२२|पुस्तक परिचय,भारत कधीकधी माझा देश आहे.



वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-२३ पुस्तकाचे नांव--भारत कधीकधी माझा देश आहे  लेखकाचे नांव--रामदास फुटाणे प्रकाशक-श्रीविद्या प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०१०पंचमावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-९६ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--काव्यसंग्रह मूल्य--६०₹

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

२३|पुस्तक परिचय

भारत कधीकधी माझा देश आहे

 रामदास फुटाणे 

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

     'नऊ ऑगस्टमुळे ,पंधरा ऑगस्ट दिसला

पंधरा ऑगस्टमुळे,सव्वीस जानेवारी दिसला

तरी एकाहत्तर वर्षांपासून,प्रजासत्ताक हरवला आहे!

व्यक्तिसत्ताक पुष्पचक्र पाहून,स्मृतिस्तंभ गहिवरला आहे'


 "भारत कधीकधी माझा देश आहे" या उपहासात्मक काव्यसंग्रहातील 'खंत' या कवितेतील हे भाष्यकाव्य आहे.या काव्यसंग्रहातील विडंबन,वात्रटिका आणि चारोळ्या महाराष्ट्रातील नामवंत प्रसिध्द उपाहासिकाकार, वात्रटिकाकार,भाष्यकवी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बहुआयामी व्यक्तिमत्त्व रामदास फुटाणे यांच्या आहेत.

राजकारणग्रस्त समाज वास्तवाचे विडंबन करून उपहासात्मक शब्दांच्या कोट्या करून कोपरखळ्या मारुन रसिक श्रोते आणि वाचकांचे मनोरंजन केले आहे.त्यांचे राजकीय सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या उपाहासिकांचे 'कटपीस, चांगभलं,फोडणी' आदी' काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.भारत कधीकधी माझा देश आहे ',यातील उपाहासिकांचे अनेक ठिकाणी काव्यमैफिलीत ,सभा,

समारंभ आणि व्याख्यान मालिकेत जाहीर कार्यक्रमात रामदास फुटाणे यांचे मार्मिक भाष्यकाव्य रसिकांना ऐकायला मिळाले आहेत.मैफिलीत ऐकलेली भाष्यकाव्ये सोपी असून त्यांच्या लयबध्द शब्दोच्चारणाने आणि सादरीकरणाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात.त्यामुळे श्रोते मनसोक्त हसून त्यांच्या उपाहासिकेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देतात.मलाही वाई येथे झालेल्या दोन्ही कार्यक्रमात चारोळ्या,विडंबनात्मक काव्ये ऐकण्याची मेजवानीच मिळाली होती.वाई येथील गणपती घाटावर आयोजित केलेल्या 'कवी संमेलनात' आदरणीय रामदासजी फुटाणे सूत्रसंचालक होते.तर २०११साली पंचायत समिती वाई येथील सभागृहात देशभक्त क्रांतिवीर किसन तथा आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याते होते.त्यावेळी मला कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती.कार्यक्रमानंतर त्यांनी 'भारत कधीकधी माझा देश आहे'या पुस्तकावर स्वाक्षरीची मोहर उमटवली आहे.असं हे पुस्तक माझ्या कडे आहे.हे मी  माझं भाग्यच समजतो.माझ्या वाचनालयातील काही पुस्तके मित्रांना देण्यासाठी चाळताना हातात आले.त्यावेळीही विडंबन वात्रटिका काव्य वाचले होते.आज पुन्हा चाळून परिचय करतोय..

   "सामना",'सर्वसाक्षी' या मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली असून 'सामना'चित्रपट ३राष्ट्रीय पारितोषिक विजेता आहे.त्यामुळेच १९७५साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली होती.असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारे  उपहासिकाकार रामदासजी फुटाणे यांचा 'भारत कधीकधी माझा देश आहे',

या काव्यसंग्रहाचा १९९८ साली 'शिवाजी विद्यापीठाच्या' अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.या पुस्तकास 'आई आणि इतर कविता'या काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध नामवंत कवी ,लेखक  प्राध्यापक फ.मुं.शिंदे यांची 'विरुपाची लोकरचना' या शीर्षकातील प्रस्तावना यातील विरुप , चारोळी आणि उपाहासिकांच्या महतीचा उलगडा करणे. यातील लोकरचना विडंबन , विनोद आणि व्यंगात्मक असून कृति,रुप आणि शैली या त्रिधारा एकाच प्रवाहानं खळाळताना दिसतात.ते म्हणतात,' रुढा 'तलं'असंगत टिपून चालत नाही तर 'गूढा'

तली गंमत गांभीर्याने मांडावी लागते.जिथं जिथं या विरुपांचे जन्म होतात तिथं तिथं रामदासजी फुटाणे यांची निरीक्षणात्मक दृष्टी लोकरचनेतलं विश्र्व बांधून ठेवते.त्या रचना लोकांना आवडतात.लोकांच्या मनावर ठसा उमटवून जाणाऱ्या रचना लोक जाणिवांचा आदर करणा-या आहेत.' महाराष्ट्राचे जेष्ठ साहित्यिक विनोदी लेखक या उपाहासिके विषयी मार्मिकपणे सांगतात की,'वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या कवितेचा पाणी खोल आहे.'

   या काव्यसंग्रहातील ६५ उपाहासिका वाचताना अंतर्मनातून चिंतन होते.भाष्यकविता ,वात्रटिका, चारोळी,

विडंबन का केलाय याचा विचार करायला लावतात.

आशयघन, सहजसुंदर शब्दात रचना आहेत.शेवटी टीपा स्वरूपात या कवितांचा अर्थ कारणं प्राध्यापक फ.मुं.शिंदे यांनी दिलेला आहे.एकंदर रसिक वाचकांना एक वेगळा काव्याविष्कार राजकारण आणि सामाजिकतायावरील बोचरीसल उपाहासिकेतून मांडली आहे.


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾


Comments

  1. अंतर्मुख करायला लावणारा पुस्तक परिचय...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड