बालपणीच्या साठवणीतल्या आठवणी वात्रटपणा



बालपणीच्या आठवणी
      वात्रटपणा 
〰️⚡〰️⚡〰️⚡〰️⚡
चेष्टामस्करी,अवखळपणा आणि वात्रटपणा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे खट्याळपणा..विभोर मन असतं.नंतर काय होईल याची तमा न बाळगता कुठेही उंडारण, फिरणं, समवयस्क दोस्तांशी गप्पागोष्टी करणं, खेळणं.प्रसंगी भांडणं आणि थोड्या वेळाने एक होणं.
आळीतल्या लग्नात धमाल करणं,मुद्दाम उचापती करणं असं चालूच असतं.पंगतीला जेवाय वाढायची लय हौस असेलतर . पंगतीला काय हवनको बघणारे असतात.ते वाढप्यांना सतत दटावत असतात. हे असं नस्तं वाढायचं,हे अगोदर वाढा, तिथं पाणी वाढा,गंध नीट लावा. नुस्ती खेकसाखेकसी चालायची, लय राग यायचा अशा माणसांचा..पण काय करणार? कार्य व्यवस्थित पार पाडणं महत्त्वाचं असायचं.
एकदा आमच्या आळीतल्या एका मित्राचे लग्न वीर ते जेजुरी भागातील एका वाडीत होत.गावातल्याच टेम्पोने व-हाड जाणार होतं. सकाळी सहाचे  वऱ्हाड सात वाजता  निघालं.टेम्पो खचाखच भरलेला होता.काहीजण टपावर, फाळक्यावर बसलेले होते.दाटीवाटीनं कोंडवाडा झाला होता.त्यात अचानक ब्रेक मारला की फाळक्यावली सगळी बसलेल्यांच्या अंगावर आदळायची.त्यामुळं कावाकावी आणि शिव्या तोंडातनं बाहेर पडायच्याच. ड्रायव्हर पोलिस एन्ट्री चुकवण्यासाठी आडमार्गाने गाडी चालवायचा.त्यामुळं मागं धुरळा उडायचा,पोरं वरडायची आणि आयाबाया कावायच्या असं करत करत एकदाचं वऱ्हाड गावाच्या जवळ वेशीवर पोहचलं.सगळी पोरं उड्या मारुन खाली उतरली.'फाळका पाडस्तोवर दम नाय कारट्यांना,'डायव्हर कोकालला,शिव्यादेतच फाळका पाडला.राहिलेली माणसं खाली उतारली.बायकामाणसं उतरायला लागल्यावर कोणीतरी खेकासलं बायकांनी खाली उतरु नका,'ओ ड्रायव्हर, टेम्पो जाऊदे डायरेक्ट जानवसा घरी.' मग टेम्पो निघाला.आम्ही पोरं आणि माणसं तिथच रस्त्यावर.तेवढ्यात घोडंवाला आमच्या जवळ आला..बॅण्डचा आवाजही ऐकू येऊ लागला.भेट घेण्यासाठी तयारीची लगबग सुरू झाली.नवरदेव  सजवलेल्या घोड्यावर बसला.दोन्हीकडच्या पाच-पाच माणसांची एकमेकांना टावेलटोपीचा मान आणि पानसुपारी नारळाचा मान दिला.गळाभेट आणि रामराम घालतानाच शिंगाड्याने तुतारी फुंकून मंगलमय सोहळ्यास प्रारंभ केला.लगेच वाजंत्री तालात वाजायला लागलीआन त्याच्या तालावर घोडं नाचू लागलं.ते बघत विज्या आणि मी चाललो होतो.
घोडवाला दोरी ओढून घोडं कसं नाचवतोय त्याकडे आमचं लक्ष होतं.नवरदेव मंडपाशी आला.त्याची ओवाळणी झाली.मंडपातच सगळयांना चहा दिला.अन् माईकवरुन आवाज आला हळद लावायच्या कार्यक्रमाच्या तयारीला लवकर लागा.
     तासाभराने हळदीचा कार्यक्रम झाल्याव मांडवातच जेवायला बसायची तयारी झाली.गावची वाडी एका डगरीच्या चढ उताराला वसली होती.त्यामुळं आमची वरंगळती पंगत बसली.पत्रावळ्या,द्रोण वाढणाऱ्याकडून चांगली पत्रावळी व द्रोण काहीजण बदलून घेत होते.वाऱ्याच्या झुळकिने पत्रावळ उडू नये म्हणून काहींचा हात पत्रावळीवर होता.मस्तपैकी शिरा,भात आमटीचं जेवण वाढायला सुरुवात झाली .गंध लावला.आणि श्र्लोक म्हणून जेवायला बसायची विनंती पंगतीला केली. गरमागरम भात आमटी खात होतं अधूनमधून आमटीचा फुरका मारत जेवण चाललं होतं.मी विज्याला म्हणालो,'आमटीची चव आज लय भारी लागतीय.' त्यावर तो म्हणाला ,'बाजरीचं आणि डाळीच्या पीठाची हाय ,त्यामुळं चवदार लागतीय.' खाली बघतोय तर काय उतारामुळं भातातली आमटी ओघळत होती आणि द्रोणातली पिण्यानं संपत होती. आमटी चांगली झाल्यामुळे जो तो ठसका लागेपर्यंत आमटी पीत होता.त्यामुळं आमटी वाढणाऱ्याला सारखी पळापळ करावी लागत होती. मस्तपैकी जेवण झालं होतं.हातावर पाणी पडल्यावर आळीतले मैतर एकेक जमू लागले.लग्नाची वेळ साडेचारची होती.त्यामुळ कुठं तरी एखाद्या शेतातल्या झाडाखाली बसून गप्पा मारत डुलकी काढायचा विचार दोस्तांच्या कानावर घातला. मी,विज्या,बाळ्या,पम्या,मोठा बाळ्या,बाप्या,अरुण आणि रमेश अशी जुळणी झाली आणि शिवारात झाडाचा शोध घेत घेत आम्ही निघालो.डांबरी रस्त्याच्या पलीकडे डाळिंब व मोसंबीच्या बागा दिसत होत्या.कुणी बघत नाही याचा अदमास घेऊन एका मोसंबीच्या बागेत लपत छपत  घुसलो.बागेतल्या झाडाला भरपूर मोसंबी लगडली होती.ते बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं.म्हणतात ना पोट भरलं होतं पण मन भरलं नव्हतं.चांगल्या,
मोठाल्या आणि पिवळ्या पिवळ्या टपोऱ्या मोसंब्या शोधायला काहींची सुरुवात झाली.झाडावर चढून ,फांदी वढून मोसंबी तोडायला सुरुवात झाली.
दुसऱ्याच्या गावात येऊन पुढं काय होईल याची तमा न बाळगता आमचा उपद्व्याप सुरु होता.चारपाच तशीच साली काढून खाल्ली.तोडताना,खाताना गप्प बसतोय होय.हसण्या खिदळण्यान हळूहळू गलका वाढाय लागला.मनसोक्त खावून ,खिसेही भरले.आमचा आवाज वाढायला लागला.बाळ्या तर खिसा भरुन ओरडतच आला.हाताने टपोऱ्या संत्र्याची अॅक्शन करत बोलला,'मामाऽऽऽया बघ मोसंब्या' आणि 
याचवेळी कोणीतरी आमच्या दिशेने कोण आहे?कोण आहे? म्हणत, शिव्या देत , दगड मारत कुणीतरी फेटेवाला येत असल्याचं दिसल्या बरोबर चकाटधूम पळत  वाटं दिसेल तिकडं सैरभैर पळालो.
बांधान,बागेतनं त्याच्या हातातल्या ढिकळाचा  मार चुकवत आमच्या सगळ्यांची पांगापांग झाली.उलट्या दिशेने ओढ्याकडे पसार झालो.कोणीच त्याच्या तावडीत सापडले नाही.त्या बाबांना दिसू नये म्हणून लांब ओढ्याओढ्याने ठेचकाळत गेलो आणि एका डाळिंबाच्या बागेत लपून बसलो.  तासभराचा आमचा आसला उद्योग झाला होता.कुणाला दगड लागला नाय आन्  कुणी घावल न्हाय हे आमचं नशीब.अगदी बघण्यासारखे चेहरे एकमेकांचे झाले होते.आमच्या खिशातही मोसंब्या होता.तिथंच बसून त्याचाही फडशा पाडला.कळू नये म्हणून साली मातीत पूरल्या.सगळं संपल्याव ओढ्यावर आलो.तिथून पुढं एक डोह होता.पाणी बऱ्यापैकी होते.मग कपडे काढून पुलावरुन उड्या  टाकून मस्तपैकी अंघोळी केल्या.छान पैकी पोहायला मिळाले.कपडे चढवून तिथंच पुलावर बसलो.
वाजंत्री वाजायला लागल्याचा आवाज ऐकू येऊ लागला.नवरदेव श्रीवंदन करायला निघाला असेल आपण मंडपाकडे जाऊया.मग सगळ्यांनी एकत्र गेलो तर शंका येईल म्हणून आपण एकत्र जायचं न्हाय दोघांच्या जोडीने जावूया आणि लांब लांब राहूया.घाबरायचं नाय,काय होत न्हाय.एकमेकांना तेवढाच शब्दांचा आधार.  एकापाठी एकेक जोडीने निघालो.चढ चढत होतो.नवरदेव श्री वंदन करायला निघणार होता.आमी मंडपाच्या बाहेरच होतो.तो मघाचा फेटेवाला त्यांच्या माणसांना आमचा प्रताप सांगत असल्याचे पुढं जावू तसं कानावर येत होतं. माझी नुकसान भरपाई दिल्याशिवाय मी वऱ्हाडाला जावू देणार नाय.त्या पावण्यांना सांगा..आमची हिकडं पाचावर धार आली होती.आता भांडाण होणार असं वाटत होतं..त्या पैकी एकजण त्याला सगळ्यांकडे बघत म्हणाला,हे अस कर,ही वऱ्हाडातली पोरं आहेत,बघ कोण दिसतयका तुझ्या बागेत आलेले, दाखव आम्हाला.त्याच वेळी नेमका आमचा दुसरा टेम्पो आला होता.पोरांची संख्या वाढली होती.आम्ही त्यांच्यात जावून  मिसळलो. आता चाळीस पन्नास पोरांचा घोळका झाला.तो फेटेवाला बाबा जवळ येऊन आमाला निरखून बघू लागला. एकाकडं बोट दाखवत  म्हणाला, 'ह्ये ह्ये प्वार दिसतय.' तवा लगेच रमजी म्हणाले,ओ बाबा हा आत्ताच वजारड्याहून  टेम्पोतन  आलाय.कुणावरबी आळ घेऊ नका. दुसरं लगीच कोणतरी खेकासलं,खायची वस्तू एखाद्यानं खाल्ली आसल.आमच्यातली पोरं  मागून घेतील पण नविचारत हात लावून नुकसान करणार नाहीत.आता त्याला कुणालाच ओळखता येईना.हिरमुड झाला त्याचा.काहीजण आम्हाला विचारु लागले.तुम्ही
काय भानगड बिनगड तर केली नाही ना  ? असं विचारु लागले.आम्ही काहीच नाही म्हणालो.तेवढ्यात वाजंत्र्याचा आवाज वाढाय लागल्याबरोबर नवरदेव श्री वंदन करायला बाहेर पडला.धंदाडाक तताडाक  धंदाडाक तताडाक या आवाजावर घोडा नाचू लागला.
आमीबी घोड्यापुढं हातपाय मारुन नाचायला लागलो.एकमेकांच्या पायाव पाय देत नाच चालला होता.
      तदनंतर मंडपात गर्दी वाढू लागली.लग्नवेळ जवळ आली होती.अक्षता वाटणाऱ्याकडून मूठभर अक्षदा घेतल्या.लग्नाच्या वेळी मंगलाष्टक म्हणल्यावर शुभ मंगल सावधान म्हणलं की अक्षदा एखाद्या अनोळखी माणसाचे कान बघून त्यादिशेने जोरात फेकत असू.अशा लीला स्मरणात आल्या की आता हसायला येतं.लग्न लागल्याबरोबर पहिल्यांदा घराकडे जाणाऱ्या टेम्पोकडे धावलो.
      असच एकदा बारामतीला ट्रकात बसून लग्नाला गेलो होतो.लग्न वेळ दोनची होती.अगोदरच जेवणाच्या पंगती झालेल्या होत्या. टाईमपास करावा म्हणून आम्ही सातआठ जण बारामती शहरात फिरायला निघालो.
नवरदेवा कडील एक दोघाला सांगून निघालो.फिरता फिरता थिएटर कडे आलो.३ ते ६ चा सिनेमा बघायचा का? एकाला थिएटर बघितल्यावर आली हुकी.दुसरा म्हणाला ,'सहा पर्यत वऱ्हाडाचा ट्रक थांबल का?' उशीर झाला तर घरी कसं जायचं असं एकेक शंका आणि प्रश्नांची  सरबत्ती सुरू झाली.शेवटी त्यातले दोघे माघारी परतले.आण्णा म्हणाला,'ट्रक न्हाय मिळाला तर एस टी किंवा दुसऱ्या वाहनाने जाऊया,मी काढीन सगळ्यांची वाटखर्ची.मग काय सहाजणांनी सिनेमा बघितला.मस्तच सिनेमा होता.मेंदूला ताण देऊन आठवतोय पण काय लक्षात येईना.पावणेसहाला पिक्चर सुटल्यावर पळतच आम्ही कार्यालय गाठलं.ट्रकात साहित्य भरलेलं होतं.स्त्रिया वयस्कर माणसंही बसली होती.पोरठोर तेवढी जवळच तरंगत होती.नवरीची पाठवणी चालली होती.कार्यालयात पोहोचल्यावर आमच्यावर सर्वांनी तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.मान  खाली घालून मुकाट्याने गपगार झालो होतो.कुटं हुंदडायला कार्टी इतका वेळ गेली कुणास ठाऊक,आकला बिकला हायत का नाही? दुसऱ्याच्या लग्नात कसं वागावं काही कळत न्हाय.असं बोलणं खात होतो. वऱ्हाडाचा ट्रक मिळाल्याने आतनं उकळ्या फुटल्या होत्या.
एकदाचा सातवाजता वऱ्हाडाचा ट्रक हालला.आमच्ं हसणं आणि खिदळणं सुरू झालं.अशा  अनेक अवखळ आणि खट्याळ गमतीजमती अचानक घडलेल्या आहेत. त्यांची आठवण झालीकी नकळत हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटतील.काहीजण तयाचे किस्से खुमासदार शैलीत इतरांशी व्यक्त होतात.शेअर करतात.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड