावर जायचं असेल तर पायऱ्यावरुन जावा,पण दरवाजा पर्यंतच जाताल.असं ऐकल्यावर थोडा विरस झाला.तरीही पुढं गेलोच.पार्किंग स्थळावर गाडी लावली.समोरच डौलाने फडकणारा भगवा नजरेत भरला होता.भेटीची आतुरता होतीच.उजव्या बाजूला पायथ्याशी गडाचे प्रवेशद्वार कमान होती.त्याच्याच उजव्या बाजूला गडावर जाण्यासाठी गाडीवाट होती ती बघितल्यावर गडावर जाण्याचा बेत रद्द केला.लोकांच्या सहकार्यातून तयार झालेल्या बांधिव दगडी पायऱ्यांच्या वाटेवर उभे राहून गडाचे दुरुनच दर्शन घेतले.भगव्या ध्वजास वंदन केले.प्रवेशद्वाराजवळ उभे असलेल्या ध्येयवेड्या सात वीरांचा गडपायथा भेटीचा क्षण समुह फोटोत श्री संतोष सरांनी अचूक टिपला.चिकणे सरांनी औंधच्या भेटीचं नियोजन करु तेंव्हा आवर्जून भूषणगडावर जाऊ अशी पुस्ती जोडल्याने भविष्यात गड पहाण्याची इच्छा पूर्ण होवो.अशी सदिच्छा इतरांनी व्यक्त केली.तदनंतर आल्या वाटेने बाहेर पडून निमसोडकडे निघालो..
      होळीच्या गावात पोहोचल्यावर निमसोडला जायचा रस्ता अनोळखी माणसाला आपुलकीने विचारला, त्याने सांगितल्या प्रमाणे उजवीकडे वळून थोडसं अंतर गेल्यावर डावीकडे वळून गावाच्या बाहेर पडलो.अपरिचिताने सांगितलेले बोल ऐकून हसू आले.कारण त्याचे शब्द उच्चारण हेल स्वरूपात होते.
रस्त्याच्या कडेला टांगलेले आणि भिंतीवर रेखाटलेले विविध जाहिरातीचे बोर्ड बघत.आमच्या प्रवासाला वेग आला.निमसोड वरुन मायणीला येऊन पोहोचलो.
    परतीच्या पावसाने ओढेनाले खळखळ वाहत होते.मायणीच्या पुल बांधकामाच्या स्थळी तर चक्क ओढ्यावर कपडे धुणं चाललं होतं. आपल्या भागात घाटाखाली विशेषत: नद्या ओढे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात.पण इथं पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होताना पहायला मिळाले.पक्षी अभयारण्य आणि स्थलांतरित पक्षी बघण्याची दुर्मिळ संधी मायणीला मिळते. दुपार अन् वाढत्या उन्हामुळे पक्षी बघायला मिळण्याची शक्यता धूसर आहे.पक्षी सकाळी आणि सायंकाळीच पाणवठ्यावर घिरट्या घालतात.अस सूचित केल्याने अभयारण्यात न जाता तडक पुढं निघालो. पुढील रस्ता चौपदरी मार्ग होता.गाडीनं चांगलाच वेग घेतला . तेवढ्यात रस्त्याच्याकडेला टेकडीवर उभारलेल्या पवनचक्क्या दिसल्या.
आत्तापर्यंत डोंगरावर पवनचक्क्या उभारलेल्या जवळून अजमावल्या होत्या. टेकडीवरील पवनचक्क्या आणि पिवळसर गवताचा कॅनव्हास बघायला उध्दवाने गाडी सुयोग्य जागी रस्त्याच्या कडेला विंडमील कडे जाणाऱ्या खडकाळ वाटेवर थांबवली.मानसाच्या मनात निसर्ग सौंदर्य वेचण्याची वेधक नजर पाहिजे.प्रवासातल्या परिसरातल्या सौंदर्यातही मन रमलं पाहिजे.मग टेकडी असो अथवा तलाव असो अथवा विरळ झाडी अथवा माळावरलं गवत असो.त्याचाही आनंदानुभव घेता आला पाहिजे.गाडीतनं खाली उतरून प्रथम टेकडीवरील  पवनचक्क्यांना सेलिब्रिटी करुन  मस्तपैकी विविध पोजमध्ये सगळ्यांचे चित्र टिपले.काहींनी सेल्फि काढली.तर मला अमितने गवतावर आवडत्या पोजमध्ये गवतावर पहुडण्यास सांगून आमची गवतात निवा़त बसलेली छबी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
तदनंतर समोरील रस्त्याच्या पल्याड छोटेखानी तलावाकडे भरभर चाललो.प्रथमत: चपला काढून मस्तपैकी घोटाभर पाण्यात उभे राहिलो.थंडाव्याने छान वाटले.मग काहींनी चेहरेही पाण्याने स्वच्छ केले.ताजेपणा आला.मग उध्दवाच्या सांगण्यावरुन आयलॅंडप्रमाणे असणाऱ्या(जमिनीचा उंचवटा सभोवताली  पाणी) स्पॉटवर उभे राहिलो.निसर्गासमवेत फोटोग्राफी कशी करावी याची अल्पवेळात कार्यशाळाच उध्दवने घेतली.फोटो काढणाऱ्याचेही फोटो टिपत होतो.त्याचवेळी मनाच्या फोटो गॅलरीतही नजरेने वेधलेली टिपलेली  दृश्ये साठवत होतो. वेळ वाढतोय खरसुंडी गाठायला वेळ होतोय याची जाणीव होताच.तलावातल्या निशपर्ण वृक्षाच्या फाद्यांची दृश्य नक्षी पुन्हा एकदा वळून पाहिली.
पायवाटेतली सदृश्य काटेरी झुडपे बघत त्यांची ओळख करून घेत गाडी जवळ आलो.आणि पुढं निघालो ते कलेढोण पिंपरी बु.,पडळकरवाडी करुन खरसु़डीतील श्री सिध्दनाथाच्या मंदिराजवळ छांदिष्ट समूहातील अवलिया सिध्दहस्त लेखक आणि  काष्ठ्यशिल्पकार श्री रमेश जावीर सरांची प्रतिक्षा करत थांबलो.......
क्रमशः भाग-४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती भाग क्रमांक-१३९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड