मैत्री टूर वरसगाव व लवासा भाग क्रमांक-१४२
🦋🍁🌿💫🦋🍁🍀
🦋🍁🌿💫🦋🍁🍀
मैत्री टूर वरसगाव धरण बॅकवॉटर
२१ नोव्हेंबर २०२०
माझी भटकंती भाग क्रमांक-१४२
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
मालवाठार मांढरदेव घाट
क्रमश:भाग क्रमांक-१
_______________________
आमची अॅमिक्यॅबिलीटी मित्रांच्या ग्रुपची सफर निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती करायला वाईतून सकाळीच निघाली.प्रशांत आणि राहुलची गाडी दिमतीला होती.बऱ्याच वर्षांनी आमचा एक मित्रही सोबत होता. बोपर्डी मार्गे मांढरदेव घाटाकडे निघालो.पांडवगडाचा लांबून दिसणारा नजारा खिडकीतून न्याहाळत आणि ऐंशीच्या दशकातील सुरेल श्रवणीय हिंदी गाणी ऐकत नेहमीच्याच घाटातून प्रवास करित होतो.घाट चढून मालवाठार भागात पोहोचलो तरीही मागची प्रशांतची गाडी दिसत नव्हती म्हणून शिवाजीला फोन करून विचारले.प्रशांतचे मालाज फॅक्टरीतले काम अजून झाले नाही त्यामुळे आम्ही अजून एमआयडी सीतच आहोत.मग 'ते येईपर्यंत आपण मालवाठार येथून दिसणारा धोम धरणाचे विलोभनीय दृश्य पाहूया,' असे म्हणून गाडी साइडला राहुलला थांबवायला लावली. भास्कर, सुनील, राहुल आणि मी खाली उतरून जाताना डाव्या बाजूच्या चढाईच्या पायवाटेने निघालो.तिथं दोन्हीकडे हिरव्या पिवळ्या रंगांच्या गवतातील पायवाट तुडवत संवर्धित केलेली कांचन,
आपटा आणि जंगली झाडं बघत कड्याजवळील दगडापाशी आलो.
लांबवर दिसणारे धोमधरण, कड्याखाली असणारं गाढवेवाडी गावाचा परिसर. परिसरातील शेती आयत आकारातील वाफ्यासारखी दिसत होती.गावाच्या शेजारचा "वाय वुड्स" रो हाऊसिंग लोकेशन्स चे काळेभोर रस्ते.समोरच दिसणारी रायरेश्वर पासून सुरू झालेली डोंगररांगेची एक उपशाखा अभेपुरी गावा जवळ विसावलेली दिसत होती.त्या शाखेच्या आणि वेरुळी डोंगररांगेच्या सोंडेवर आणि पायथ्याशी चंद्रकोरी आकारात वसलेली अभेपुरी,वडाचीवाडी आणि पाचपुतेवाडी ही गावे कौलारू घरांवरुन दिसत होती.तर झाडीत आणि ऊसाच्या शिवारात लपलेली भिलारेवाडी.डाव्या बाजुचा पांडवगड तर उजवीकडे वेरुळीची टेकडी आणि त्यावरील जटायू आकारात दिसणारा काळा कातळ आपल्या नजरेसमोर येतो.धरणाच्या पल्याडचा पसरणीघाट,थापा (हॅरिसन फॉली) त्याघाटातून दिसणारी वाहनांची मुंगीसारखी रांग,पाचगणीचे जगप्रसिद्ध टेबललॅण्ड आणि धरणाच्या मधोमध दिसणारा नवरानवरीचा डोंगर आणि पल्याडचा झाडीत लपलेला कमळगड.त्याची दूरुन केवळ टोपीच दृष्टीत येते.असं विलोभनीय किमयागाराचे दर्शन घेत आणि निसर्गातील गवत , झाडं आणि दगडाला सेलिब्रिटी करुन आम्ही मस्तपैकी विविध पोजमध्ये एकमेकांची फोटोग्राफी केली. मी निसर्गरम्य परिसराचे फोटो काढताना,'लटिंगे दादांना कविता करायला सुरेख फोटो मिळाले;' तात्काळ शेअरिंग सुरू.लगेच भास्करने री ओढली';आठवडा- भराच्या कविता रचायला आयती संधी मिळाली.' अजूनही गाडी पाठीमागेच होती.त्यांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.मग तिथंच छानपैकी एका झाडाच्या आडोशाला बसून गप्पा सुरू झाल्या.
सूर्यप्रकाशाचा कवडसा पानातून किरणांसारखा येत होता.झाडाचे खोडही जमिनीलगत होते. दोन्हीकडे फांद्यांची नक्षी कमान दिसत होती.निसर्गातल्या आरामदायी वातानुकूलित खुर्चित बसून समोरची टेकडी बघत बसण्याचं आणि फोटो टिपण्याचं सदभाग्य आज लाभत होते.गप्पांच्या ओघात माझ्या रचलेल्या काही कविता ऐकवून दोस्तांची फर्माईश पुर्ण केली.निसर्गाच्या सहवासाताच निसर्गसौंदर्याच्या कविता वाचनाची संधी रसिक मित्रापुढे वाचायची संधी मिळाली.उशिर झालाय म्हणून त्यांना न रागावता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. आपल्याच भागातील शाळेत जाताना सदैव दिसणारा भाग आज उंचावरून कसा दिसतो याचे अवलोकन केले.मनसोक्त बघता आले.
अचानकपणे मालवाठार येथून बऱ्याचवेळा अवलोकित केलेला निसर्ग आज अधोरेखित करण्याची संधी मित्रांसवे मिळाली.आता नियोजनात नसलेलं पहिलं ठिकाण पाहून झालं होतं.मग सुनीलने मोबाईलवर संपर्क साधला असता घाट चढतोय असं प्रतिउत्तर आल्याचे समजताच.आम्ही आल्यावाटेने गाडीकडे निघालो.
जवळच रुक्ष कोरडा ठणठणीत प्रवाहाच्या खूणा असलेला धबधबा होता.पावसाळ्याचा दिवसात याच धबधब्याचे पांढरेशुभ्र जल कड्यावरुन अखंडपणे आवेगाने कोसळत रस्त्यावर धावू लागते.
अनेकजण हिरव्या निसर्गरम्य परिसरातील पावसाच्या ढगाळ कुंद वातावरणात धबधब्याचा नजारा बघायला आणि मनसोक्तपणे कोसळणाऱ्या पाण्याचे तुषारे अंगावर घेत चिंब भिजायला वर्दळ वाढते.त्या आठवणी हे ठिकाण बघताना समोर तरंगू लागल्या.
तेवढ्यात हॉर्नच्या आवाजाने मागे राहिलेली गाडी आल्याचे कळले.
तदनंतर इशारे करुन पुढील घाटमाथा चढायला सुरुवात केली.
उंचावर आल्यावर हवेतील गारवा वाढायला लागल्याची जाणीव होत होती.कोचळेवाडी फाट्याव चहा प्यायला न थांबता आपण आता घाट उतरून खाली जाऊया असं दुसऱ्या गाडीतल्या सारथ्याला मोबाईलवर संपर्क साधूनआमच्या मागोमाग यायला सांगितले.
क्रमशः भाग -१
माझी भटकंती भाग क्रमांक-१४२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment