२१|पुस्तक परिचय,व्यक्ती आणि वल्ली
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
२२|पुस्तक परिचय
व्यक्ती आणि वल्ली
लेखक-पु.ल.देशपांडे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
महाराष्ट्राच्या रसिक श्रोते अन् वाचकांना मंत्रमुग्ध करणारे प्रतिभावंत शाब्दिक कोट्यांचे महामेरू साहित्यिक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते आदरणीय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तमाम महाराष्ट्राचे लाडके पु.ल. यांचे हे अक्षरशिल्प 'व्यक्ती आणि वल्ली', रसिकांच्या मनात ठाण असलेल्या व्यक्ती रेखांना विनोदी मिश्किली ढंगाचा साज देऊन रेखाटलेलं पुस्तक.प्रत्यक्ष कथा आदरणीय पु.ल.(भाईंच्या) तोंडून ऐकताना बघताना रसिक श्रोते हास्याच्या सागरात चिंब भिजतात.
मनसोक्त हसतात.अतिशय गाजलेले हे पुस्तक आहे.या पुस्तकास १९६५साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.हा व्यक्तिचित्र संग्रह प्रकारातील आगळावेगळा नाविन्यपूर्ण मिश्किली भाषेत व्यक्तीरेखाटन केलेलं आहे.लेखक आणिव्यक्ती यांच्यातील संवाद प्रसंग वाचताना अक्षरशः वाचक हरखून जातो.रसास्वाद घेत मनसोक्त हास्याचा आनंद घेतो.या व्यक्तींना बोलकं करण्याचं काम लेखनशैलीने केले आहे.
ही माणसं आपल्याला दैनंदिन जीवनात कोठेना कोठे भेटलेली असतात.गुणाअवगुणांचे यथार्थ दर्शन,स्वभाव वैशिष्ट्यांचे मार्मिकपणे वर्णन, दिलखुलासपणे संवादाचे लेखन केले आहे.पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या जगरहाटीतील त्या पिढीची ओळख करून देणाऱ्या बोलक्या व्यक्तीमत्त्वांचे दर्शन घडते.रसिक वाचकांवर या व्यक्तींची छाप पडते.मराठी साहित्यात साठी गाठत असलेल्या या पुस्तकाची आजही लेखन शैली मनाला भुरळ घालते.अभिजात लेखन शैलीचे दर्शनच घडते.मलपृष्ठावरील लेख म्हणजे या व्यक्तीरेखांचा प्रवास कसा घडला ,
व्यक्तींचा अंतर्मनातील स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारा लेख आहे.१९४४ साली ''अभिरुची"च्या एका मासिकात 'भय्या नागपूरकर'हे व्यक्तिचित्र लिहिले.ते वाचकांना खूप भावले.विनोदी साहित्याची रेलचेल असताना एका वेगळ्या मिश्किली दर्जेदार लेखनाची पु.लं.ची शैली वाचक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली.त्यांच्या कथांमधील अनेक किस्से, संवाद आणि गंमतीशीर निरीक्षणाचा आस्वाद घेऊन महाराष्ट्र खळखळून हसू लागला.अशाच आपल्या अवतीभवती असणाऱ्या, जवळच्या वाटणाऱ्या २०व्यक्तींच्या व्यक्तीचित्रांच्या भेट होते.
आपले घरचेच मंगलकार्य समजून लग्न ठरवण्या पासून ते पार पडेपर्यंत अनेकांनी मोठ्या विश्वासाने सांगितलेले पडेल ते काम करणारा भाबडा 'नारायण'.इतिहासाशी समरस होऊन प्रत्येक घटना ,"अरे पुराव्यानं शाबीत करीन"असा संवाद साधणारा 'हरितात्या' अगोदर अंगणातल्या पोरांना भेटणार मग थोरांना भेटणारा.इतिहासाचे पंख लावलेला वेडा माणूस आपल्या आवेशपूर्ण साभिनयाने
सादरीकरण करुन दाखविणाऱ्या हरितात्याचे चित्रण अफलातून केले आहे.आमच्या चिमुकल्या हरळीच्या मुळ्या त्याने भूतकाळात नेऊन रुजविल्या. निर्विकार चेहऱ्याने शांतपणे फिल्मी दुनियेतील खबरबातम्या टिपीकल मोजक्याच शब्दात व्यक्त करणारा "नामू " अजबच व्यक्ती वाटते.सदैव कपड्यांच्या (कापडं धुण्याच्या) जगात वावरणाऱ्या नामूचे मिश्किलपणे लिखाण वाचताना हास्याची लकेर उमटते.अतिव करुणादायक दायक शांत स्वभावाने पुस्तकात रममाण होऊन त्यातील विचाराप्रमाणे जीवन जगणारा 'सखाराम गटणे'फक्त साहित्यिकांच्या स्वाक्षरी संग्रही करुन, पुस्तकातील विशिष्ट वाक्ये वापरून लकबीने इतरांशी संवाद साधणारा सखाराम.त्यांचे वेडं वाचनप्रेम सुंदर शब्दात खुलविले आहे.
सख्याच्या लग्नात आहेर म्हणून सगळी पुस्तकं भेट देऊन पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला,"साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशी ही!"सुखलोलूप उंची जीवन जगणारा काॅलेज कुमार नंदा प्रधान,नाटकं कंपनीत साईड रोल करणाऱ्या जनार्दन नारो शिंगणापूर कर अर्थात 'जनू'ची चित्तरकथा "बोलट" कथा त्याच्या बालपण ते वृध्दपणाची अक्षरवैभावात मांडली आहे.गाण्याची मैफल ऐकणारा, सजवणारा भय्या नागपूरकर, मुलींच्या बित्तबातम्या लेखकांशी शेअर करून हितगुज साधणारा'नाथा कामत'.दोन वस्ताद या व्यक्ती चित्रात विडी शिलगावित मैफिलीचे वर्णन करणारा तबलजी टिल्या वस्ताद आणि जंगी कुस्तीच्या आखाड्यात मर्दुमकी गाजविलेला ज्योतिबा वस्ताद यांचे चित्रण तर लाजवाब आहे.निर्गून निराकारी चेहऱ्याचा सतत लेखकाबरोबर सावलीसारखा वावरणारा शाळकरी व महाविद्यालयकरी मित्र 'गजा खोत'.संस्कृतचे अध्यापक असून इंग्रजीत बोलणारे अण्णा वडगावकर.परोपकारी गंपू, चितळे मास्तर,लखू रिसवूड, बापू काणे, ते चौकोनीकुटुंब,तो,पेस्तन काका,बबडू आणि अंतू बर्वा या व्यक्तीचित्रांचे वर्णन वाचताना हसून हसून पुरेवाट होते.असं व्यक्तींच्या वल्लींचं चित्रण खुमासदार, मिश्किल शैलीत शब्दबध्द केले आहे.एक अवीट गोडीचे रसदार वर्णाचे पुस्तक आहे.
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव-व्यक्ती आणि वल्ली
लेखक-पु.ल.देशपांडे
साहित्य प्रकार--व्यक्तीचित्रे
प्रकाशन-मौज प्रकाशन गृह
पृष्ठे-२१४
आवृत्ती-एकोणतिसावी
किंमत-८०₹
श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment