छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१४१
🍁🍂☘️🌿🍂🍁
छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची.
क्रमशः भाग क्रमांक-६
माझी भटकंती भाग क्रमांक-१४१
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालय पोसेवाडी ता. खानापूर जि.सांगली संग्राहक श्री भगवान जाधव
📷📼💿☎️⏰⌛🔦⚔️
परतीच्या वाटेवरील तालुक्याच्या ठिकाणा पासून जवळच असणा-या तीन एक किमीवरील पोसेवाडी संग्रहालयाकडे आम्ही निघालो.मोबाईलवरुन संपर्क साधला.त्यांनी बसस्थानकासमोर थांबा मी तुम्हाला घ्यायला येतो.असं सूचित केले.तदनंतर थोड्याच वेळात सफारी परिधान केलेली व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून आमच्या गाडीजवळ आली.आदबीने स्वागत करुन त्यांच्याच इशाऱ्यावर आमच्या दोन्ही गाड्या थोड्याच वेळात कच्च्या रस्त्याने संग्रहालया जवळ आल्या.नुकतेच बांधकाम केलेला सुबक बंगला होता.या संग्राहकाने आपल्याच घरालाच संग्रहालय बनविले होते.संग्रहालयातील चीजवस्तूंच्या मांडणीचं काम चालू होते.
सभागृहातील समोरील भिंतीवरची शोकेस गौरवशाली सन्मानचिन्हांनी व सन्मान पत्रांनी ओसंडून वाहत होती.यावरुनच या संग्रहालयाचा दर्जा आमचा मनात अधोरेखित झाला.मग आम्ही जिन्याने पहिल्या मजल्यावर जाताना छोटेखानी दीपमाळेने आमचं स्वागत केलं.अद्भुत चीजवस्तू अनेक जिन्नस आमची नजर वेधायला लागले.श्रीमान भगवानरावांनी कपाटात सुबकपणे मांडलेल्या चीजवस्तूंची ओळख सांगायला सुरुवात केली.स्वयंपाक व देवघरातील जर्मल,तांब्या पितळेची भांडी,शेतीच्या मशागतीची हत्यारे,
वजनमापे, रेडिओ,अनेकविध आकारातील अडकित्ते, कुलूपे, कॅमेरे,समया,आरसे, तंबाखू व चुन्याच्या डब्या, ऐतिहासिक काळातील शस्त्रे,दारुगोळे,प्राण्यांची शिंगे,भांडी ग्रामोफोनच्या तबकड्या,प्रसाधन साहित्य पेट्या, टेलिफोन,बॅटऱ्या, पानपुडे,खलबत्ते,फिरकीचे तांबे, पणत्या, नंदादीप,किटल्या,गॅसबत्ता, कंदील,
सुंदऱ्या,स्टोव्ह, टाईपरायटर अशा अनेकविध जिन्नसांची आम्हाला नव्याने ओळख झाली.काय पहावे कसं पहावं आणि किती पहावं असं झालं होतं.चीजवस्तू हातात घेऊन पहावू लागलो.अवलियाची ग्रेटभेट आणि मुशाफरीची सफलता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.ऐतिहासिक तलवारी,भाले, दांडपट्टा आणि बर्ची पाहून मन मोहित झाले.हाताळून पाहताना तत्परतेने श्री संतोष सरांनी आमची पोज कॅमेऱ्यात कैद केली.
आमच्या उंचीपेक्षा लांब आणि बलदंड शस्त्रे हाताळून काही वेळातच हात दुखायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे रणांगण गाजविणारे शिबंदी मावळे ही शस्त्रे गनिमांवर कशी उगारित असतील याची प्रचिती आली.जुने टेलिफोन केवळ सिनेमात पाहिले होते.ते आज प्रत्यक्ष हाताळून फोन करण्याची संधी मिळाली.तो क्षण अचूकपणे अमितने कॅमेऱ्यात टिपला.अप्रतिम जिन्नसांचे अद्भुत चीजवस्तूंचे भांडार आज प्रत्यक्ष हाताळून बघायला मिळाले.त्याच्या अलौकिक कथाही ऐकायला मिळाल्या.बॅलन्सिंग बाहुलीने तर मनाला मोहिनी घातली.किती वेळा पाहिली तरी ओशाळल्या प्रमाणे मन तिकडचं धावत होतं.सगळ्याच वस्तू मनाला भुरळ घालीत होत्या.काय बघू आणि किती बघू असं झालं होतं.पण परतीचा पल्ला लांब होता.मनाला मुरड घालत असताना, एकमेकांना नेत्रपल्लवीने आवरते घेण्याच्या खाणाखुणा चालू असतानाच भगवानरावांनी एका टेबलावरील पांढरा पडदा दूर केला आणि जुन्याकाळातील पेटीचे झाकण अलगद उचलून वर केले..
"ग्रामोफोन "जुन्या काळातील चित्रपटात ऐश्वर्य आणि शौकीनतेचे प्रतिक असणाऱ्या गर्भश्रीमंत,रसिक मनाच्या चरित्र अभिनेत्याच्या प्रसादातील दिवाणखान्याची आठवण आली.
दिवाणखान्यातल्या घडवंचीवरल्या 'ग्रामोफोनवर' गाजलेली श्रवणीय गाणी ऐकतानाचे दृश्य डोळ्यासमोर तराळले.त्यावेळी ग्रामोफोनवर तबकडीतील हिमालय की गोदमे सिनेमातील हिंदी गाणे'चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था!' ऐकायला मिळाले.हा दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळाल्याने प्रवासातील माईलस्टोन आणि मास्टरपीस ठरला.गाणं ऐकूण सगळे प्रफुल्लित झाले.हा अवर्णनीय क्षण कॅमेऱ्यात शुट केला.देहभान हरपले,हरकले. तदनंतर आमचे मार्गदर्शक श्रीमान दीपक चिकणे सरांनी स्वनिर्मित गणपती बाप्पा व परिमळ काव्यसंग्रह आठवण भेट देऊन संग्राहक श्री भगवान जाधव यांचा सन्मान केला.प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गातील मुलांना गुरुजींनी संग्रह (उपक्रम, प्रकल्प) तयार करायला सांगितला होता.तेव्हा भगवानने केलेल्या संग्रहाचे वर्गात कौतुक केले होते.त्याच कौतुकाने प्रेरित होऊन त्यांनी अभ्यागतांना मंत्रमुग्ध करुन भुरळ घालणारा खजिना संग्रहरुपात जीवापाड जपून प्रदर्शिनीय केला आहे.त्यांच्या ध्येय,जिद्द, चिकाटी आणि ध्यासाला त्रिवार मानाचा मुजराच केलाच पाहिजे.काहीवेळा मानहानी पत्करुन ,पदरमोड करून त्यांनी हजारो नामांकित व मान्यवर सुपरिचित व्यक्तिंच्या हजारो स्वाक्षऱ्या मिळविल्या आहेत.हजारो पोस्टाची तिकिटे व काड्यापेट्यांचे संकलन केले आहे.एका पतसंस्थेत नोकरीला असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी वाचनालयाची स्थापनाही केली आहे.
नामांकित शहरात अनेकवेळा संग्रहालयाची प्रदर्शिने भरवली असून त्यांच्या या कार्याची दखल अनेक प्रसारमाध्यमांनी घेतलेली आहे.अशा अवलियाची ग्रेटभेट झाली होती.चहापानाने आदरातिथ्य केले.मग त्यांच्या समवेत ग्रुप फोटो काढताना,त्यांनी कन्येला फोटो काढण्यासाठी हाक मारली.तो कन्येचा चेहरा बघताच संतोष सरांच्या डोक्यात क्लिक झाले.
हा चेहरा वेबसिरीज मध्ये पाहिलेला दिसतोय.
त्यांनी विचारपूस केली.तेव्हा समजले की जाधव कन्या 'एक गाव तेरा भानगडी' वेबसिरीज मधील नायिका आहे.तिथंच गप्पा रंगल्या तेव्हा उमजलेकी अभिनया सोबत तिची नृत्य निपुणता असून तिच्या नृत्याच्या रेकॉर्डची हॅट्रिक लिम्का बुकमध्ये झालेली आहे.ग्रेट पिता आणि कन्येची भेट घडली.त्यांचे मूळ गाव परळी ता.सातारा येथील आहे.हे समजल्यावार सातारा जिल्ह्याची गौरवशाली पताका इथेही डौलत आहे.याचा सार्थ अभिमान वाटला.ही ग्रेटभेट हृदयाच्या कप्प्यात साठवत आम्ही लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे संग्राहक श्री भगवान जाधव आणि कन्येचा निरोप घेऊन परतीच्या वाटेवर निघालो.खानापूर-वीटा करत करत कराड शहरात न जाताना शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे कृष्णा नाका- बनवडी- सैदापूर -सह्याद्री कारखाना मार्गे मसूरलाआलो.एका हॉटेलमध्ये चहापान करताना श्री उध्दव निकम सरांनी शुभवार्ता दिली.त्यांची कन्या इंजिनिअरिंग पदविका परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवून स्पृहणिय यश मिळविल्याची शुभवार्ता दिली.
तिथेच सर्वांनी सरांचे आणि कन्येचे अभिनंदन केले.
आणि सेलिब्रेशन मेजवानी देवून साजरे करण्याचा मनसुबा जाहीर केला.तदनंतर उंब्रज हायवे पास करत करत महाराजा हॉटेलमध्ये पोहोचलो.मित्रांच्या आग्रहाच्या विनंतीचा सन्मान करण्यासाठी आमचे आदरणीय पत्रकार शिक्षक मित्र श्री सुनील शेडगे (आप्पा) थंडीची तमा न बाळगता हॉटेलमध्ये भेटीला आले.मग काय जेवण येईपर्यंत गप्पांची मैफिल रंगली.साहित्य आणि सरांची लेखन शैली यावर गप्पागोष्टी झाल्या.आवडीप्रमाणे शाकाहारी व मांसाहारी भोजनावर यथेच्छ ताव मारला.
एकमेकांचे आभार व निरोप घेऊन प्रवास भेटीचा समारोप केला.आणि सातारा-वाई- महाबळेश्वर करत घराकडे मार्गस्थ झालो.
आभार व धन्यवाद
माझी भटकंती भाग क्रमांक-१४१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment