१|पुस्तक परिचय दुर्गसंपदा महाराष्ट्राची, भगवान चिले
🌿💫📗१
.पुस्तकाचे नाव -
दुर्गसंपदा महाराष्ट्राची
लेखक- श्री.भगवान चिले
प्रकाशन- शिवस्पर्श प्रकाशन, कोल्हापूर.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰
️ रयतेचे राजे,स्वराज्य हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय .......
आपला महाराष्ट्र सह्याद्रीने उत्तुंग केला आहे.कृष्णा, गोदा,भीमा आणि तापी या पुण्य सरितांच्या प्रवाहांनी सुजलाम सुफलाम झाला आहे.कवी गोविंदाग्रजांनी "दगडांचा देश" असे संबोधले आहे.वज्रालाही अभेद्य अशा कठीण काळ्या पाषाणांचे ठिकठिकाणी उभारलेल्या गडकिल्ल्यांचा देश. ख्यातनाम दुर्गप्रेमी , दुर्गभ्रमंतीकार श्री.भगवान चिले यांनी अनेक अवघड वाटा, जंगलवाटा मित्रांसमवेत तुटवत अनेक गडकिल्ल्यांची सफर त्यांनी केली आहे.
ऐतिहासिक राजवटीचे हे गडकिल्ले मूक साक्षीदार आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या गडकोटांशी हितगुज साधण्यासाठी दुर्गभ्रमंती केली.त्यांच्या भ्रमंतीची "गडकोट","दुर्ग वैभव कोल्हापूर" आणि "दुर्गसंपदा महाराष्ट्राची" अशी तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कुशीत एकटेच असणारे दुर्लक्षित आणि अवघड गडकिल्ल्यांना भेटी दिल्या.निसर्गवेध परिवाराच्या आग्रहास्तव या पुस्तकाचे लेखन केले आहे.या गडांचा शिवपूर्वकालीन व शिवकालीन इतिहास सर्वसामान्यांना समजावा. सह्याद्रीची अस्मिता वृद्धिंगत व्हावी म्हणून दुर्लक्षित अशा ४० गडकिल्ल्यांचा समावेश केला आहे.
आडबाजूच्या गडकिल्ल्यांच्या भेटीला कसे जावे .तेथील लगतची प्रसिद्ध गावे, पायथ्याची गावे ,पायवाटा, दुर्गवर्णन सहज सोप्या भाषेत इत्यंभूत केलेले आहे.त्या किल्ल्याची इतिहासातील माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.स्थळवर्णन,
छोटे नकाशे आणि किल्ल्यावरील वैशिष्ट्य दाखविणारे रंगीत छायाचित्रे यांचा समावेश केला आहे.
या पुस्तकास कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव सरांची प्रस्तावना लाभली आहे.मिळेल त्या साधनसामुग्री आणि साथ देतील त्या सहकाऱ्यांसह त्यांनी सुमारे २०० किल्ल्यावर मनमुराद भटकंती केली आहे.त्यांचे हे पुस्तक वाचताना हे दगडमातीचे किल्ले आपल्याशी सुसंवाद साधत आहेत असे वाटते. प्रस्तुत ग्रंथातील बहुतांश उपेक्षित असणाऱ्या गडदुर्गाची बिकट वाट आपल्यासाठी सहज सुलभ व्हावी म्हणून श्री भगवान चिले यांची लेखणी रममाण होते.
४० किल्ल्यांचा वैशिष्ट्येपूर्ण उल्लेख अणुक्रमणिकेत केलेला आहे. तसेच एक अथवा दोन दिवसांच्या गडयात्रा भ्रमंतीत आपण कोणते किल्ले पाहू शकतो याचीही माहिती दिली आहे.यातील सर्वंच किल्ल्यांची माहिती वाचणीय आहे. गटकोटाच्या भ्रमंतीचे वर्णन पायथा ते माथा इत्यंभूत केले आहे.
गडावरील दरवाजे,बुरुज,पायवाटा, बालेकिल्ला, भुयारी मार्ग,मंदिरे, तटबंदी, वनराई आणि किल्लेदार यांची माहिती खास शैलीत केली आहे.त्या किल्ल्यांवरील लढायांची माहितीही दिलेली आहे....
〰️〰️〰️〰️〰️
पुस्तकाचे नाव-दुर्गसंपदा महाराष्ट्राची
प्रथमावृत्ती-एप्रिल २००७
पृष्ठे-१५२
किंमत-रु.१४०
शब्दांकन- रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
☘️💫☘️💫☘️💫☘️💫
Comments
Post a Comment