१७|पवनाकाठचा धोंडी,गोनिदा , पुस्तक परिचय



🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾


📚📚 १७||पुस्तक परिचय

पवना काठचा धोंडी

गोपाल नीलकंठ दांडेकर 

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज चतुरस्त्र कलाकार आहेत.संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटूंबिय म्हणजे स्वरसाजाचा चढता आलेख आहे.सत्तरीच्या दशकातील लतादीदी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या श्रवणीय गाण्यांनी मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी गायलेली कित्येक गाणी आजही आपण धून  कानावर पडलीकी गुणगुणायला लागतो.'काय बाई सांगू, कसं गं सांगू' किंवा' वाटतं दंवानं भिजून गेली,उन्हं दारात सोन्याची झाली,माय भवानी पावनी आली.' अशी त्या काळातील अजरामर श्रवणीय गाणी सन१९६६ साली कृष्णधवल रुपातील चित्रपट'' पवना काठचा धोंडी" होता.याचे निर्माते उषा मंगेशकर आणि विनायक ठाकूर, तर संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि शशी साबळे यांनी गायलेली उत्तमोत्तम गीतं यात होती तर 'कथा' होती,प्रतिभावंत साहित्यिक कादंबरीकार "गोनिदा"यानावाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गोपाल नीलकंठ दांडेकर होत.

' पवना काठचा धोंडी' या कादंबरीवरील आधारित मराठी चित्रपट मी लहानपणी पडद्यावर बघितला होता.त्यात जयश्री गडकर, चंद्रकांत, सूर्यकांत वसंत शिंदे यांनी काम केले होते.सहज शाळेच्या वाचनालयातील पुस्तके पडताळणी करताना हाताला लागले होते.ते वाचायला आणले होते.पुस्तक बघितल्यावर त्या सिनेमाची आठवण झाली.खात्री करावी म्हणून इंटरनेटवर शोधले असता गोनीदांच्या कथेवरचा सिनेमा, 'पवना काठचा धोंडी' हे समजल्यावर आवर्जून वाचायला सुरुवात केली.एका दिवसात फडशा पाडला.पवना नदीकाठचा सह्याद्रीच्या डोंगरांगेतील तुंगीगड, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घाटातून चालणाऱ्या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापित झालेला घनदाट झाडोऱ्यातील किल्ला तुंगी गड.याच गडाचा रखवालदार असणारा ढमाले घराण्यातील वंशज धोंडी ढमाले म्हणजे पंचक्रोशीतील पवनमावळात 'हवालदार' म्हणून सुपरिचित व्यक्ती.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडावरुन किल्लेदार ऐन लढाईच्या वेळी पळून गेला त्या वक्ताला किल्ल्यावरील ढमाले हवालदाराने गनिमांशी झुंज देऊन किल्ला लढवून सर केला होता.म्हणून राजांनी 'तुंगीगड' शूर ढमाले घराण्याकडे स्वाधीन केला.

तेव्हा पासून या घराण्याचे वंशज हवालदार "इनाम"म्हणून गडाखालील दहाएकर जमीनेची आणि गावाची  रखवालदारी करत आहेत. 

 १९५५ साली प्रकाशित झालेलं हे कादंबरी स्वरुपातील अक्षरशिल्प आहे.त्या काळातील खेड्यातील राहणीमान, मुख्यतः आधाराचा पारंपरिक शेती,गावगाडा,गावातील उरुस,हवालदाराच्या प्रपंच आणि गावची जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणाऱ्या धोंडीच्या स्वभाव वैशिष्ठ्यांचे अनेक पैलू आपणाला वाचताना दृष्टिपथात येतात.गावची विश्वासाने समदी जबाबदारी पार पाडणारा धोंडी,

वाडवडीलांच्या काळ्यामायची जिवापाड माया करून  मशागत करणारा धोंडी,गाई-बैलांवर जिवापाड लळा असणारा हवालदार,सुगीचं बलुतं घरपोच करणारा हवालदार,स्वत:च्या भावाला चितपट करणाऱ्या किशाला फडात उचलून घेऊन कौतुक करणारा धोंडी,भुजाब्याच्या शेतात गावातील समद्यांना घेऊन इर्जिक घालणारा धोंडी,

प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा धोंडी,घरी मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाला रिकाम्या  ओंजळीनं न पाठविणारा हवालदार आणि त्याची कारभारीन सारजा,आपल्या दिरावर पुत्रवत प्रेम माया करणारी आणि दोन्ही भावांमध्ये दुवा साधनारी सारजा आणि धोंडीचे अनेक प्रसंग आपणास वाचताना भावनाविवश करतात.आपण तल्लीन होतो.ही सुरस कथा  वाचताना उत्कंठा शिगेला पोहोचते.संपूर्ण कथानक धोंडी हवालदार या नायका भोवती फिरत राहते.

  या कादंबरीतील नायक धोंडी हवालदार यांचे व्यक्तीचित्रण खेड्यातील बोलीभाषेतील शब्द साजांनी जीवंत केले आहे.वाचताना अनेक प्रसंग डोळ्यासमोर ठळकपणे दृष्टीस पडतात.

बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहात न जाता पारंपरिक पद्धतीने शेती करणारा धोंडी ,पूर्वजांचा विचारांचा पगडा कसोशीने पाळणारा धोंडी हवालदार,गावचा रखवालदार असूनही धाकट्या भावास दूधविक्रीचा धंदा करायला नाखुशीने परवानगी देणारा धोंडी त्याच्या थेंबभर दुधाला आणि एका पैश्यालाही मिंधा नसणारा थोरला हवालदार .आपल्या भावाचं लगीन आजीच्या रुपात दिसणाऱ्या सरुशी करून घेणारा धोंडी खरंच देवमाणूस वाटतो.

        आपली भावजय शिकलेली आहे याचा अभिमान बाळगून तिला वाण्याच्या दुकानातील रद्दीचं पेपराचं पान घरी आणून समद्या समोर सरु भावजयीला वाचायला लावणारा धोंडीदादा,तसेच पूर्वजांनी दिलेल्या वचनाला जागणारा धोंडी, भावाला शेतीत वाटणी पाहिजे म्हणून मित्रांसह दादाला अंधारात गाठून काठीनं मारहाण करतो.मारहाण करणारा कोंडी आहे हे समजताच  दुसऱ्याच दिवशी वडगावला जाऊन त्याच्या नावावर शेती करणारा धोंडी हवालदार.या कथेचा रसास्वाद घेताना,त्याच्या कैक गुणांचा व रुपांचा वाचताना उलगडा होत जातो.पत्नी तापाने फणफणत असताना भावाच्या पैश्यातून डॉक्टरचा उपचार न करणारा मानी हवालदार दिसतो.अचानक उद्भवलेल्या  साथीच्या आजाराने गावातील जनावरे पटापट मरत असतात.त्यांचीही बैलं मृत होतात केवळ एक  गर्जेन उरतो. शेतीची नांगरणी कशी करावी या विवंचनेत असताना, कोंडी त्याच्या उपरोक्ष भावाने शेतीत इर्जिक बोलावली आहे हे समजताच.भल्या पहाटे उठून गर्जेन बैला सोबत  स्वता:ला शिवाळाला जुंपून शेत नांगरण्याचा प्रसंग वाचताना भावनेला बांध फुटतो.डोळ्यांच्या कडा पाणवतात.काळीमायवर याचं अपार प्रेम, श्रद्धा,भक्ती आहे.जिवाभावाच्या काळीमायसाठी करत सांगावं,अशी मनोमन इच्छा होती.गर्जेन माजा राजा…हवालदाराचा बईल,काळ्या आईसाठी.

..त्याचं सोनं रं होईल…. ईश्वासाच्या नेकीनं पारंपरिक रिवाजानुसार  राबणाऱ्या धोंडी हवालदाराची कथा"पवनाकाठचा धोंडी" अप्रतिम वाचनिय आहे…. गावच्या बोलीभाषेतील अनेक शब्दांची नव्याने माहिती मिळाली.पर्यायी शब्दांची उकल झाली.

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नांव-पवना काठचा धोंडी

लेखक-गोपाल नीलकंठ दांडेकर

साहित्य प्रकार--कादंबरी

प्रकाशन-कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे

पृष्ठे-१६२

नववी आवृत्ती

किंमत-२०₹

श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड