निसर्गाचा रंगोत्सव काव्य पुष्प-२१२
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ❗
निसर्गाचा रंगोत्सव
मित्रांसवे रंग उधळायचा
मनात बांधला होता चंग
कोरोनाने हिरमोड केला
रंगात रंगायचा झाला बेरंग|
काटेसावरच्या गुलाबी रंगानं
पिचकारीचे तुषार उडवूया
पांगाऱ्याच्या तांबड्या फुलांची
गुलालाची लाली पाहूया |
पळसाच्या केशरी फुलोऱ्याची
आरास नजरेत साठवूया
बहाव्याच्या पिवळ्या झुंबरांचा
हळदीचा साज मनभरुन पाहूया|
पानगळ झालेल्या झाडांची
कोवळी पालवी पाहूया
निसर्गाची मुक्त रंगपंचमी
पानाफुलात मनमुराद पाहूया|
वनातल्या फुलझाडांचा रंगोत्सव
भुईवरल्या सड्यात पाहूया
वेलींच्या नाना ढंगाची रंगपंचमी
रानमेव्याच्या फळात पाहूया|
मित्रांसवे चिंब रंगायची मजा
आठवणींच्या हिंदोळ्यात शोधूया
कोरोनाकाळात अंतर पाळून
माणुसकीच्या रंगात बहरुया|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment