साठवणीतल्या आठवणी कॅसेट--ऑडिओ





                📼कॅसेट--ऑडिओ📼
साठवणीतल्या आठवणी 
              रिळाची कॅसेट 

प्रजासत्ताक दिन आणि ७४ वा स्वातंत्र्यदिन कोविड१९ या संसर्गजन्य आजारामुळे शारीरिक अंतर ठेवून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांच्या समवेत साजरा करावा लागला. विना विद्यार्थी कार्यक्रम साजरा होतोय.. नाहीतर दोनचार दिवस अगोदर सरावाच्या तयारीसाठीलागायचे.प्रभातफेरी,ध्वजारोहण, भाषणं,शालेय साहित्य वाटप, खाऊवाटप व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित केले जायचे.त्याचे नियोजन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि कवायतीची रंगीत तालीम टेपरेकॉर्डरच्या कॅसेटवर केली जायची.सकाळी लवकर शाळेत जाऊन लाऊड स्पिकरवर देशभक्तीची गोडवे गाणारी अजरामर आणि श्रवणीय गाणी लावून स्वातंत्र दिनाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा माहोल तयार व्हायचा. बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो|, जयोऽस्तुतेऽऽ श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे|,आचंद्र सूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे | मेरे देश की धरती,नन्हा मुन्ना राही हूॅं,देश का शिपाई हूॅं,बोलो मेरे संग जयहिंद जयहिंद,सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा |,मेरा रंग दे बसंती चोला, ऐ मेरे प्यारे वतन अशी सुपरहिट गाणी ऐकायला मिळायची.सीडीप्लेअर ,मोबाईलचा आणि ब्लूटूथचा जमाना नव्हता तेंव्हा रिळाच्या कॅसेटातील गाणी शाळेच्या टेपरेकॉर्डर वर वाजवली जायची.
 साधारणपणे दहा वर्षांच्या पाठीमागे टेपरेकॉर्डर आणि कॅसेट अथवा सीडीप्लेअर आणि सीडी ,व्हीसीडीची जोडी जमायची.आज प्रकर्षाने टेपरेकॉर्डर आणि कॅसेटची आठवण आली.पूर्वी घराघरात टूईनवनचा जमाना होता.
आकाशवाणीवरील प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ आणि पाहिजे ते गाणं,नाटकं, गोष्टी,पोवाडे,कथा,किर्तन आणि व्याख्यान ऐकायला कॅसेट टेपमध्ये टाकून बटन आॉन केले की ऐकायला मिळायचे.शाळेतही प्रार्थना,गोष्टी, समुहगीते आणि कविता ऐकायला हमखास उपयोग केला जात होता.त्यावेळी त्याचे कुतूहल वाटायचे.मी माझ्या शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातील रेकॉर्ड डान्स कॅसेट--ऑडिओ वरच पंधरा वर्षांपूर्वी सादर केले होते.
कॅसेट प्लॅस्टिकच्या कव्हरात रीळ असणारी आयताकृती छोटेखानी प्लॅस्टिकची पेटी.ती कॅसेट कशाची व कोणत्या कंपनीची  आहे.याची माहिती त्याच्या कव्हरवर प्रिंट केलेली असते. गोलाकार  तबकडी अन् त्यावर रीळ गुंडाळलेले असत. A व Bदोन साईड असत . रीळावर ध्वनी मुद्रित केलेला असायचा . कॅसेट- टेपरेकॉर्डर मध्ये लावली की दोन्ही आतील चाकं एका दिशेने फिरताना ऐकायला मिळायचा. 
काही हौशी रसिकांनी तर याच कॅसेटची संग्रहीवृत्ती जोपासली होती.आमच्या ओझर्डे  हायस्कूल मधील लेखनिक श्री सतिश पाटील सरांनी घरातील एका भिंतीवर कॅसेटची शोकेस केली होती.सुमारे ५०० कॅसेट्स सहज असतील.आम्ही कधीमधी खोलीवर गेलोकी आशाळभूत नजरेने लहानपणी बघत बसायचो.
यावरुन त्यांची गाण्याची आवड आणि संग्राहकवृत्ती  लक्षात यायची.कित्येक जण गाणं स्टेरिओ सिस्टीम सारखं ऐकायला यावं म्हणून टेपला जादाचा साधा साऊंड जोडून तो मडक्यावर ठेवायचा.मनपसंत  गाणं दिलखुलास पणे ऐकायचं.
    आमच्या काकांनी (कै.अरुण डांगरे)सुध्दा भजन, गाणी, पोवाडे आणि लोकगीतांच्या कितीतरी कॅसेट शोकेस करून जपून ठेवलेल्या होत्या.त्यांनीच मला पद्माकर गोवईकर  यांनी मुद्रित केलेली संत ज्ञानेश्वरांची "मुंगी उडाली आकाशी" या कादंबरी वाचनाची कॅसेट मी शिक्षक झाल्यावर दिली होती.
नटसम्राट आणि एकच प्याला मधील नाट्यछटेला याच कॅसटने आवाजातील चढ उतार आणि भाव शिकवले होते.असं हे कॅसेट-रेकॉर्डरवर लावलेलं साहित्य मनाला विरंगुळा देवून मूड बदलायला उपयोगी पडायचं...
 दूरचित्रवाणीच्या बरोबरीने टूईनवन अथवा टेपरेकॉर्डर  घरोघरी मनोरंजन, ज्ञानप्रसाराचे आणि दैनंदिन जगातल्या घडामोडी दाखविण्याचं,ऐकवण्याच  काम करीत असायचे...कालौघात नवनवीन
 तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने इंटरनेटच्या जमान्यात घरबसल्या एका क्लिक वर पाहिजे ती माहिती उपलब्ध होते.पीडीएफ,युटू्यब,एम पी ३ एमपी ४ इत्यादी स्वरुपात ऐकायला ,पहायला व वाचायला मिळते.
ग्रामोफोनची तबकडी, कॅसेट,सीडी, डीव्हीडी,पेन ड्राईव्ह एम पी ३ एम ४ इतका तंत्राचा बदल दिसतो.अगोदर वस्तू आकाराने मोठी अन् साठवण(मेमरी) कमी तर आता वस्तू छोटी पण साठवण( मेमरी )मोठी अशी किमया साधली आहे.
तंत्रज्ञान सतत विकसित होतय बदलत आहे.पण आठवणीत दुर्मिळ आणि नातं जडलेल्या वस्तुंचा ठेवाच मनात कायम घर करून राहतो. काही श्रवणीय गाणी टि.व्ही.किंवा रेडिओवर ऐकल्यावर कॅसेटची आठवण हमखास येते....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड