८ पुस्तक परिचय एका अवलियाचा प्रपंच, अंजली ठाकूर



💫🌿💫🌿🌿💫🌿💫

✒️|पुस्तक परिचय📔


   🔰 एका अवलियाचा प्रपंच

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

समाजसेवेचे असिधाराव्रत घेतलेल्या आमटे कुटुंबीयांची थक्क करणारी कहाणी! सदर पुस्तक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवाडी येथे तीन वर्षांपूर्वी  वार्षिक तपासणीसाठी गेलो होतो तेंव्हा पुस्तक भेट देऊन स्वागत केले होते.माझं आवडतं पुस्तक आहे.

   पुस्तकाच्या मलपुष्ठावरच या कुटुंबातील सदस्यांनी हाती घेतलेल्या नव्या वाटेवरच्या मानवतावादी कार्याचा शब्दसुंगध दरवळत रहातो. कुष्ठरोग्यांच्या  हातांच्या मदतीने,

अफाट जिद्दीच्या जोरावर माळरानावरही आनंदवन फुलवणारे डॉक्टर बाबा आमटे; त्यांना तितक्याच निष्ठेने साथ देणाऱ्या साधनाताई आमटे; कुशाग्र बुद्धिमत्ता ,कल्पकता व अविरत कष्ट करून त्या आनंदवनाचा सर्वांनी विकास करणारे डॉक्टर विकास आमटे ;हेमलकसा सारख्या दुर्गम प्रदेशात प्रचंड गैरसोयींना तोंड देत आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणारे डॉक्टर प्रकाश व डॉक्टर मंदा आमटे….केवळ एक व्यक्ती नव्हे तर अखंड कुटुंब मानव सेवेसाठी स्वतःला वाहून घेते आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते….! आमटे कुटुंबाच्या अथक परिश्रमांची ही कथा प्रेरणादायी तर आहेच, शिवाय या कष्टातूनत्यांनी जे विश्व उभे केले आहे त्याने केवळ भारतीयच नव्हे तर भारताबाहेरील जगालाही आश्चर्यचकित केले आहे.

  या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी,

त्या त्या परिस्थितीनुसार असणाऱ्या गरजाही वेगळ्या..पण ध्येय मात्र एकच पीडित- दुःखितांसाठी काहीतरी भरीव कार्य करायचे..!! आमटे कुटुंबीयांनी केलेल्या कार्याची अचंबित करायला लावणारी कहाणी या पुस्तकांमधून सविस्तरपणे मांडलेली आपल्याला वाचायला मिळते.

       मनोगतात लेखिका अंजली ठाकूर दर्शवितात,'की जीवन अधिक आनंदी करण्याचा नवा मार्ग आनंदवन आणि हेमलकसा ही ठिकाणं दाखवितात.बाबांचे आनंदवन आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील'लोकबिरादरी प्रकल्प' अव्याहतपणे चालणारा सेवेचा प्रवाह आहे.

समाजसेवेचे हे एकमेवाद्वितीय कार्य आहे.त्यांच्या कार्याचा जीवनपट एकोणतीस विभागात समाविष्ट केला अाहे.बाबांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण,

शिक्षण ते व्यवसाय याची उकल होते.ते कुष्ठरोग्यांच्या सेवेकडे कसे वळले.हा माईल स्टोन त्यांच्या जीवनात कसा आला.त्यांचे आनंदवन फुलवण्याचे काम आणि हेमलकसा येथील आदिवासींच्या प्रगतीसाठी आदर्शव्रत केलेलं कार्याची महती वाचताना लक्षात येते.वेगळ्या वाटा चोखाळून निरपेक्ष भावनेने झालेलं कार्यच इतरांना स्तिमित करते.प्रेरणा देते.

   पूर्वायुष्य व जडणघडण,लग्नानंतरचे अजब सहजीवन,

आनंदी आनंदवन,भरारी,अशोक वन,सोमनाथ,आनंदवनाचे लव व कुश ,नागपूरातील वैद्यकीय शिक्षण,विकासाची वाट, शेतकऱ्यांचे यक्षप्रश्न,बाबांचे आजारपण,भारत जोडो यात्रा भाग १व २ इंद्रावती व गोदावरी ,हाक नर्मदेची, शेजारधर्म प्रकाशमय ,ती अलौकिक भेट, लोकबिरादरी प्रकल्प,

कसोटी,काटे येणारे प्रसंग,अॅनिमल पार्क,

हेमलकशातील शाळा,आरोग्य सेवा शिबीरे आणि घेतला वसा टाकू नको इत्यादी अध्याय समाजसेवेच्या व्रताची उकल करतात.असामान्य कार्य कसं घडलं,फुललं याची गौरवगाथा म्हणजे एका अवलियाचा प्रपंच आहे.लेखिकेने सहज सुंदर शब्दात बाबा आणि दोन संस्थांची गाथा सुयोग्य शब्दात गुंफून कहाणीचा चरित्र ग्रंथ वाटतो.

   बाबांचे विचार वाचल्यावर खर्चली वाटते की, हा माणूस एवढे मोठे काम करून त्याबद्दल एवढा अलिप्तपणे कसा काही लिहू शकतो ? केवळ स्वतःची भीती बनवण्यासाठी जागतिक पातळीची काम करणे म्हणजे काय येरा गबाळ्याचे काम आहे काय? ज्यासाठी स्वतःचे,पत्नीचे,मुलांचे संपुर्ण आयुष्य पणाला लावले,ते काय केवळ एक भीती जावी म्हणून ? नाही बाबा होतेच असे-असामान्य,अद्वितीय, अलौकिक.कुठलेही श्रेय स्वतःकडे न घेणारे अलिप्ततावादी.त्यांचे हे गुण पाहिले की एका कवितेच्या काही ओळी आठवल्या शिवाय राहात नाही…

 त्यांनी गीता वाचली का, मला काही माहित नाही,

पण ते गीता रोज जगले, यात काही शंका नाही.

 हे वर्णन बाबांना अगदी चपखल बसते.जे तत्त्वज्ञान जीवनसार भगवद् गीतेत सांगितले आहे,त्याचे पारायण करण्यापेक्षा बाबांनी आपल्या आयुष्यात त्याचे अवलंबन केले. आणि हेच योग्य अपेक्षित पण अतिशय अवघड आनंदवनाचेकार्य बाबांनी केलेले आहे.

  रोग्यांना औषधोपचार करत करत त्यांना स्वावलंबी बनविणे हा धर्मास होता.हाताला काम देण्यासाठी जवळचीच जमीन स्वच्छ करुन तिथं शेती करायला सुरुवात केली.काही वर्षांपूर्वीची खडकाळ, ओसाड आणि निर्मनुष्य जागा हिरव्या रंगाचे शेले पांघरुण लागली.

आनंदवन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले.जरुरीपेक्षा जास्त बाजारात विकण्याचे ठरविले.पण कुष्ठरोग्यांच्या हातांनी उगवलेल्या भाज्या व धान्य खरेदीचा उत्साह फारसा लोकांनी दाखविला नाही.पण परदेशस्थ विदेशी लोक आनंदवनातील रुग्णांच्यात मिळून मिसळून वागतात हे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर आनंदवनातील धान्य,भाजीचा उठाव होऊ लागला. आनंदवन हीच सुधारित व आनंदी जागा पण त्याच्या आजूबाजूची खेडी मात्र दु:खी,कष्टी आणि  पीडीत आहेत.हे बाबांना मंजूर नव्हते म्हणून त्यांनी आजू -बाजूच्या परिसरात औषधोपचार सुरू केला.

       आनंदवनाने आता चांगलीच भरारी घेतली.बाबांवर विनोबा भावे आणि महात्मा गांधी या दोघांचा प्रभाव होता.त्यामुळे आनंदवनातील सूत आणि दूधाचा खप वाढला.सन १९५६ला आनंदवनाला जीप मिळाली.

पु.ल.देशपांडे बाबांचे निकटचे मित्र होते.त्यांनी बाबांना एक मुक्तांगण नावाचे ओपन थिएटर बांधून दिले.अनेकवेळा पु.ल.आणि सुनितीताईंनी भेट देवून बाबांच्या कार्याचे कौतुक करतात.बाबांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.'ज्वाला आणि फुले,माती जागविला त्याला मत,करुणेचा कलाम  होत.' बाबांनी कवितेतून अनेक विषय हाताळले आहेत.बाबा आनंदवना विषयी बोलताना आवडत्या कवितेतील ओळी गुण गुणतात..

I sought my soul

My soul I could not see

I sought my love

My love eluded me

I sought my brother 

I found all three……

मी माझ्या आत्म्याचा शोध घेतला,माझा आत्मा मला दिसला नाही.मी माझ्या प्रेमाचा शोध घेतला माझ्या प्रेमानं मला गुंगारा दिला.मी माझ्या बंधूचा शोध घेतला आणि मला तीनही गोष्टी गवसल्या….

बाबांनी असे अनेक नवनवे प्रयोगशील उपक्रम उन्नतीसाठी राबविले.हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे बाबांचे आणखी एक स्वप्न जे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी साकारले.नावाप्रमाणेच माडिया आदिवासी लोकांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणला.ज्याने त्यांचेच नव्हे तर इतरही अनेकांचे आयुष्य पार बदलून गेले.

 आदिवासी लोकांशी मैत्री, उपचार करता करता आणि जंगलात राहता राहता प्रकाश आमटे आपसूक खरेखुरे मोगली झाले.हिंस्र,वन्य आणि पाळीव प्राणी यांच्याशी सहजपणे,प्रेमाने आणि उत्साहाने खेळत.अॅनिमल पार्कच तिथं फुलली होती.नेगल तर डॉक्टर प्रकाश आमटेंच्या फार प्रिय होता.या प्राण्यांसोबतच्या सुखदुःखाचे प्रसंग वाचताना नजरेसमोर येतात.प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्नांचा प्रवास अखंड न रहाता तो विस्तारित जावा,कार्याच्या आकाशाचा परीघ वाढावा असा आशीर्वादच बाबांनी या कवितेतून दिलाय. 

थांबला न सूर्य कधी थांबली ना धारा 

आणि धुंद वादळात कोठला किनारा दुःखाच्या मुलखातील हा प्रकाशयात्री उडवित घन  निबिडातील भयान रात्री 

शापल्या शिळात प्राणी जागवित आला पांगळ्या मुठीत जिद्द जखमातुन ज्वाला आंधळेच अंतरंग आढळे न थारा 

त्यात एक तेजाचा बांधला निवारा 

 अश्रूंच्या बंडात गर्जला इशारा 

थांबला न सूर्य कधी थांबली न धारा…

किती बोलकी कविता बाबांनी रचलेली आहे.

असा हा सामाजिक बांधिलकीच्या सेवेचा  'एक अवलियाचा प्रपंच' वाचताना आनंदवन आणि हेमलकसा या परिसरातील इत्यंभूत सुधारणांचे दर्शन घडते.

____________________________

🔰 एका अवलियाचा प्रपंच

लेखिका- अंजली ठाकूर

संकलक-भाऊ मराठे

प्रकाशन- रिया पब्लिकेशन्स , मुंबई

पृष्ठे--२७२

किंमत--३३०₹

आवृत्ती-२०१४

परिचयकर्ता-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड