९|पुस्तक परिचय मराठ्यांची स्फूर्तीतीर्थे,पराग लिमये
मराठ्यांची स्फूर्तितीर्थे
तेजोमय इतिहासाचे साक्षीदार
लेखक--पराग लिमये
प्रकाशन-राफ्टर पब्लिकेशन्स, मुंबई
-----------------------------------------------
इतिहास प्रेमातून सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनवटवाटांनी केलेली दुर्ग,गडकोट किल्ले भटकंती भ्रमंतीकार पराग लिमये यांनी 'मराठ्यांची स्फूर्तितीर्थे ' या पुस्तकात रेखाटली आहे.या पुस्तकाला आनंद पाळंदे यांची प्रस्तावना लाभली आहे.अलिकडे जनमानसांमध्ये गिरीभ्रमण आणि किल्ले भटकंतीची आवड वृध्दिंगत झाली आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराच्याचे साक्षीदार गडकोट आहेत.ते बघायला झुंबड उडालेली आसते.सह्याद्रीच्या बेलाग कड्यांवर प्रेम करणाऱ्या साहसी ट्रेकिंग संस्थाही अशा पदभ्रमंती आयोजित करतात.हल्ली सोशल मिडियावर भटकंतीचे अनुभवसिध्द लेख प्रसिद्ध होतात.त्यापैकी काही ध्येयवादी ट्रेकर भ्रमंतीचा प्रवास इतरांसाठी दिशादर्शक व्हावा, मार्गदर्शक व्हावा म्हणून पुस्तक रूपाने प्रकाशित करतात.
महाराष्ट्राच्या इतिहासात १८वे आणि१८वे शतक, "शतक युद्धांचे" म्हणून ओळखले जायला हवे.या २०० वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राची संपूर्ण भूमीच जणू समरभूमीत रूपांतरित झाली होती. चहूबाजूंनी संकटांनी घेरलेल्या परिस्थितीत आणि 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'अशा कठीण समयी, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इये देशीचे मराठे तळहातावर शीर घेऊन प्राणपणाने शत्रूशी लढले.
छत्रपती शिवरायांचा 'स्वातंत्र्य-प्रेरणेचा'मूलमंत्र शिरोधार्य मानून या कालखंडात असंख्य ज्ञात- अज्ञात योध्दे आणि वीरांनी आपल्या रुधिराच्या सिंचनाने आणि प्रसंगी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्यदेवीचा यज्ञ सतत धगधगत ठेवला. म्हणूनच,ते योध्दे आणि ती पवित्र धारातीर्थे, दुर्गतीर्थे आणि स्मरणतीर्थे महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेचे अभिमानदंड आहेत.महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या तेजोमय इतिहासाचे साक्षीदार असलेली सर्वस्फूर्तितीर्थे अक्षय ऊर्जा आणि चैतन्याचे निधान आहेत.
'मराठ्यांची स्फूर्तीतीर्थे ' यापुस्तकात त्यातील काही निवडक प्रेरणास्थळांचा इतिहास-भूगोल-विज्ञान व नकाशे यांच्या सहाय्यानेअभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचा प्रयत्न केलाय.आजच्या तरुण पिढीने महाराष्ट्र आणि भारतवर्षात सर्वदूर पसरलेल्या या सारख्या असंख्य स्फूर्तीतीर्थांचे दर्शन घेऊन आणि तेथील पवित्र मृत्तिका आपल्या भाळी लाऊन आपल्या गौरवशाली परंपरेचे पाईक होण्यासाठी कटिबद्ध व्हावे हीच अपेक्षा आहे.
या पुस्तकातील लेखनात दोन प्रकार आहेत.पहिल्यात गडावर जायचे कसे आणि गडाची माहिती देणारा गाईड,तर दुसऱ्या प्रकार म्हणजे झालेल्या प्रवासाचे वर्णन.
इतिहासाला प्राधान्य देणारी पुस्तके दुर्मिळ असतात.पराग लिमये यांचे हे पुस्तक असेच इतिहासाला प्राधान्य देणारे असून गड किल्ल्यांचे नेमके स्थान आणि स्वरुप काय, नेमके कसे बघावेत,कसे जावे,तिथं वैशिष्ट्ये पूर्ण बघायला काय आहे? याची इत्यंभूत माहिती आपल्याला मिळते.अत्यंत बारकाईने त्यांनी निरीक्षणे नोंदविली आहेत.सहज सुंदर भाषेचा वापर केला आहे.त्यामुळे वाचताना ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात.गडांची नव्याने माहिती मिळते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यांची ऐतिहासिक कार्यकाळातील माहितीचा इतिहास बांधकाम,लढाया, वैशिष्ट्ये आत्तापर्यतचे शासक आणि किल्लेदार यांची माहिती नव्याने रसिक वाचकांच्या मनाला मोहित करते.
लेखकांनी गडाचे वर्णन सविस्तर केले आहे.त्यामुळे वाचकांना गडावर फेरफटका मारल्याचा आभास निर्माण होतो. गड नेमकेपणाने का बांधला याची महती अभ्यासपूर्वक पध्दतीने लिहिली आहे.गडा सोबतच इतरही मराठा इतिहासातील स्मृतीस्थळांचा समावेश केला आहे.भव्य आधुनिक बांधकामे करून मराठा इतिहासाचा काळ जागविण्यापेक्षा त्या काळातील स्फूर्तीस्थळे म्हणजे इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याची गवाक्ष आहेत.
लेखकांचे हे दुसरं पुस्तक आहे.मराठ्यांच्या दैदिप्यमान, तेजोमय आणि पराक्रमी इतिहासाच्या पाऊलखुणा दुर्गतीर्थे,शौर्यतीर्थे आणि स्मृतितीर्थे यांचा मागोवा घेण्याचा सार्थ प्रयत्न केला आहे.तो सफल झालेला दिसून येतो.इतिहासाची मूक साक्षीदार असणारी गौरवस्थळे अखंड आणि अक्षय ऊर्जेची स्त्रोत आहेत.म्हणूनच आजच्या तरुणाईने या गौरवशाली वैभवशाली स्थळांना भेटी देऊन त्यापासून प्रेरणा घ्यावी,याच उद्देशाने या पुस्तकाचे लेखन केले आहे.
खगोलीय अभ्यासक प्रथा.मोहनराव आपटे आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक लेखक वक्ते श्री निनादराव बेडेकर या गुरुतुल्य मार्गदर्शकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी लेखनाला सुरुवात केली.सुमारे ३५वर्षे माझ्या सामाजिक कार्य आणि भटकंतीला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे आई वडील आणि पत्नीलाही या पुस्तकाचे श्रेय देतात.
'मराठ्यांची स्फूर्तितीर्थे' या पुस्तकात शिवलंका सिंधुदुर्ग,गडात गड रांगणो गड,पावनतीर्थ धारातीर्थ किल्ले सज्जनगड, किल्ले कुलाबा, मृत्युंजयाचा अखेरचा प्रवास तुळापूर-वढू,मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर १६८२-१६८९,कोरबारसे मावळचा राखणदार कोरीगड,रोहिडखोऱ्याचा स्वामी किल्ले रोहिडा,शौर्याचा वारसा वसंतगड, अपरिचित वर्धनगड,धारातीर्थी भूदुर्ग सोलापूर,एक गड आला...पण एक गड गेला, असामान्य आसामी योध्दा लछीत बड फूकन,थोरले बाजीराव पेशवे स्मृतितीर्थ रावेरखेडी,समरभूमीचे धुरंदर चिमाजी अप्पा,मराठा खंदक कलकत्ता,शिवजन्म आणि खगोलीय अवकाश,राजसभेतील दिशासाधन, स्वराज्य ते साम्राज्य अशा वैविध्यपूर्ण १९ तीर्थस्थळांचा समावेश केला आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कुरटे बेटावरील "शिवलंका सिंधुदुर्ग" या जलदुर्गापासून प्रारंभ करुन साम्राज्य कसे विसरता येत इथंपर्यतचा आलेख रेखाटला आहे.प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार नकाशा काढून दिशादर्शक माहिती आपल्याला समजते.लेखनशैली सहज सुंदर समर्पक शब्दांत मांडणी केली आहे.त्यामुळे वाचकांचे कुतुहल वाढते.अनोखळी स्मृतीस्थळांना भेट देण्याचा मनोनिग्रह होतो.वाचतानाचा भेट देण्याची खूणगाठ आपण बांधू शकतो असं रसभरीत अभ्यासपूर्ण विवेचन आणि विश्लेषण केले आहे.वाचकांची रुची वाढते जाते. वाचताना आपली घरबसल्या इतिहास काळातील गडकिल्ल्यांची भेट घडते.प्रत्येक गडाचे वेगळं वैशिष्ट्य सूक्ष्मपणे लिखित केलेले आहे तेजोमय इतिहासाचे साक्षीदार असलेले ''मराठ्यांची स्फूर्तितीर्थे'' ही गौरवशाली गाथा वाचायला इतिहास प्रेमी भटकंती करणाऱ्यांना निश्चितच आवडेल.
-----------------------------------------------
पृष्ठे-१९२
प्रथमावृत्ती २०२०
किंमत-२५०₹
शब्दांकन-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment