मैत्री टूर नेकलेस पाॅंईट भाग क्रमांक-१४३






🦋🍁🌿💫🦋🍁🍀
                  मैत्री टूर 
भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी
२१ नोव्हेंबर २०२०
माझी भटकंती भाग क्रमांक-१४३ 
〰️〰️〰️〰️〰️〰️
**भाटघर धरण व नेकलेस पाॅंईट **
क्रमशः भाग क्रमांक-२
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
 काही वेळाने आम्ही घाटमाथ्यावर आल्यावर डावीकडून दुसरा घाट उतरायला सुरुवात केली.आंबाडे खिंडीपर्यंत हा घाट तीव्र उताराचा आहे. पुढे यु वळणावर थोडंसं थांबून दोन  जिल्ह्यांना सांधणाऱ्या घाटातल्या वाटेवर कृष्णा आणि निरा नद्यांच्या खोऱ्याच्या सीमेवर तर वाई सुभा आणि भोर संस्थानाच्या सीमारेषेवर उभारलो होतो.कारवीची बन आणि करवंदाच्या जाळ्या दाटीवाटीने दिसत होत्या.जणूकाही डोंगराच्या कॅनव्हासवर गवताचे लॉन जागोजागी लावलेले आहे.पायथा,
घेऱ्यावर आणि डोंगर रांगांच्या सोंडेवर असणारी गर्द झाडीत लपलेली गाव ,वाडीआणि वस्त्या (पेडा,पाळी,टोंग) दृष्टिस पडत होत्या.थोडावेळ तिथंच रेंगाळत हा नजारा नजरेखाली घेऊन, फोटोग्राफी करुन घाट उतरत उतरत भोरकडे निघालो.कारण भोर जवळील दोन्ही जिल्ह्यांची जिवनदायनी निरा नदीवरील इंग्रजांच्या काळातील भाटघर धरण व  सिनेसृष्टीतील झळकलेला निसर्ग निर्मित निरा नदीवरील "नेकलेस पाॅंईट" मित्रांना दाखवायचा होता..
    भोर शहरातील चौपाटी नामक भागातील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुढे निघालो.शहराच्या उत्तरेकडे भोर ते पुणे रस्त्यावरील भाटघर धरणाकडे निघालो.हे धरण इंग्रजांच्या काळातील काळ्या दगडांच्या तोडीत बांधलेले आहे.सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असून रस्त्या वरुनही धरणाची भिंत नजरेस पडते.काहीवेळाने धरणाजवळील रस्त्यावर पोहोचलो.गाडीतून पाय उतार होऊन धरण बघायला खाचऱ्यातल्या बांधावरुन निघालो.
आता बंदिस्त भिंतीचे कुंपण घातल्याने  नदीपात्रात उतरता येत नाही.त्यामुळे पाण्यात उतरता आले नाही.
कट्ट्यावरुनच धरणाची लांबवर पसरलेली दगडी भिंत बघितली आणि पुढे इंगवलीकडे मार्गस्थ झालो.दहा ते पंधरा मिनीटात एका टेकडीजवळ पोहोचलो.इंगवलीला जाणारा जोडरस्ता आला होता.
बाजूला गाडी पार्क करून रस्त्याच्या पल्याड खाली उतरून निघालो... लांबूनच निरा नदीचे पात्र स्त्रियांच्या गळ्यातील मौलिक दागिना "नेकलेस"सारखं विहंगम दिसत होतं.निसर्गाचे अलौकिक दुर्लभ दृश्य मनाला भुरळ घालते.सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या निसर्गरम्य परिसरात झालेले आहे.
दुतर्फा गवतझाडीचा नदी काठ आणि निळेशार वाहत्या पाण्याचा प्रवाह पाहून नेकलेस दागिन्याचे दृश्य उठावदारपणे नजरेत भरते.मग काय सगळ्यांनीच या सौंदर्याचे दृश्य मोबाईलमध्ये शुट केले.
काळ्याभिन्न कातळावर उभं राहून विविध पोजमध्ये ग्रुप व सिंगल फोटो काढले.दादांमुळे सुंदर स्पॉट बघायला मिळाल्याची पोचपावती मित्रांनी दिली.येथून जवळच मराठी चित्रपट सिल्व्हर व गोल्डन ज्युबली केलेल्या मराठीतील "दादा माणूस "शाहीर दादा कोंडके यांची चित्रनगरी आहे.पण लॉकडाउनमुळे ती पहाण्यासाठी बंद असल्याचे तेथील स्थानिक मित्राने सांगितले.
त्यामुळे थोडी निराशाच झाली.पण नंतरच्या वेळी नियोजन करुन स्टुडिओ पहायला जाण्याचे सुतोवाच केले.तदनंतर आम्ही कापूरहोळ कडे हायवेला निघालो.उन्ह वाढत होती आणि भुकेची वेळही जवळ आली होती.मग काय हायवेच्या सुप्रसिद्ध चांगल्या धाब्यावर जेवायला थांबायचे नियोजन सुरू झालं.
   एव्हाना आम्ही हायवेला आलो होतो.डिलक्स ए सी हॉटेलमध्ये गेलो.छानपैकी वॉश घेवुन स्टार्टरची अॉर्डर दिली.मुख्य मेनू पाहिजे तसा उपलब्ध नसल्याने तंदुरचिकन खाऊन तेथून काढता पाय घेतला. खेडशिवापूर टोलनाक्याच्या अलिकडे कल्याणी डाब्यावर चिकन मालवणी आणि भाकरीची आॅडर दिली. जेवणाची वाट बघत पुढं कसं जायचं यावर चर्चा चालु झाली.
हायवेने किंवा कोंढणपूर मार्गे पानशेत धरणगावला जावूया का यावर मंथन सुरू झाले.गुगल मॅपही चेक करुया...असं बोलत असतानाच तेथील मॅनेजरने कोंढणपूर मार्गे जावून ढोणज्यात उतरून खडकवासला वाल्हे मार्गे जावा.
तेवढ्यात आलेल्या जेवणाचा समाचार घ्यायला सुरुवात केली.
गरमागरम पातळ ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी चटकदार कमी तिखटाचा रस्सा आणि चिकन मालवणीचा आस्वाद घ्यायला सगळे तुटून पडले.कारण भुकेचे कावळे ओरडत होते.मस्तपैकी यथेच्छ ताव मारला.मेनूची चौकशी करायला मॅनेजर आल्यावर त्याला प्रतिप्रश्न केला.'तुम्ही सोलापूरचे काय? होय,तो म्हणाला.त्यामुळेच एवढी पातळ आणि स्वादिष्ट भाकरी खायला मिळाली.मस्तच फक्कड जेवण मिळाले म्हणटल्यावर त्याला समाधान वाटले आणि आमचीही समाधानाने क्षुधाशांती झाली.
क्रमशः भाग क्रमांक-२
माझी भटकंती भाग क्रमांक-१४३

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड