११|पुस्तक परिचय सूत्रसंचालन , एक प्रयत्नसाध्य कला, श्यामसुंदर मिरजकर




११||पुस्तक परिचय

सूत्रसंचालन,एक प्रयत्नसाध्य कला 

लेखक--श्यामसुंदर मिरजकर

प्रकाशन--नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर

-----------------------------------------------

    हल्लीच्या युगात मानवी जीवन अधिक गतिमान झाले आहे.सण आणि उत्सवात रमणारा माणूस आता विविधांगी सभा -समारंभात आपला आनंदोत्सव साजरा करतोय.

कलांचाआविष्कार करायला कोणाला बरे आवडणार नाही.कार्यक्रमाचे सूक्ष्मपणे नियोजन केले तर कार्यक्रम निश्र्चितच यशस्वी होतो.हल्ली घरगुती ते संस्था,शाळा ते विद्यापीठ, विविध संघटना ते राजकीय पक्ष, शासकीय ते सामाजिक कार्यक्रम,सभासमारंभ ते संमेलने, भूमिपूजन ते उद्घाटन,व्यक्तिंचे वाढदिवस ते कर्तुव्यपूर्ती,व्यक्तिंचे विविध कार्यक्रम आणि शिबीरे ते परिषदा अशा अनेकविध कार्यक्रमांच्या नेटक्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी मुख्य जबाबदारी अर्थातच सूत्रसंचालकावर येऊन पडते.

रत्नजडित हार मनमोहक आणि चित्ताकर्षक दिसण्यासाठी जसा रेशमीधाग्यात गुंफलाजातो. तसं कोणत्याही कार्यक्रमाचे सौंदर्य खुलविण्यासाठी सूत्रसंचालकाची गरज भासत आहे.

पुष्पमालिकेतील फुलांना एकत्र गुंफण्याचं काम जसं दोऱ्याला करावं लागतं तसं स्वागतापासून समारोपापर्यंतचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न सूत्रसंचालकास करावं लागतं.मग 'सूत्रसंचालन एक प्रयत्नसाध्य कला'सर्वांनाच येते एवढं हे सोपं नाही.यासाठी संवादापासून समयभानापर्यंत समयसूचकतेने आपल्या रसाळ ओजस्वी आवाजात संचलन कसं करावं याची इत्यंभूत माहिती 'सूत्रसंचालन एक प्रयत्नसाध्य कला' या पुस्तकात सुप्रसिध्द सूत्रसंचालक श्यामसुंदर मिरजकर यांनी नवागतांसाठी प्रदर्शित केली आहे.

सूत्रसंचालक लेखक अपघातानेच लेखनाकडे वळले.

अपघाता नंतरच्या वेदनादायक काळात त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी केले.

एकीकडे वेदना दुखणं आणि दुसऱ्या बाजूला होते,हसणारे- हसविणारे स्नेही! त्यामुळे आजारपणाचे रुपांतर लेखनाच्या संधीत झालं.याच विश्रांतीच्या काळात या पुस्तकाचे लेखन झाले.वक्ते आणि श्रोते यांच्यामधील सेतू सूत्रसंचालक असतो.प्रसंगावधान राखून हलकेफुलके,खुसखुशीत नर्मविनोदी बोलून कार्यक्रमाचा उत्साहवर्धक माहोल तयार करतो.

 या पुस्तकात पंधरा प्रकरणात सूत्रसंचालन कला कशी अवगत करावी याची सूक्ष्मपणे, बारकाव्यासह आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.संचालनाचे महत्त्व,त्यांचे वक्तव्य आणि हावभावयुक्त बोलणं कसं असावं याची माहिती आपणास पहिल्या प्रकरणात समजते.

नियोजनाची बैठक, वेळ,वक्ता निवड कार्यक्रम पत्रिका आणि समयोचित सूत्रसंचालन द्वितीय प्रकरणातून अनुभवायला येते.छोट्याशा कार्यक्रमाचे नियोजन करायला एवढ्या बाबींचा समावेश असतो हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते.पुढील भागात आपणाला सूत्रसंचालनाचे पत्रकार,गुणदोष आणि विधिनिषेध यांची माहिती समर्पक शब्दांत केली आहे.लक्षवेधी अवतरणांची पेरणी, शाब्दिक कोट्या,अल्पाक्षर रमणीय संभाषण,आरोह अवरोहासह स्पष्ट उच्चारण,संवाद फेक,प्रसंगावधान ,समयभान,

हजरजबाबीपणा,बहुश्रुतता आणि शांत संयमीवृत्तीने संचालन केले.तर कार्यक्रम बहारदार होऊन वेगळ्याच उंचीवर जातो.तेव्हा त्या कार्यक्रमातील अॅकरकडे श्रोते आकर्षिले जातात.ते आवर्जून स्तुती करतात.

यशस्वी कार्यक्रमाची पोचपावती देतात.मान्यवर वक्ते आणि प्रमुख अतिथी सुध्दा आवर्जून भेट घेऊन कौतुकास्पद प्रतिक्रिया देऊन शाबासकी देतात.तदनंतरच्या विभागात सूत्रसंचालनाचे प्रकार ,प्रभावी कार्यक्रम यशस्वीतेचे कानमंत्र आणि नमुना सूत्रसंचालन यांचा समावेश आहे.

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यघटना याचीही  गरज का आहे याची माहिती वाचकांना मिळते.शेवटच्या प्रकरणात सूत्रसंचालन करताना आवश्यकतेनुसार आणि प्रसंगावधान राखत मार्मिकपणे आरंभी,मध्ये मध्ये शब्दपखरण  करुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लागणारी निवडक अवतरणे दिलेली आहेत.पुस्तकाच्या नामभिधानाच्या प्रकरणात भाषण प्रभुत्व,भाषण आणि व्याख्यान,परिसंवाद आणि चर्चासत्र यातील फरक व निवेदक, सूत्रधार आणि चर्चक यांची ओळख होते.

   तुम्ही स्वतःवर,स्वतःच्या प्रयत्नांवर, प्रामाणिक कष्टांवर विश्वास ठेवा,यश तुमच्याच हातात आहे.चांगले वक्तृत्व,चांगले सूत्रसंचालन ही कुणाचीही पिढीजात मक्तेदारी असत नाही. धाडस आणि प्रयत्न यांच्या आधारे कोणासही ही कला आत्मसात करता येईल.सातत्यपूर्वक केलेले प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी, जिद्द,असल्यास आणि आत्मविश्वास यांच्या योग्य समन्वयाने आपणास ही कला आत्मसात करता येईल.जो इतरांशी सहजपणे बोलतो.त्याचेच भाषेवर प्रभुत्व निर्माण होते.इतरांशी आणि एकटेपणात स्वत:श्री नीट संवाद साधता येतो तो चांगला वक्ता,चांगला सूत्रसंचालक होऊ शकतो.नीरज या कवीने म्हटलेच आहे,'लहरोंसे ,नौका पार नहीं होती|कौशिश करने वालोंकी कभी,हार नहीं होती||'

"सूत्रसंचालन प्रयत्नसाध्य कला'' आत्मसात करण्यासाठी हे एक उत्तम वाचनीय पुस्तक आहे.

-----------------------------------------------

पृष्ठे--१६०

द्वितीयावृत्ती

किंमत--१३०₹

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड