१२||पुस्तक परिचय,पक्षी जाय दिगंतरा , मारुती चितमपल्ली




🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

            १२|  पुस्तक परिचय

        पक्षी जाय दिगंतरा 

मारुती चितमपल्ली

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

 सोलापूर येथे संंपन्न झालेल्या ८३व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे पक्षी निरीक्षण आणि व्यक्तिंवर आधारित कथालेखन संग्रह आहे. वनखात्यातील नोकरी नागझिरा, नागपूर, मेळघाट,नवेगावबांध येथील जंगले अनभवली,जंगलाचे निरीक्षण,अरण्य लिपी ,वने,वन्यजीवन आणि पक्षीजगत याविषयी बारकाव्यांनी निरीक्षण, संशोधन करून सहजसुंदर ओघवत्या शैलीत लेखन केले.विपूल ग्रंथसंपदा लिहिली.त्यांचे लेखन चिंतनशील निसर्ग लेखन आहे.तसेच अनेकदा जेष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली,वन तज्ज्ञ माधवराव पाटील आणि जेष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा जंगल भटकंती करताना सहवास लाभला.

 त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने वन्यजीव आणि पक्षी जगताचे लेखन झाले.आनंददायी बगळे, चैत्र पालवी,पक्षी जाय दिगंतरा,जंगलाचं देणं, रानवाटा,चकवा चांदणं,घरट्या पलीकडे इत्यादी पुस्तके वाचकांना निसर्गावर प्रेम करायला शिकविण्यात.जंगल कसं वाचावं याची सविस्तर माहिती रम्य कथांतून वाचकांना वाचायला मिळते.त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्काराने गौरविले आहे.

त्यांनाही साहित्य क्षेत्रातील विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.'पक्षी जाय दिगंतरा' या पुस्तकातील कथांचा रसास्वाद घेऊन प्रतिभावंत व जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे,नरहर कुरुंदकर,रा.भि.जोशी,राम शेवाळकर, मु.का.अग्निहोत्री आणि व्यंकटेश माडगूळकर यांचे अभिप्राय पुस्तकात मलपृष्ठावर वाचायला मिळतात.

नवनीत,राजस,कृषीवल आणि युगवाणी या मासिकात,तर काही दिवाळी अंकात तर काही लोकसत्ता आणि लोकमत दैनिकाच्या पुरवणीत कथा  प्रकाशित झालेल्या आहेत.

   ज्यांनी या सुरस आणि रम्य कथा श्रवण केल्या ते श्रेष्ठ चित्रकार ए.ए.आलमेलकर यांनी पुस्तकातील चित्रे रेखाटून अंतरंगाला साज चढविला.परदेशी लेखकांची वनांवरील पुस्तकांचा अभ्यास करून,जंगलातील वास्तव्यातील निरीक्षणे,संशोधन ,निरीक्षण आणि चिंतनातून या कथांचे सारं तयार झाले आहेत.निसर्ग आणि माणसाचे चित्रण कथा बध्द केले आहे.ते स्वत:ला अरण्ययात्री समजतात.

जंगलातल्या माणूस ग्रंथरुपाने पक्षी आणि प्राण्यांचा उलगडा सूक्ष्म संशोधक ,वेगळ्या पद्धतीने करुन देतात.याचा उलगडा कथा वाचताना लक्षात येतो.प्रेम,ईहामृग,पक्षी जाय दिगंतरा,

रिकामी चौकट,माळ,परडी व पोत,निळावंती,घारीचं घर,

अडई व तिची पिलं,हिमावंती,हिरवे हात,पाठलाग,कुबडा माळी,पिपा चित्तीण व तिची पिल्ं,घरसागरावर,घनवराचं घरटं आणि हाती पागडी अशा सुरस, गूढ आणि रम्य १६कथांचा खजिना संग्रह स्वरुपात वाचायला भेटतो. 

        माळ,परडी व पोत या कथेतून त्यांच्या कुटुंबियांचा जीवनपट उलगडतो.वडिलांचे व्यक्तीचित्र मनाला स्पर्शून जाते.बाबांच्या निधनानंतर लेखकांनी बाबांच्या धनावर कोणताच हक्क न सांगता ते आईला बाबांची माळ,परडी व पोत मागतात.कारण मला "माळेला भरभरुन देवाचं चिंतन करायचेय अन् परडीसारखं अयाचित वृत्तीनं राहून पोताला आठवून ज्ञानाची साधना करायचीय",  'बेटा,आई धरित्री असते तर बाप आभाळ असतो.तो क्षमा करीत नाही.',असं आई म्हणायची.'निळावती' ही कथा सुंदर पक्ष्याचे गूढरम्य उकलते. फादरचे व्यक्तिचित्र आणि पर्वतीय प्रदेशातील पक्षी निरीक्षणाचे अफलातून लेखन केले आहे. त्यांच्या कथांची निवड विद्यापीठीय परीक्षेला झाली आहे.शेवटी परिशिष्टात कथा वाचताना वेगळे वाटणारे शब्द आणि त्यांचे अर्थ पारिभाषिक शब्द दिले आहेत.ते शब्द अरण्य लिपीचा उलगडा करतात.वन भटकंतीत नोंदविलेल्या निरीक्षणावर चिंतन करुन वनातीलअद्भुत रम्य प्राणीपक्ष्यांचे जग कथारुपात वाचायला रसिक वाचकांना निश्चितच आवडेल!

🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾🍂🍃

पुस्तकाचे नांव-पक्षी जाय दिगंतरा

लेखक-मारुती चितमपल्ली

प्रकाशन-साहित्य प्रसार केंद्र, नागपूर

पृष्ठे--१३२

आवृत्ती--चौथी

किंमत--७५₹

परिचयकर्ता-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

🍀🌿🌾🍃🍂🌳

Comments

  1. लटिंगे सर....सुंदर पुस्तक परिचय.

    ReplyDelete
  2. धन्यवाद नितीन जाधव सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड