१०| पुस्तक परिचय कुतूहलापोटी, अनिल अवचट
१०|पुस्तक परिचय
कुतूहलापोटी
लेखक--अनिल अवचट
प्रकाशन- समकालीन प्रकाशन, पुणे
प्रकाशक-आनंद अवधानी| श्याम देशपांडे| सुहास कुलकर्णी
-----------------------------------------------
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्य दडलेली आहेत !पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षे टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्ष सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात ? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यच आश्चर्य !आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच. या आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तके पालथी घातली आणि कोडी सहज सोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली. सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला शोध वाचाल, तर थक्क व्हाल गुरु!
अगदी खरंय निसर्गचक्रातील चमत्कारिक ,आश्र्चर्यकारक आणि अद्भुत वाटणाऱ्या नवलाईच्या गोष्टींचा उलगडा 'कुतुहलापोटी'हे कृतीशील पुस्तक वाचून आपल्याला निसर्ग आणि विज्ञानाचे परस्पर सहकार्य संबंध समजतात.
या पुस्तकाला सुप्रसिद्ध डॉक्टर अभय बंग यांची प्रस्तावना लाभली आहे.त्यामध्ये ते संबोधित करताना सांगतात की,लहान मुलांचं न संपणारं कुतूहल, वैज्ञानिकाची जिज्ञासा व श्रेष्ठ दर्जाची सहज लेखन शैली अशी तीन व्यक्तिमत्त्व एकत्र येऊन बहुदा हे पुस्तक लिहिलं असावं.कुतूहलापोटी निर्माण झालेल्या प्रश्र्नांची उत्तरे शोधण्यासाठी उचललेले हे धाडसी पाऊल आहे.सोशल मिडीयातील गुगल आणि विकिपीडिया यांच्याकडून अपेक्षा पूर्ण न करता,त्या प्रश्र्नांच्या मुळाशी जाऊन ,त्यातील अभ्यासू विषय तज्ज्ञाला गुरु मानून जिज्ञासू वृत्तीने उत्तर मिळविण्याचा खटाटोप केला आहे.बड़ी मुश्लिकसे पैदा होता हैं चमन में दीदावर कोई!इथं प्रश्न विचारणारा जसा निरागस तसेच उत्तर देणारे 'गुरु' मोठे रसिक आहेत.हे पुस्तक वाचताना जीवशास्त्रीय संगीताची मैफल भरली आहे.यावं बसावं, ऐकावं,आणि आनंद घ्यावा,असं हे पुस्तक त्यासाठी आपणास निमंत्रित करते.
अनिल अवचट हे मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आहेत.साहित्यविश्वात चौफेर लेखन केले असल्याने मराठीत 'एक अवचट शैली' लेखनशैली मानली आहे.प्राणी आणि पर्यावरण यांच्या लहानांसाठी गोष्टी लिहिता लिहिता त्यांनी कुतूहलापोटी घेतलेला निसर्गचक्रातील प्रश्र्नांची उकल केली आहे.नैसर्गिक घटनांकडे अलिप्तता,भीती ,घृणा अशा भावनांऐवजी आश्र्चर्य, कौतुक आणि आनंद या वृत्तीने आपुलकीने बघण्याच्या दृष्टिकोनास खरंच मनापासून सलाम करावा वाटतो.
अनिल अवचट हे 'कुतूहलापोटी' पुस्तकाविषयी मनोगतात सांगतात,मला अनेक गोष्टींचे आश्र्चर्य वाटते.रेल्वेचे इंजिन,पक्ष्यांच मुलायम पीस, झाडांच्या पानांची सळसळ,
पर्णिकांची हिरवाई ,हृदयाचे स्पंदन,रक्ताचे साकळणं आणि मुलाच्या जन्माचं.याची उकल करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ माणसांना गाठावं, त्यांच्याकडून शिकावं शास्त्र, आणि शमवावं का आपलं कुतूहल? त्यांच्या सोयीनं माझी शिकवणी सुरु झाली.बेधडक प्रवाहात शिरुन, पुस्तक आणि गुरुकडून ज्ञान समजावून घेतलं, आणि मला समजलेलं वाचकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पुस्तक रुपाने केल्याचे नमूद करतात.वनस्पती तज्ज्ञ,पक्षी तज्ज्ञ,कीटक तज्ज्ञ यांनी जंगलवाटेने फिरताना निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी दिली.
माझ्या या शिक्षकांकडून कितीतरी आश्र्चर्य उलगडली.
जंगल फिरताना झाडांना बघत जंगलही पाहू लागलो. प्राणी आणि सूक्ष्मजीव अन्नसाखळीने एकमेकांशी निगडित असतील तर ते खरे जंगल; नाही तर ते लावलेली झाडं.
मधमाश्या, कीटक, पक्षी आहेत म्हणून उत्क्रांती पुढे सरकली; म्हणून आपण जन्माला आलोय.ही मंडळी म्हणजे आपल्या आजोबा-पणजोबा की!पक्ष्यांची विलक्षण घरटी, मधमाश्यांचे मध शोधणं,पक्ष्यांचे स्थलांतर अशी कितीतरी आश्र्चर्यकारण घडामोडी दिसतात.
जंगल बघितले की बापूंच्या शिकवणीचा प्रत्येत्य येतो. किडा बघितला की निरीक्षण सुरू.घरटे बघितले की स्थिर बसून पक्ष्यांची वाट पाहू लागतो. साप बघितल्यावर घाबरण्या ऐवजी मन त्या ओघळत्या चमचमणाऱ्या नागमोडी प्रवाहाकडे मंत्रमुग्ध होते.आता परकं असं काही वाटत नाही सगळे आपलेच. तो सुंदर किडा माझा भाऊच लागतो. किडया इतकं लहानही व्हावं आणि आकाशाइतकं मोठंही व्हावं! वाऱ्या इतकं बेभान व्हावं आणि जंगलातल्या झऱ्याच्या पाण्याइतकं झुळझुळ व्हावं!मग त्यातलं एखादं तरी आश्र्चर्य मनात घुसले की मी लागतो त्याच्या मागे त्याचे विषयी माहिती मिळवण्यासाठी.
या कुतूहलापोटीच उकल झालेल्या निसर्ग चक्रातील विविधांगी कुतूहलाची माहिती वाचकांना उपलब्ध केलीय.परोपकारी फंगस(बुरशी),सर्वसंचारी बॅक्टेरिया (जीवजंतू),आपले थोरले भाऊ कीटक,सापांची दुनिया, सहकारमहर्षी मधमाशा,पक्षी जाय अंतरा,आपलं विलक्षण शरीर, रक्षणकर्ते रक्त,कमाल पॅंक्रीची, कॅन्सर समजून घेताना आणि जन्मरहस्य अशी ११ आश्र्चर्यचकित निसर्ग धडे आहेत.
हे नवलाईचे' कुतूहलापोटी' उलगडलेली रहस्ये वाचायला आपण अधिर होतो.यातील अवघड बोजड शब्दांचे अर्थ पारिभाषिक शब्द यांचेही उकल केली आहे.वाचताना बऱ्याच गोष्टी अद्भुत आणि चमत्कारिक वाटतात,अशा गोष्टींची माहिती अभ्यासपूर्वक भाषेत उलगडून दिली आहे.
निसर्गातील एका वेगळ्याच घडामोडींची माहिती स्वत: पडलेल्या प्रश्र्नांची उकल करुन आपणास वाचायला मिळते.आपणाला तिटकारा वाटणाऱ्या घटनांवर संशोधन करुन त्यांचे उपयोगिता पटवून घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन करणे इष्ट ठरेल.
----------------------------------------------
पृष्ठे-२००
किंमत-२००₹
प्रथमावृत्ती
शब्दांकन-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment