कोकण गोवा भ्रमंती देवगड हापूस व परतीचा प्रवास






कोकण गोवा निसर्ग भ्रमंती,खाद्यसंस्कृती देवगड हापूस व परतीचा प्रवास 
 दिनांक ९  मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१७
   चहापान करायला एका हाॅटेलजवळ गाडी थांबवली.खाली उतरताना आंब्याच्या स्टॉलवरील हापूस नजरेस पडला. मग काय?लगोलग आमची पावलं हॉटेलऐवजी आंबा विक्री स्टाॅलकडे वळली. जगप्रसिध्द देवगड हापूस प्रत्यक्ष हातात घ्यायला मिळाला.हिरव्या पिवळ्या रंगांचे साईझ प्रमाणे उघड्या पेटीतील आंबे भुरळ घालत होते.
आपल्या भागात येणारा आंबा प्रत्यक्ष उत्पादित भागात बघताना मन हरकलं होतं.तिथं बोराच्या आकाराचे पिकलेले हापूस तंगुसच्या पिशवीत भरलेलं मस्तच दिसत होते.तेही घेण्यास उतावीळ झालो. सिझनला सुरुवात झाल्याने डझनाचे दर बाराशे ते सातशे रुपयांपर्यंत होते.आकारावरुन चार प्रकारचे आंबे दिसत होते.दोन डझन आंबे,ओले काजूगर,आंबा वडी आणि आंब्याच्या पल्पचे डबे खरेदी केले.कोकणचा प्रसिद्ध कोकम,आवळा ,फणस,काजू आणि आंब्याचे विविध पदार्थ विक्रीस उपलब्ध होते.जास्तीची खरेदी केल्यानं फळविक्रेत्याने पैसेही कमी घेतले.चारपाच दिवसांत आंबे तयार होतील हे आवर्जून सांगितले.त्यांनी कुठून आल्याची चौकशी केली.आमचा माल सातारा,पुणे येथेही जातो,हे ही सांगितले.व्हिजीटिंग कार्ड देवून जास्तपेट्यांची आॅडर दिली तर जागा पोहोच देवू. मी ही, हे चवदार लागले तर नक्की कळवितो,असं सांगून गाडीकडे आलो.जवळच्या हॉटेलमध्ये चहा घेऊन परतीच्या प्रवासाला देवगड ते निपाणी मार्गाने निघालो.
      आमचा प्रवास आता नांदगावपर्यत याच मार्गाने सुरू झाला.बऱ्याच वर्षांनी देवगड हापूस देवगडमध्येच खरेदी करण्याचं मनातलं स्वप्न सफल झाले.रस्त्याच्या  दोन्हीकडे मोठमोठ्याला हापूसच्या बागा दिसत होत्या.
काही मोहरलेल्या तर काहींना हिरवीगार कैऱ्या दिसत होत्या.रस्ताही चांगला असल्याने गाडीचा वेग वाढला होता.नांदगावला आम्ही मुंबई-गोवा हमरस्त्याला आलो.
तडक कोल्हापूरला न जाता,शाहूवाडीतील मलकापूर मार्गे कराडला जायचं असल्याने रत्नागिरीकडे निघालो.
खारेपाटण,राजापूर करत लांजा पासून साखरपा मार्गे आंबा घाटाकडे निघालो. हा रस्ता टेकड्या टेकड्यांचा चढ उतार आणि तीव्र उताराचा वळणावळणाचा होता. साखरप्याजवळ आंबाघाटाच्या रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावर आलो.सह्याद्री पर्वत रांगेतील हा वळणदार घाट , एकेका  बाजूला वळसा घालत घाटाचा रस्ता आहे.रत्नागिरीहून नाणिज मार्गे कोल्हापूरला मलकापूरातून शिराळ्याला जाणारा हा मार्ग.
आंबाघाटात बऱ्याच झाडा झुडपांची पानगळ होऊन काहींनी लालसर पालवी फुटलेली दिसत होती.त्यामुळं ती झाडं इतरांपेक्षा उठावदार दिसत होती.
     पुढं घाटमाथ्यावरील शिवारात सर्वत्र ऊस आणि मक्याची शेती दिसत होती.रस्त्याच्या दुतर्फा सुप्रसिद्ध कोल्हापुरी थाळीआणि नाष्ट्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट सराबराईसाठी आकर्षक फलक आणि सजावटीने पर्यटकांना भुरळ घालत होती.
मलकापूर आल्यावर कोकरुड मार्गे काले,पाचवडमार्गे कराडलानिघालो.हा तसा आडमार्ग होता.थोडं पुढं गेल्यावर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण चालू होते.त्यामुळं कमी वेगात कसरत करत गाडी चालली होती.त्यामुळे परतीच्या प्रवासाला विलंब होत होता.भूकेची जाणीव झाली.कोकरुडमधून जाताना एका ठिकाणी माळवं विकायला बाया बसल्या होत्या.त्यांच्याकडे वाळकं(काकडीचा एक प्रकार) विकायला होतं.ते बघितल्यावर गाडी बाजूला घेऊन हिरवंगार लांबसडक दोन किलो खरेदी केलं.अन् ताव मारायला सुरुवात केली.त्यांची चवही छान असते कोल्हापूर, इचलकरंजी,कराड ,पाटण सांगली भागात स्थानिक बाजारात भरपूर असते.त्यापुढेही रस्त्याचे काम चालू होतं.तशीच गाडी दामटवत निघालो.घोगाव व येणपे जवळील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या पवनचक्क्या पाहून;गाडी थांबवायला लावली. त्यावेळी मागून येणाऱ्या उसाच्या टॅक्टरवरील दोघं पार गुलालानं माखली होती.टॅक्टरवरही गुलाल उधळला होता,
रिबीनी बांधलेल्या होत्या.आणि मोठ्या आवाजात टेपवर गाणं वाजत होतं.दोघही खुश दिसत होते.
त्यातला एकजण गाण्याच्या तालावर नाचतही होता. जेव्हा साखर कारखान्यांचा हंगामाची सांगता होताना पट्टा पडतो .तेव्हा सगळे गाडीवाले वाहनं सजवून गुलालाची उधळण करीत, गाण्याच्या तालावर नाचत मिरवत कारखान्यावर जातात.त्याची आठवण त्या टॅक्टरने करून दिली.टेकडीवरील पवनचक्क्यांकडे ऊन्हात कुसळाचं गवत तुडवत गेलो.विविध पोजमध्ये फोटो काढले.सेल्फित छबीही टिपली.तदनंतर कराडला निघालो. घोगाव,येणपे,उंडाळे करत नांदगावात आलो.
मग नांदगांवच्या पुढं हॉटेल शुभारंभ मध्ये दुपारचे सामिष जेवण करून भटकंतीचा विराम झाला.चौपदरी हमरस्त्याने कराड,सातारा करत वाईला पोहोचलो.
मस्तपैकी निसर्गासवे सागरकिनारी मार्गे रेडी ते देवगड मनसोक्त फिरलो.
समाप्त
क्रमशः भाग-१७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड