छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१४०
🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची.
〰️〰️〰️〰️〰️
क्रमशः भाग क्रमांक ५
माझी भटकंती भाग क्रमांक-१४०
################
श्री रमेश जावीरकाष्ठशिल्प व चित्रसंग्रहालय खरसुंडी ता. आटपाडी जि.सांगली
🦋🍀🦋🍀🦋🍀💫
श्री सिध्दनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे श्री रमेश जावीर सरांची उत्कटतेने वाट बघत होतो.मंदिराच्या दर्शनी बाजूस श्री सिद्धनाथ भक्तगण तुरळक प्रमाणात दिसत होते.विशेषतः नवविवाहित दांपत्य कुलदैवताच जोडीनं दर्शन घेण्यासाठी आलेले होते. संसाराच्या प्रारंभी शुभाशिर्वाद घेण्याची मनोकामना पूर्ण करीत होते.सर्वांच्या मनात काष्ठ शिल्पाचा जादुई किमयागार कधी भेटतोय असं झालं होतं.तेवढ्यात जावीर सर समोरुन चालत येताना आमच्या नजरेस पडले.साधी राहणी उच्च विचार सरणी असं आदरणीय व्यक्तिमत्त्व असणारे श्री रमेश जावीर सर आज प्रत्यक्ष भेटले.सर्वांशी हस्तांदोलन व राम राम करत परिचय झाला.प्रवास कसा झाला याची विचारपूस केली.
मार्गदर्शक दीपक चिकणे सरांनी मस्तच रमत गमत भ्रमंती झाल्याची माहिती दिली.मग इतरांनीही री ओढत आणि सरांच्या समवेत आम्ही श्री सिद्धनाथांच्या दर्शनासाठी मंदिराकडे एका मागोमाग एक असं निघालो.सरांनीही चालतानाच मंदिराचे धार्मिक महात्म्य कथासार व आख्यायिकेतून सांगायला सुरुवात केली. प्रशस्त दिमाखदार पटांगणात नजर वेधणाऱ्या दीपमाळा पाहून समाधान वाटले.एरव्ही इतर मंदिरापुढे एक-दोन दीपमाळा दृष्टीस पडतात.पण इथं तर त्यापेक्षाही जास्त दिसल्या.तेवढ्यात फोटोकार निकम सरांनी आपल्या विशिष्ट अॅगलने दीपमाळांना सेलिब्रिटी करुन आमची समुहछबी टिपली...
तदनंतर मंदिरात जाऊन श्री सिध्दनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरातील शिल्पकाम, मेघडंबरीचे नक्षीकाम,खांबांची रचना आणि छत पहात पहात बाहेर आलो.
तेवढ्यात एका शोकेसकडे श्री दीपक चिकणे सरांचे लक्ष गेले.कुतूहलाने आम्हीही सगळे तिकडे गेलो.तिथं बाप्पाच्या अनेकविध आकार व रंगातील बाप्पाच्या लहान लहान मुर्ती होत्या.चिकित्सक जिज्ञासाने बाप्पांची रुपं डोळ्यात साठवून मंदिरातून बाहेर पडलो.आता वेध संग्रहालयाचे लागले होते.
कधी एकदा छांदिष्ट ग्रुपमध्ये इमेज स्वरुपात बघितलेली काष्ठशिल्पे प्रत्यक्ष बघायला उतावीळ झालो होतो.जवळच्याच मार्गाने आमच्या दोन्हीही गाड्या संग्रहालयाच्या दारात पोहोचल्या.
गाडीतून उतारतानाच हातात दुपारच्या जेवणाचे डबे घेतले, सरांना प्रथम पोटपूजा करुन मग आपल्या अमूल्य खजिनाचे सौंदर्य पाहूया ,अशी विनंती वजा सक्तीची सूचना करुन पहिल्या मजल्यावरील खोली कडे गेलो.तिकडे जात असतानाच प्रदर्शित काष्ठ्य शिल्पे नजर वेधत होती.पण पोटात भुकेची जाणीव त्यामुळे "आधी पोटोबा मग काष्ठ शिल्पोबा "या उक्तीप्रमाणे छानपैकी फ्रेश होऊन आमची पंगत बसली.घरुन दिलेल्या शिदोऱ्या सोडून एकमेकांना भाजी आदान प्रदान करून मजेत आणि गप्पांत उदरभरण सुरु झाले.
यथेच्छ भोजन झाल्यानंतर आम्ही सरांच्या पाठोपाठ संग्रहालय पहायला अद्भुत काष्ठ खजिन्याची सुरस कथा ऐकायला उत्सुक झालो.
त्यांनी एका दालनात छोटेखानी स्वागत समारंभ केला.श्री रमेश जावीर सरांनी आमचे स्वागत स्वलिखित क्षमताधिष्ठित "सप्तरंगी कला " हे पुस्तक देवून केले.
