निसर्ग सहवास पूर्वार्ध भाग क्रमांक-१३४
🌳🍃🌳🍂🍃☘️
निसर्गाच्या सहवासात
पूर्वार्ध भाग क्रमांक-१३४
सन -२०२०
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त आपल्याच बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो.यावर्षी धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलाशयाच्या काठावरील निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या कातकरी वस्तीतील आपल्या बांधवांकडे निघालो होतो.त्या वस्तीतील मुले आमच्या शाळेत आहेत.त्यांचीही भेट आणि दिवाळी भेट देणं असं नियोजन. नेहमीच्याच शाळेच्या रस्त्याने आम्ही जात होतो. वस्तीतील लोकांना देण्यासाठी दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंचे " दिवाळी कीट" फराळ आणि साडी घेऊन निघालो होतो.जांभळीचा पुल ओलांडून वाशिवलीचे चढण पार करताना अचानक लक्षात आलं.इथं काही कुटूंब रहात आहेत.लगेच भास्करला गाडी थांबवायला सांगितली. आम्ही भेटवस्तू घेऊन चढावावर गेलो.हाक मारली . छोट्याशा दारातून दोघेजण बाहेर आले.आम्हाला बघून कावरे बावरे झाले.दोन कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्या.सहजच समोरच दृश्य पाहून मित्रांशी गुज केले. आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी विविध ठिकाणी विविध लोकेशन्स पाहतो.तिथं आपलं घर म्हणून मुहमॉंगे दाम देऊन आपण तिथं काही दिवस राहतो.आपला थकवा कंटाळा दूर होऊन आपण ताजेतवाने होतो.सुंदर छान निसर्गरम्य अशा लूकवर आपण भाळतो.अन ही माणसं उदरनिर्वाहासाठी सदाकाळ याच ठिकाणी राहत असतात.आपण आपल्या समाधानासाठी शांततेसाठी अशी ठिकाणं धुंडाळत असतो आणि ही लोक तर 24 तास निसर्गाच्या सानिध्यात जमीनीवर काट्या चिपाट्याची ,कागदाचीआणि साडयांची झोपडी बांधून राहतात. आकाशाची चादर आणि जमिनीची वाकळ बनवून जलाशयातील मासे खेकडे पकडून विकतात. काही वेळा शेतीच्या हंगामात शेतीत काम करुन उदरनिर्वाह करीत चरितार्थ चालवून समाधानी राहतात.
आपण मात्र सर्व भौतिक सुखाची साधने असून सुद्धा नेमकं सुख कशात आहे हेच शोधत भटकत फिरत असतो. तदनंतर आमची गाडी कोंढावळे गावाच्या बावीच्या ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे आली.गाडी रस्त्याच्या कडेला लावली.आणि साहित्य घेऊन वस्तीत बांधावरची पायवाट तुडवत निघालो.ही वस्ती तर अगदी जलाशयाच्या काठावर होती.
दहाऐक कुटूंब मजेत राहतं होती.
आम्ही पोहोचलो तेव्हा लहान मुलांचा खेळाचा डाव रंगला होता.ओळखीची शाळकरी मुले जवळ आली.आम्ही आणलेल्या खाकी पुड्यावर नजर स्थिरावली.
त्यात काय असेल ते शोधू लागली.
आम्ही प्रत्येक झोपडीच्या पुढं जाऊन दिवाळीच्या भेट वस्तू दिल्या.अचानक मिळालेल्या भेटीने मिळालेला आनंद चेहऱ्यावर दिसत होता.मग कोणाची पालं साड्या पासून बनवलेली कोणाची काड्यां पासून बनवलेली तर काहींची प्लास्टिकच्या कागदापासून बनवलेली होती आणि अशा वस्तीत जलाशयाच्या काठावर ना लाईट ना पक्कं घर भौतिक सुविधांचा अभाव असताना सुद्धा केवळ निसर्गाच्या सानिध्यात आपला उघडा संसार मांडून आनंदात मजेत राहत होती.त्यांच्यात चाललेली कुजबुज भाषेपेक्षा चेहऱ्यावरील भावनेने आमच्या लक्षात आली.
इथली वस्तुस्थिती पाहून आणलेली मदत सार्थकी लागल्याची प्रतिक्रिया मित्रांनी दिली.मग आम्ही पुढे वासोळे मार्गे उळुंब-बलकवडी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या वस्तीकडे निघालो.जाताना उजव्या बाजूला कोळेश्वर डोंगराची रांग आणि डाव्या बाजूने अथांग पसरलेला जलाशय यामधील सडकेने आम्ही पुढे निघालो. कोंढमाळा जवळ थांबून श्री सुनील जाधव यांनी घरून आणलेला दिवाळीचा फराळ खायला सुरुवात केली.लाडू ,चिवडा आणि शंकरपाळे या पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. अथांग दिसणारा जलाशय पाहून मन प्रसन्न झाले. मनसोक्त विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली. नेहमीच्याच वाटेवर असणारा हा परिसर परंतु प्रत्येक वेळी त्याचं नवरुप आपणाला दिसतं.त्या रुपानं मन मोहरुन जाते.अल्लड मन दृश्य टिपत राहते.खिडकीतून दिसणारे पिवळसर गवत तर कुठे गर्ददाटीचे हिरवे पुंजके बघत. लांबूनच दिसणारा कमळगड आणि नवरानवरीचा डोंगर पाहत भविष्यात आपणही दिवाळीनंतर एखाद्या किल्ल्याच्या भटकंतीला जाण्याचे नियोजन चाललं होतं.गाडी भिवडीच्या पुढे आल्यावर एका निसर्गरम्य ठिकाणी आमची गाडी फणसे सरांनी थांबवली.तिथल्या निसर्गाचे अवलोकन करत, न्याहाळत होतो. अथांग जलाशय डोळे भरून पाहत मस्तपैकी फोटोग्राफी करत होतो त्यानंतर आम्ही विस्थापित झालेल्या चांदवडी आणि आसगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे असणाऱ्या गायरानात म्हशी चरत होत्या.गाडी थांबवून तिथून दिसणारा धरणाचा लुक बघत गवत तुडवत जलाशयाच्या जवळ गेलो. दोन्ही नद्यांच्या संगमावर उभे होतो. बसून समोर दिसणारे धरणाचे दृश्य नजरेत साठवत होतो.पाण्याचा पायांना स्पर्श होताच थंडगार वाटले.पाण्यातील खडकावर उभे राहून छबी टिपली.आणि परतवडी येथे असणारे श्री रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधून तिकडे निघालो.
भाग क्रमांक क्रमशः१३४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment