६पुस्तक परिचय श्याम साने गुरुजी
६ पुस्तक परिचय
श्याम
लेखक--साने गुरुजी
प्रकाशक-गजानन संत , पुणे
प्रकाशन---पुणे विद्यार्थी गृह, पुणे
पुनर्मुद्रण--२००४
-------------------------------------------
"श्याम" विद्यार्थी जीवनावरील एक अनुपमेय प्रेरणास्थान असणारे पुस्तक संवेदनशील मनाचे महामंगलमय पवित्र
निर्मळ मातृस्त्रोताचे जनक,मुलांचे साने गुरुजी यांनी गोष्टीरुपाने फुलविलेली कथेची बाग आहे.
साने गुरुजींची 'श्यामची आई'या आपल्या मातृतुल्य पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना प्रस्तावना लिहिताना पहिलेच वाक्य आहे. की,' पवित्र गोष्टीला प्रस्तावनेची काय जरुरी ?'खरोखर या पवित्र गोष्टी तेजलदार स्वयंप्रकाशित असतात.त्यांना दुसऱ्या कडून प्रकाशित होण्याची गरज नसते. कस्तुरीचा वास की कुठेही असली तरी सांगावा लागत नाही.सरोवरातील उन्मादाने दरवळणारा कमलवृंद आपल्या श्वासाची जाहिरात कधीच करत नाही.त्याचप्रमाणे सानेगुरुजींच्या पवित्र पुस्तकास तरी प्रकाशकाच्या चार शब्दांची काय जरुरी आहे ? रसिक वाचकांच्या त्यांच्या लिखाणावर ज्या कसोशीने ज्या उड्यावर उड्या पडत आहेत त्यांनेच त्यांच्या पुस्तकांची किंमत मौलिक केलेली आहे.
'हे विश्वची माझे घर' अशी सर्वव्यापी सानेगुरुजींची सध्याची स्थिती असल्याने त्यांचे साहित्य सध्या प्रस्तुत होत आहे हे त्यांचे विश्वरूप दर्शनच आहे. "श्यामने' साने गुरुजींची शालेय जीवनातील घटना प्रसंग हदयाच्या कुपीत जतन करून ठेवले होते.ते गोष्ट सांगून अनुभव मित्रांना वाटले आहेत'श्याम'म्हणजे गुरुजीच, श्याम म्हणजे मूर्तिमंत प्रयत्न ,पवित्र त्याग,निखळ प्रेम आणि सौंदर्य, विद्यार्थी जीवनात श्यामने खरोखरच क्रांती होती. प्रेमाची गंगा दुथडी भरून ओसंडून सोडली आहे.श्यामने मुलांच्या मानवी मनावर भुरळ पडली आहे. की तोच श्याम आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अतिआवडता आहे.केवढे हे आमचे परमभाग्य ,त्या थोर पुरुषास वंदन असो !
ज्यांनी खरोखरच विद्यार्थ्यांच्या मनाची बाग फुलवण्याचे आजन्म व्रत घेतले आहे, त्या गुरुजींनी आमच्या विद्यार्थी गृहासही मदत करून विद्यार्थ्यांची मनेच नव्हे तर शरीरेही पोसले आहे त्यांच्याविषयी आमचेही अंतःकरण प्रेमाने भरून येते.असे विचार संस्थेचे कार्याध्यक्ष वि.ग.केतकर यांनी 'श्याम' या गोष्टींच्या पुस्तकाचे कौतुक करताना व्यक्त केले आहेत.
या कथासंग्रहात साने गुरुजींचा जीवन- परिचय करून देताना त्यात शैक्षणिक प्रवास, ग्रंथसंपदा आणि आंतरभारतीचा समावेश केला आहे.या पुस्तकात एकापेक्षा एक सरस, सुरस,संस्कारक्षम आणि चित्ताकर्षक २६ गोष्टींचा समावेश आहे.
श्याम म्हणजे गुरुजी आपल्या स्नेही सवंगड्यांना गोष्ट कथन करत आहेत.
आरंभ करताना ते सांगतात,श्याम अलिकडे कायम आजारी असतो.अशक्त होत चालला आहे.त्यामुळे त्याच्या जिवलग मित्रांना भीती वाटायची.आश्रमातील एका निंबाच्या झाडा खाली आरामखुर्चीत पडून राही.झुळझुळ वाहणारी नदी बघत तीच्या महिम्याचे आई सारखे वर्णन करत .एकदा मित्रांनी "श्यामच्या आईच्या आठवणी किती सुंदर होत्या,'' त्यांची किती आठवण येते.यावर गप्पा मारत असताना त्याच्या सवंगड्यांनी विविध किस्से सांगून या पुस्तकाची गोडवी कथन केली.सगळे स्नेही त्याला कथाकथन करण्याची आर्जव करीत होते.तुझ्या भाकड आणि रडकथा आम्हाला ऐकताना पवित्र आणि गोड वाटतात.भावनेच्या ममत्तवाने तु कथन करतोस ,असे म्हणून सर्व सवंगडी कामाला गेल्यानंतर "गाडी धीरे धीरे हाक|बाबा धीरे धीरे हाक."असे गाणे गुणगुणत त्याच आरामखुर्चीत झोपी जातो.
पहिली कथा देवाने दिले डोळे यात डोळ्यांवर आलेली संकटे कशी निवारली, दगड लागणे,डोळ्यांची साथ आणि उपचारांसाठी मुंबईला जाणं.तिथं मामांनी केलेली मदत .फकिर आणि राजाची गोष्ट प्रस्तुत केली आहे.सुयोग्य शब्दांची मांडणी,आशयघन शब्दातील गोष्ट वाचताना प्रसंग मालिका डोळ्यापुढे दिसते.'डोळ्यांचा दुरुपयोग करु नये.कारण डोळे नसणे म्हणजे काय,हे मी अनुभवले आहे.' याची काळजी घेण्यास सांगतात.
'खोटीखोटी झोप ' या कथेत श्यामचे वाचन वेड,मामाच्या शिकवण्याची भीती तर मामाच्या मित्र माधवराव यांचे प्रेमळ स्वरुपाचे कथन केले आहे.माधवराव म्हणतात, मुलांच्या हृदयात प्रेमाची किल्ली घेऊन शिरले पाहिजे.
कोमल फुलातील मध आडदांड पक्ष्याला चाखता येणार नाही.ते काम भुंगे आणि फुलपाखरेच करतील.
माझा पहिला मुसलमान मित्र या कथेत भाई श्याम असं रेशमी रुमालावर कोरलेली अक्षरे मैत्री ठळकपणे स्पष्ट करते. बोटीनं गावाकडच्या प्रवासात वाऱ्यानं रुमाल पाण्यात पडण्याच्या प्रसंग हळव्या शब्दात बध्द केला आहे.अहंमदने भेट दिलेला रुमाल म्हणजे हृदयैक्याच्या अमरध्वज होता.श्यामचे जीवन अनेकांच्या प्रेमाने रंगले आहे.साऱ्या जाती आणि धर्मांनी त्याला ओलावा दिला,प्रेमसुख दिले.श्यामच्या हृदयात सर्वांबद्दल गाढ कृतज्ञता आहे. अशा गोष्टीतून बालपणीच्या गमती जमतीतून विचारधारा समजतात.मी राम राम म्हणवून घेत होतो.यात इयत्ता चौथीच्या वर्गात श्याम असताना घडलेला प्रसंग लेखातून डोळ्यासमोर उभा ठाकतो.
वर्गशिक्षक नसताना वर्गमित्रांना भक्तिविजयाची कथा सांगून राम राम करून घेणारा श्याम आणि तिसरीचे शिक्षक यांच्यातील प्रसंगाचे वर्णन वास्तव वाटते.आमच्या गावातील नाटक कंपनी, दागिन्यांची हौस आणि पुण्यातून पहिले प्रयाण यातून श्यामचे सदाचार, कला आणि चूक कबूल करण्याचे गुण प्रकट होतात.उत्कृष्ट अभिनय करणारा कलाकार स्वत:ला विसरुन कला सादर करतो.स्वत:ला विसरणारा नट प्रेक्षकांनाही विसर पाडतो.
कला म्हणजे आनंदाचा परमोच्च ऐक्य क्षण होय.समानता व प्रेमाचे ऐक्य निर्माण करणे यात माणुसकी आहे.अशा बालपणीच्या आठवणी व्यक्तीविषयी,स्वत:विषयी, स्वत:च्या आजाराविषयी,पुणे ते मुंबई वारीची वर्णने सहज सुंदर शब्दात गुंफलीआहेत.कोकणातील घर,दापोलीची इंग्रजी शाळा,आत्याचे घर आणि प्रेमळ स्मृती या गोष्टी वाचताना आपलेपणा भासतो.
अशा या कथेतील श्याम या पात्राची मध्यवर्ती भूमिका ठेवून प्रत्येक कथा त्याच्यातील विशेषत्वाचा महिमा गाते.त्यांचे घर,शाळा,मामा-मामी,आत्त्या,आजार ,कला ,सवंगडी आणि पुणे-मुंबईतील शिकणं याच्या कथा वाचताना आपण गुंगून जातो.मुलांना आचरणाचे संस्कारित अनुभवाच्या प्रेरक कथा वाचायला मुलांना निश्चितच आवडेल.
"श्याम" कथासंग्रह साने गुरुजींच्या पवित्र लेखनीतील मजेशीर अनुभव सिध्द गोष्टी
वाचायला आवडेल…
-------------------------------------------
पृष्ठे--१९२
किंमत--६०₹
शब्दांकन-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे, वाई
Comments
Post a Comment