'कलेतून व्यक्तीच्या मनातील भावभावना प्रकट होतात.' या विचाराचा प्रभाव पुस्तक वाचतानाच जाणवतो. नवशिक्या कलाकाराला ध्येया सक्तीला कसं पोहचायचे याची माहिती देणारं पुस्तक आहे.तदनंतर आमचे मार्गदर्शक श्रीमान दीपक चिकणे सरांनी स्वहस्ते बनविलेला बाप्पा,परिमळ काव्यसंग्रह आणि स्नेहमैत्री संवर्धित करणारं कॉफीचं रोपटे देवून अवलिया छंदवेड्या कलाकाराचा संग्राहकाचा आणि साहित्यिकाचा गौरवसन्मान केला.
तदनंतर आपल्या माध्यमिक शिक्षक पेशातील व्यासंगी छंदानुभव आपल्या सहजसुंदर शैलीत व्यक्त केले.बालपणीच्या रम्य आठवणींना स्पर्श करत करत ,शिक्षक ते काष्ठ शिल्पकार कसा झालो हा जीवन प्रवास घडवला.सरांचा विषय इंग्रजी पण मराठी भाषेची ओजस्वी गोडवी सदैव मनात ठेवून आपल्यातील छंदाला, कलेला सादरीकरणाचे नवनवे पथ चोखाळताना..काष्ठ शिल्प नवनिर्मितीच्या कलेचा व्यासंग कसा झाला याचा उलगडा ओघवत्या शैलीत केला.नोकरीच्या विविध गावातील परिसरात फावल्या वेळी भटकंती करुन चौकस नजरेने मुळखंड शोधून त्याचा मनात ठरविलेला आकार इतरांची नजर वेधावा असा करण्यासाठी इतरांची मदत घेऊन काष्ठशिल्पं अप्रतिम बनविली. सरांनी प्रत्येक शिल्पाचा मुळखंड कोठे सापडला,तो कसा तयार झाला,तो इतरांना बघायला कुठं प्रदर्शित केला याची इत्यंभूत यशोगाथा सादर केली.प्रत्येक शिल्पावर त्यांचे उत्कट प्रेम आहे.हे शिल्प वर्णन करताना आमच्या लक्षात येत होते.आपल्या घरालाच सरांनी ध्येय वेडापायी संग्रहालय बनविले आहे.त्यामध्ये हरिणतोंड,
गरुड,साप,मोर ,जटायू इत्यादी काष्ठशिल्पे मनाला मोहित करतात.सरांच्या संग्राहलयात प्राणी,पक्षी आणि मानवी आकाराची अंदाजे ३०० शिल्पे, त्यांच्या मुलाने रेखाटलेली पोट्रेट,निसर्ग चित्रे आणि मान्यवरांची चित्रे यांची पाच दालने ओथंबून भरलेली आहेत.आत्तापर्यत सरांना आणि संग्रहालयाला मिळालेली सन्मानपत्रे, सन्मानचिन्हे(ट्राॅफीज) आणि पदके इत्यादी पुरस्कारांच्या स्मृती एका दालनात पहावयास मिळतात. छंदाची जोपासना करुन संकलन व संवर्धन कसे करावे याचा दीपस्तंभ व पथदर्शक श्री रमेश जावीर सरआहेत.उजनी धरण परिसरात भटकंती करताना टिपलेली पाणथळी जागेवरील पक्ष्यांची चित्रे पाहून आणि भ्रमंतीचं वर्णन ऐकून प्रत्यक्ष दृश्यच डोळ्यासमोर उभं राहतं.जवळ जवळ दोन तास संग्रहालयातील शिल्प,चित्रं आणि त्यांची सुरस कथा ऐकून अवलियाची ग्रेटभेट घडली.ग्रुपवर चित्रात बघितलेली शिल्पं आज प्रत्यक्ष हाताळून याची देही याची डोळा मनसोक्त पाहता आली..दोन तास छंदवेड्या अवलिया संग्राहक, कलाकार, साहित्यिक सरांसोबत काष्ठशिल्पांचा ,चित्रांचा खजिना न्याहाळत काव्य,ललित लेख साहित्यिक गप्पांच्यामैफिलीत स्वरचित 'माझं मन' काव्य सादरीकरण करण्याची संधी मिळाली.तदनंतर श्री अमित कारंडे सरांनी हस्ताक्षररुपी अक्षर शिल्पांनी संग्रहालया विषयी अभिप्राय नोंदविला.
सरांच्या घरी त्याच दिवशी नातवाच्या वाढदिवसाच नियोजन चाललेलं असताना सुध्दा व्यस्त कार्यक्रमातून सरांनी आपला अमूल्य वेळ दिला.प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूलाउंच वाढलेली तुरीची झाड बघून गंमत वाटली.त्याच झाडांच्या शेंगा तोडून त्यावर ताव मारला.मग बागेतील फुलझाडे बघत सरांचा निरोप घेतला.आणि श्री रमेश जावीर सरांनी सुचविलेल्या पोसेवाडी ता.खानापूर येथील दुसऱ्या एका जिद्दी आणि ध्येयवेड्या संग्राहकाकडे पुरातन काळातील दुर्मिळ वस्तूंशी हितगुज साधायला मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग क्रमांक-६
माझी भटकंती भाग क्रमांक-१४०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:raviprema.blogspot.com
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment