यात्रेतलं जेवण

             

      

 पाहुणचार : यात्रेतलं जेवण 

आपल्याकडं गावोगावी दरवर्षी ग्रामदैवताच्या  यात्रा दोन दिवस आयोजित करण्याचा प्रघात आहे.काहीजण या दोन दिवसांना काही ठिकाणी ताजी व शिळी यात्रा तर काही ठिकाणी भर व फूट यात्रा संबोधतात.ताज्या यात्रेला देवाच्या सवाष्णि असतात.पुरळपोळीचा बेत घरोघरी असतो.देवाचा त्या दिवशी छबिना असतो...
सगळे परगावी असणारे गावकरी गावाकडे आलेले असतात.सासुरवाशिनी माहेराला आलेल्या असतात.इतरही सगेसोयरे, मित्रमंडळी आणि पाहुणेरावळ्यांचेही आगमन झालेले असते.त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते.. यात्रेच्या दुसऱ्या   दिवशी चिकन आणि मटणाचा  सामिष जेवणाचा बेत शिजत असतो.
काहीजणांच्या गोतावळा  मोठा असल्यामुळे आख्खं बकर किंवा बोकडाचा बेत केलेला असतो.घराबाहेर  दगडवीटांची चूल मांडून त्यावर पातेलं किंवा तपेलं ठेवलेलं असतं.हळदमीठ लावलेलं, कांदा लसूण आणि आल्याच्या फोडणीचं मटाण तेलात परतून पातेल्यात शिजत घातलेलं असतं.त्याचा घमघमाट सगळीकडे सुटलेला असतो.
नुसत्या तेलातल्या वाफेवर पहिल्यांदा वाफवले जाते नंतर काहीवेळाने गरम पाणी टाकून उलतान्याने खालवर करतात.मग झाकण ठेवून शिजवतात.तोपर्यत घरातल्या महिला मसाल्याची तयारी करत असतात. कांदा विस्तवावर होरपळून मग पाट्यावर वरवंट्याखाली रगडून बारीक करणे.खोबरे भाजून किंवा तळून टेचणे.आलं,लसूण कोथिंबीरीची पाट्यावर टेचून-वाटून पेस्ट करणे, खसखस,तीळ पाटा अथवा खलबत्त्यात ठेचून पूड करणे.चव आणि तिखटपणा येण्यासाठी खडामसाला (लवंग, दालचिनी, मिरं,जायफळ,मसाला वेलची) आणि लालभडक रंगाची मिरची किंवा घरी बनविलेल्या चटणीचा (तिखट) उपयोग करून मसाला तयार करून ठेवणं. हल्ली मिक्सर मधून पाहिजे तसा कमी वेळात मसाला तयार होतो.पण पाटा वरवंटा,उखळ आणि  खलबत्त्यात कुटलेल्या ओबडधोबड मसाल्याची जी लज्जत असते ती मिक्सरच्या मसाल्यात नाय.लय भारी चव घरच्या तयार मसाल्याला असतीया..तवर हिकडं रटरट सागुती शिजत असतात.त्याचा गंध दरवळत असतो.हाडकाचे दोन-तीन पीस एखाद्या वाडग्यात  काढून मटण शिजलयका खाची खात्री घरातल्याच एक्स्पर्टला(सुगरणीला) खायला देवून केली जाते. अळणी रस्साच्या फुरका मारला जातो.त्यामुळं मीठाला कसं हाय ते समजतं.जवळच घरातली पोरं असतील तर त्यांनाही आळणी रस्सा आणि एखाद दुसरा मऊ बाव(पीस) नाहीतर काळजाचा तुकडा खायला लावतात..पोरही खात खात चांगलं लागतंय म्हणत डीशमधील गरमागरम अळणी रस्साच्या फुरका मारत घोट घेत असतं...
 एकदाचं मटण शिजल्याची खात्री झाल्यावर मटणाचे तुकडे (पीस) झाऱ्याने एका पातेल्यात काढून ठेवतात.अळणी रस्साही मुलांसाठी बाजूला काढून ठेवतात. काही ठिकाणी मसाल्याचं सुक्क मटण तयार करतात.तर काही ठिकाणी उकड मटणच वाढतात.वेगळ्या पातेल्यात मसाल्याची फोडणी करुन शिजवलेल्या  भांड्यात टाकून खमंग पातळ रस्सा (कढाण) बनवितात.मंद आचेवर उकळत ठेवतात.. चुलीवरचं गरमागरम भाकरी ,रस्सा , सागुतीवर आणि कांदा,लिंबाची फोड (सलाड) असा गावरान बेत यात्रेचा असतो.पितळीला वटकावन लावून गरमागरम रस्स्यात भाकरी कुस्करून खायची गंमतच न्यारी.रस्स्याचा घोट घेत, मटणाचा तुकडा चघळून खात,नळीतला मगज तोंडाचा चंबू करून ओढून खाण्याचा आनंद काही औरच असतो.यथेच्छ पोटाला तडस लागेपर्यंत यात्रेचे जेवण साजरे होते....
 काही यात्रेतल्या  जेवणाची चव कायम जिभेवर रेंगाळत असते.पसरणी (मालकमपेठ) येथील माझ्या मित्राच्या बहिणीच्या घरी सोबणी लावून पितळीत भाकरी कुस्करून केलेले जेवण एकदम मस्त मेजवानी असायची.प्रमोदरावच्या आजोळी मालगाव यात्रेतल्या जेवणाचा स्वादिष्टपणा अप्रतिम ,तिथली बिर्याणी लाजवाब असायची.दिमतीला कडक गरम बाजरीची भाकरी आणि सुक्क मटण खासी मेजवानी चाखायला मिळायची.आमचे मित्र पोळ सरांच्या सासरवाडीतलं (बेलवडे पाटण) यात्रेची सरबराई पक्कडच बेत होता. आळणी उक्कड,सागुती आणि पातळ रस्सा असा अस्सल गावरान बेत होता.ते यात्रेचे दिवस आजही आठवले की तोंडाला पाणी सुटतंच.मनसोक्त जेवणावर ताव मारला होता.आमचे दाजी राजेंद्र मांढरे यांच्या वडाचीवाडीच्या यात्रेतील खासच बेत असायचा. गरमागरम खरपूस चुलीवरची भाकरी,सुक्क मटण, पातळसर रस्सा आणि नव्या इंद्रायणी तांदळाचा वाफाळलेला गिजगाभात आणि आग्रह  लयभारी बेस्ट मेजवानीअसायची.ओझर्डे,कवठे,किकली,शेंदुरजणे,
बावधन,चिखली, भुईंज,व्याजवाडी आणि अभेपुरी गावातील अनेक स्नेही, पाहुणे आणि निमंत्रितांच्या  घरी यात्रेला गावरान जेवणाचा खुमासदार आग्रहाचा यथेच्छ बेत असतो...
अस्सा हा यात्रेचा सामिष आहार असायचा.यात्रा स्पेशलायझेशन असायचे. पाहुण्यारावळ्यांना अगत्याने आवतानंं देवून आग्रहाने भरपेट जेवण खाऊ घालायचं. ..त्या त्या गावची यात्रा आलीकी आठव येते.अन्
आठवणीनेच तोंडाला पाणी सुटते....जिभेवर स्वाद येऊन चव जिभेवर रेंगाळते.

➖➖➖➖➖➖➖

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड