२०|मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द, पुस्तक परिचय
२१|पुस्तक परिचय
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द
लेखक-डॉक्टर जयसिंगराव पवार
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
महाराष्ट्राचे आराध्यदैवत स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळात अनेक संकटं हिंदवी स्वराज्यावर चाल करून आली.परंतू महाराजांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांच्यावर मात केली.
त्यांच्यानंतर लगेचच 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द'सुरू झाले.सुमारे २६ वर्षाच्या कालखंडात मराठ्यांवर कोसळलेली संकटे सामान्य नव्हती.या धामधुमीच्या मोठ्या शौर्याने लढा देवून संकटांवर मात करून अस्तित्व टिकवून महाराष्ट्रधर्म वाढविला.बादशाह औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुसही हतबल केले.सन १६८१ते १७०७ औरंगजेब बादशहाच्या मृत्यूपर्यंतच्या काळास "मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दाचा कालखंड" म्हणतात.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्या अफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्ट करण्याचा महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला.आणि त्यातून इतिहास प्रसिद्ध 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द'सुरू झाले.स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६वर्षे लढले.अखेर मुघल बादशहास स्वराज्य ध्यासाने प्रेरित झालेल्या मराठ्यांनी पराभूत करून आपल्या दफनभूमीचा शोध याच महाराष्ट्रात घ्यावयास लावला.अशा कालखंडात झालेल्या स्वातंत्र्ययुध्दातील काही ठळक घटनांचा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी घेतलेला शोध,"मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द" या संशोधनात्मक ग्रंथात केला आहे.
इतिहास प्रेमी वाचकांसाठी जेष्ठ संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची संशोधनपर ग्रंथसंपदा पर्वणीच असते. लेखकांनी तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे .शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाच्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली.२५पेक्षा अधिक इतिहास विषयक ग्रंथ महाराणी ताराबाई,राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथ, सेनापती संताजी घोरपडे,मराठेशाहीचा मागोवा इत्यादी विषयांवर ग्रंथ लेखन केले आहे.
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त "राजर्षी शाहू छत्रपती:जीवन व कार्य"या मराठी,हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते.तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 'शाहू चरित्र'या ग्रंथांचे प्रकाशन करुन 'शाहूचरित्रकार ' म्हणून गौरविण्यात आले होते.
'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्दा'चा कालखंड सर्वात तेजस्वी कालखंड आहे.महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि निकराचा कालखंड म्हणजे मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द होय.या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखन ऐतिहासिक काळातील फारसी साधने,पत्रे,शकावल्या,समकालीन परकीय प्रवासी लेखकांची वर्णने,डायऱ्या,नोंदी,दरबारातील कागदपत्रे व घराण्यांकडील दस्ताऐवज, संशोधक इतिहासकारांचे साधन ग्रंथ,
दरबारातील पत्रव्यवहार आणि इतिहासकारांनी लिहिलेले ग्रंथ आदींचा चिकित्सकपणे अभ्यास करून समग्र इतिहास वास्तवपणे मांडला आहे.यातील आशयघन सहज सुंदर समर्पक शब्दांत विवेचन केले आहे.'आवश्यक तिथं गरजेप्रमाणे कागद पत्रातील पुरावे,उदाहरणे व दाखले दिलेले आहेत.त्यांचे स्पष्टीकरण व अन्वयार्थ समर्पक शब्दांत मांडले आहेत.प्रत्येक लेखानंतर संदर्भ सूची दिलेली आहे.
संदर्भ ग्रंथांची व व्यक्तीनाम सूची शेवटी दिलेली आहे.यातील बऱ्याच लेखांतून वाचकांना व अभ्यासकांना अनेक नव्या गोष्टी वाचायला मिळतात.
'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्दा'या ग्रंथांत संशोधकांनी राजधानी रायगडाचा पाडाव,सूर्याजी पिसाळ आणि वाईची देशमुखी, छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास,
सन १६८९ ची रायगडावरील महाराणी येसूबाई व अष्टप्रधान मंडळाच्या 'मसलती'चा परकीय प्रवासी लेखकांचा अन्वयार्थ, मराठ्यांची जंगी मोहीम:सर्जाखानाचा पाडाव,मुघल तख्त दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे छत्रपती राजाराम महाराज,महाराणी ताराबाई- राजसबाईंचे जिंजीस पोहोचणे, मराठेशाहीतील शोकांतिका सेनापती संताजी घोरपडे,राजा कर्ण छत्रपतींच्या गादीवर बसला काय? याची वास्तव माहिती, तदनंतर महाराणी ताराबाईंची कारकीर्दीची घौडदौड,या कालखंडातील सरदार पाटणकर घरातल्यांची तेजस्वी कामगिरी आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील शोध आणि बोध इत्यादी महत्वाच्या घटनांचा चिकित्सक अभ्यास करून संशोधनपर लेख वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत. यातील काही लेख पुस्तकातून व इतर माध्यमातून पूर्वप्रसिध्द झालेले आहेत.
छ्त्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई अशा तीन राज्यकर्त्यांच्या कारकिर्दींची माहिती प्रस्तुत केली आहे.मराठे वतनदार सरदार यांच्या मुघल सरदारांच्या विरुध्दच्या मोहिमा आणि मराठी लष्कराची वैशिष्ट्ये आदी बाबींचा समावेश केला आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यानंतरच्या इतिहासाचा मागोवा या ग्रंथात वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment