सोमैया कॉलेज प्रथम दिन क्रमशः भाग क्रमांक १३१



💫☘️💫☘️💫☘️💫☘️  
  साठवणीतल्या आठवणी
शैक्षणिक प्रशिक्षण 
सन१९९७-९८
✒️📚सोमय्या कॉलेज विद्याविहार, मुंबई

कॉलेजचा पहिला दिवस 
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
भाग क्रमांक-१३१
रातराणी वाई ते मुंबई ते परेल गाडीनं पहाटे साडेचारच्या दरम्यान भांडुपला थिएटरसमोरच्या थांब्यावर उतरलो.सचिनच्या पाठीमागून चालत निघालो.सर्वोदयनगरला चुलते पेईंग गेस्ट म्हणून राहतात त्यांच्या कडे निघालो होतो.एसपीएस मार्गावरील सर्वोदयनगरातील अभ्युदय बॅंकेच्या समोरील शरीफ मंझिल चाळीकडे निघालो.
पाऊस बारीक बारीक पडत होता...दहा एक मिनीटानंतर मुख्य रस्ता सोडून एका छोट्या अरुंद वाटेने नाला ओलांडून रुमजवळ पोहोचलो.बेल वाजविल्याबरोबर लगेच दरवाजा उघडला.दोघांनी घरात प्रवेश केला. पाहुण्यांची ड्युडीला वेळेवर पोहोचण्यासाठी आवराआवर चालुच होती.तर किचनमध्ये स्वयंपाक सुरू असल्याचे वास आणि आवाजा वरून लक्षात आले.आमच्या आवाजानेकाका (कै सदाशिव लटिंगे) पोटमाळ्यावरुन खाली उतरले .मग आम्ही घरची आणि मुंबईच्या पावसाची चर्चा करीत बसलो.एव्हाना सचिन माळ्यावर विश्रांतीसाठी गेला.मला काकांनी,'आज कॉलेजमध्ये किती वाजता जायचय,'असं विचारलं.मी म्हणालो.,'अकरापर्यंत गेलो तरी चालेल.आज हजर होण्याचा दिवस आहे.'असं सांगितल्यावर काकांनी आवराआवर करायला सांगितले.
         मग सकाळची नित्यकर्मे उरकली आणि टि.व्ही.पहात बसलो होतो. तिथल्या हवामानामुळे फॅन चालू असूनही घाम येत होता. गरम होत होतं.. चहापाणी उरकला.आईने घरुन दिलेल्या फळं आणि पालेभाज्या पाहुण्यांना दिल्या.बॅग घेऊन मी काकांच्या बरोबर सोमय्या कॉलेजला निघालो.पाहुण्यांनी सुट्टीला येत जा हिकडं,असं आवर्जून सांगितले.बाहेर रस्त्याने चांगलीच येताजाता वाहनं आणि माणसांची गर्दी दिसत होती.सकाळी आलेल्याच मार्गाने आम्ही  निघालो.
ट्रेनने जायला गर्दी असते तुला जमणार नाही म्हणून आपण बसने जावूया.असं काका मला म्हणाले.
गर्दी पाहून सैरभैर व्हायचं नाही.
घाबरायच नाही.असा वडिलकीचा सल्ला देत होते.मग घाटकोपरच्या बसथांब्याची चौकशी करूनतिथल्या एका स्टॉपवर थांबलो.चांगलच आता उकडत होतं.अंग घामेजलं होतं.
आपण कसं कसं आलोय हे लक्षात ठेव.म्हणजी तुला नंतर येताना अडचण येणार नाही.चुकणार नाही.
हे जाणीवपूर्वक सांगत होते.एक बस थांबली.त्यात बसून आम्ही पुढे निघालो.गर्दीमुळे आणि सिग्नलमुळे विलंब होत होता.खिडकी जवळच्या सीटवर बसल्याने बाहेरील गगनचुंबी इमारती, ट्रॅफिक, वाहने आणि नजरेला दिसणाऱ्या नावाच्या पाट्या वाचत प्रवास चालू होता. ट्रेनच्या येणाऱ्या आवाजामुळे आपण स्टेशनजवळ आल्याचे समजले.
काकांनी खाली उतरण्याची सूचना केली.पटकन बॅग घेऊन खाली उतरलो.आणि रेल्वे क्रासिंग ब्रीजवरुन निघालो.सगळे प्रवासी भरभर चालत होते.एकमेकांचे धक्के लागत होते.तरीही धावपळ चालूच होती.मीही त्याच गतीने काकांच्या मागे भराभर चालत होतो.ब्रीज ओलांडून आम्ही मोठ्या रस्त्याला लागलो.प्रचंड गर्दी होती.कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट, गाड्यांचा वेग आणि माणसांचं फुटपाथवरुन भरधाव चालणं मी नव्यानेच पहात होतो.या वातावरणात आपल्याला मुंबईत रहायचं आहे.याची ओळख होत होती. काकांनी कॉलेजच्या गेटजवळ आल्यावर वॉचमनला कॉलेजच्या नावाची बिल्डिंग कुठं आहे हे विचारले.'त्याने उजवीकडील शेवटची एमबीए बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर जावा,' असं सांगितलं.
मग आम्ही सगळ्या बिल्डींगच्या पाट्या न्याहळत निघालो.पाच एक  मिनीटात एमबीए बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील "भारतिय संस्कृती पिठम्" या नावाच्या कार्यालयात आलो.प्राचार्यांच्या  केबिनमध्ये गेलो.तिथं प्राचार्या कला आचार्य मॅडम यांना नमस्कार करून आदेश दाखविला.तदनंतर आमचं स्वागत झालं.आणि शेजारच्या केबिनमध्ये बसायला सांगितले.
तिथल्या क्लर्क मॅडमला आदेश दिला.हजेरीत नोंदणी झाली.
तेवढ्यात चहा आला. त्यांनी प्रशिक्षण वेळ ,होस्टेल ,मेस आणि  इमारतीच्या तळमजल्यावरील कॅंटिन यांची माहिती दिली.उद्यापासून प्रशिक्षण सकाळी नऊ वाजता सुरू होईल असं सांगितलं.होस्टेल व मेस नोंदणीसाठी स्लीप दिली.मग आम्ही काॅलेजच्या समोर इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळच्या होस्टेलमध्ये जाऊन नोंदणी केली.तिसऱ्या मजल्यावरील रुमवर गेलो.तिथल्या आरक्षित रुममध्ये प्रशिक्षणासाठी ब्रम्हदेशातून आलेले बौध्द भिक्षूक (पुनोभास्सो,) होते.तिथं  साहित्य ठेऊन काका आणि मी तळमजल्यावरील मेस मध्ये गेलो.
भारतिय संस्कृती पिठम् म्हणून दिलेली स्लीप मॅनेजरला दाखविली. बुफे पध्दतीचं जेवण होतं.पाहिजे तेवढं वाढून घेतले आणि दोघेजण जेवण करत बसलो.तदनंतर काकांना होस्टेल व कॉलेजचा टेलिफोन नंबर दिला.थोड्यावेळाने दोघेही चालत चालत गेटवर आलो.काकांनी,'नीट रहा, बाहेर पडताना काळजी घे, सत्तारभाई यांचा फोन नंबर दिलाय त्यावर 
अधूनमधून फोन करत जा.'असे बजावून सांगितले.मग काकांचा निरोप घेतला.तदनंतर  समोरील राधेश्याम डेअरीतील टेलिफोन बूथ वरून घरी संपर्कसाधला.शेजाऱ्यांना व्यवस्थित मुंबईला काॅलेजमध्ये पोहोचल्याचं घरी कळवायला सांगितले.
          दुपारच्या दरम्यान आमच्या रुमवर श्री रामदास जगताप फलटण यांचे आगमन झाले.त्यांची ओळख करून घेतली.मग जरा हायसे वाटले.आपल्या सोबत आपल्या जिल्ह्यातील शिक्षकमित्र आहे.गप्पा गोष्टी करता करता चार वाजल्या.
दोन्ही मंकस् नी चहाची आठवण केली.मग त्यांच्या समवेत कॉलेज मधील कॅटिनमध्ये चहा व नाष्ट्याची आॅडर दिली.शाळेच्या गप्पा मारत मारत  नाष्टा केला.मंकस् बरोबर इंग्रजीत, हावभाव किंवा हातवारे करून आम्ही संवाद साधायचो. कॉलेजच्या हॉटेलमधील खातेवहीत नाव लिहून काय घेतले याची नोंद केली आणि रामदास बरोबर फिरायला बाहेर पडलो.तो बराच वेळा मुंबईला आलेला होता.एका दुकानातून गरजेचं साहित्य खरेदी करून होस्टेलवर आलो.सायंकाळी सात वाजता जेवण झाले.आठ वाजता तळमजल्यावर हजेरीसाठी आलो.रुम नंबर अनाउन्समेंट झाली की हात वर करुन प्रेझेंटी द्यायला लागली. तदनंतर रुममध्ये पहिल्या दिवशी फॅनच्या आवाजात गप्पा मारत निद्रेच्या अधीन झालो.
शुभ रात्री....
भाग क्रमांक-१३१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड