७ पुस्तक परिचय गाठोडं पु.ल.देशपांडे
💫🌿💫🌿🌿💫🌿💫
✒️७ |पुस्तक परिचय📔
🔰 गाठोडं
कथा संग्रह--गाठोडं
लेखक- पु.ल.देशपांडे (भाई)
संकलक-भाऊ मराठे
प्रकाशक- नरेश परचुरे
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत साहित्यिक साहित्य आणि संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक विजेते ऋषितुल्य आदरणीय पु.ल.देशपांडे .आदरणीय भाईंनी साहित्य क्षेत्रात चौफेर लेखन केले आहे.मराठी माणसाला पु.ल.देशपांडेंनी काय दिले असेल तर , माणसांच्या दैनंदिन जीवनातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने टिपून त्यावर लेखन करुन रसिक वाचकांना मनसोक्त हसायला शिकविले.त्यांच्या अनेक दर्जेदार पुस्तकांपैकी "गाठोडं"प्रासंगिक लेखांचा समावेश यात केला आहे.याचे संकलन भाऊ मराठे यांनी केले आहे.
आदरणीय पु.ल.देशपांडेंनी विविध ठिकाणी दिलेली व्याख्याने,भाषणे,स्मरणिकांत प्रकाशित झालेले लेख,पूर्व प्रकाशित पत्रे, पुस्तकांच्या प्रस्तावना, महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातील लेख, गाजलेल्या मासिकातील लेख,आप्त स्वकियांना लिहिलेली पत्रे ,दुर्मिळ अशा ३८लेखांचा समावेश साहित्याच्या गाठोड्यात वाचकांना उपलब्ध केला आहे.
प्रस्तावनेत 'गाठोड्याची' उकल नाही.ते म्हणतात, 'इतक्या प्रस्तावना लिहिल्यानंतर व्याख्यानांना अध्यक्ष नसावा, साहित्य संमेलनाला उद् घाटक नसावा,ह्या चालीवर पुस्तकाला प्रस्तावना नसावी असं माझं मत झालं आहे.वाचक व लेखक यांची जी काय दोस्ती व्हायची ती थेट व्हावी.'
मार्मिक,हजरजबाबी भाषेचा वापर चपखल शब्दातून चौकार, षटकारांची आतषबाजी केली आहे.शब्दांचे फुलोरे फुलवून निखळ आनंद देणारे लेख आहेत.
लेखांचे वाचन करताना त्यातील प्रसंग,व्यक्ती आणि स्थळांचे दर्शन होते.
पु.ल.देशपांडे यांनी साहित्य अकादमीच्या समारंभात केलेल्या भाषणाचा सौ.मीना मराठे यांनी केलेला अनुवाद निर्भयता ही कलात्मक सर्जनाची शक्ती या लेखात केलेला आहे. 'मी साहित्यावर प्रेम करतो,परंतू अजूनही मला साहित्यावर शतपटीने प्रेम करायचे आहे.'मला जसं लिहायला आवडतं तसं मीलिहितो.वाचकहसले म्हणजे मी आनंदतो. मार्मिकच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्य पाहुणे म्हणून पु.ल.देशपांडे यांनी पाठविलेला पत्ररुपातील आशीर्वाद 'आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!' या शुभेच्छा पत्रातील लेख मैत्रीचा उंचावणारा आलेख दर्शवितो.
माणसांच्या समाजमनावर छाप पाडणारे विश्वासाचे कार्य पोलिसांना करावे लागते.
कर्तव्यपालन कसे असावे यासंबंधी मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर साहेबांना पाठविलेल्या पत्राता बदलती समाजरचना आणि पोलिस हा लेख दक्षता मासिकात प्रसिद्ध झाला होता. पोलिसांविषयी माहिती पूर्णता सदरचा लेख दर्शवितो.'यशस्वी संसाराचा मंत्र 'या स्नेह्याच्या मुलाच्या विवाहा निमित्त नवदांपत्याला पाठविलेला संदेश आहे.
फारच खुमासदार शैलीत लेखन केले आहे.
पतीपत्नीच्या नात्याचा मिश्कीलपणे उलगडा वाचताना तोंडावर हास्य न उमटेल तर नवलच! 'जीवनाला अर्थ असा आणावा' हे अप्रकाशित पत्र त्यांनी पायलट मेहुणा चंदूला लिहिलं होतं. आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी षष्टयब्दीनिमित्त स्नेह्यांना पाठविलेले पत्र" कसली साठी?ही तर पंचविशी".हे पत्र महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते.मिश्किलीने त्यांनी वर्णन केले आहे.'पिको हे मस्तक|दुखोत गुडघे||मैत्रीचे धागे|जैसे थे च ||'एकसष्ठी ऐवजी माझा सततचा वाढदिवस पंचविसाव्या म्हणून साजरा होत रहावा म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य आणि स्वास्थ्य लाभो हीच माझी मनापासून इच्छा आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जाहिराती बद्दल प्रेम संतोष जाहला हे पत्र,राजस मासिकातील विशाखाचे पत्र वाचनीय आहेत."गीतगंगेच्या तटावर''या विदर्भ साहित्य संघाच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कविवर्य सुरेश भट यांच्या कवितांच्या कार्यक्रम संपन्न झाला होता.त्यामध्ये निवेदक म्हणून भूमिका पु.ल.नी पार पाडली होती.रसिक मित्रहो सूरशब्दांच्या लीला पाहायला आपण इथं आलात.वीरभू जयशालिनी भारतमातेच्या सुरेश भटांनी केलेल्या जयगानाने जय जन्मभू,जय पुण्यभू,जय स्वर्गभू सुखदायिनी|जय धर्मभू,जय कर्मभू,जय वीरभू जयशालिनी|| असं निवेदन करुन शुभारंभ आरंभिला.समर्पक श्र्लोक कविता आणि वेचक वेचे वापरून कवितेची ओजस्वीता रसिकांच्या मनात उत्कंठा वाढवित होते.गझल काव्याचे स्वर,सुरावटीला मिळणारी दाद आणि कविता यांचे निवेदक अप्रतिमच! कालनिर्णय कॅलेंडर मधील लेखही शब्द साजाचे दर्शनच घडवितात.
आदरणीय लेखक व.पु.काळे ह्यांच्या पुस्तकाला दिलेल्या अहेरात सांगे वडिलांची कीर्ती या पत्रात ते वडिलकीच्या नात्यातील ऋणानुबंधाची झलक दाखवतात.श्री बापुराव माने लिखित'गुळाची गणपती'या सामाजिक नाटकाची प्रस्तावना पुस्तकाचे सारं प्रकट करते.अरुण दाते लिखित "शतदा प्रेम करावे"या पुस्तकाची प्रस्तावना, 'जीवनावरील मधुराभक्तीची कहाणी' या लेखात व्यक्त केली आहे.अरुण दाते यांनी खाजगी मैफिलीत चार गाणी म्हणावीत इतक्या सहजतेने आपल्या जीवनयात्रेची कहाणी सांगितली आहे.मनात घर करून बसलेल्या आनंदाच्या क्षणांची माळ गुंफावी,त्याच सहजतेने गाणी गाता गाता आठवणी गुंफल्या आहेत.लयीशी खेळत चाललेली बोलवाट आहे.आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या, घडलेल्या प्रसंगांच्या, आपल्या कुटूंबियांच्या मित्रांच्या स्मरणचित्रांचा सुंदर पट मांडला आहे.'माझे जीवन गाणे'हे केवळ गाणाऱ्याचे नव्हे तर साऱ्या कुटुंबियांने मंत्रजागरासारखे म्हणावे असं गाणं आहे.'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'अशा भाववृत्तीत रमून गझल वृत्तीतील भाव जोपासला.तर श्री शशी भागवत यांच्या 'मर्मभेद' कांदबरीची प्रस्तावना नवी पालवी लेखन शैलीचे कौतुक करते.जुन्या परंपरेचे सारे संकेत सांभाळत लिहिलेली कादंबरी आहे.नाथमाधवांच्या परंपरेच्या खंडित वृक्षाला फुटलेली ही नवी पालवी आहे.
विसर साऱ्या यातना अन् विसर साऱ्या वेदना, आजच्या रंका उद्याचा तू राव होणार रे…..प्रा.जनार्धन वाघमारे लिखित नीग्रो साहित्य आणि संस्कृती यावरील आस्वादपर लेख "एक निराळा कृष्णावतार" हा लेख आहे.गुलामगिरीतील मुक्ती आणि दान बहाल करताना केलेली हक्काची जाणीव सरांनी या पुस्तकात मांडली आहे.
ललित मासिकात प्रसिद्ध झालेला गदिमांच्या सहवासात हा लेख म्हणजे प्रतिभावंत ग.दि.माडगूळकरां इतका रसाळपणाने झिरपलेला कलावंत मला तरी आठवत नाही.
यावरुनच गदिमांच्या साहित्याविषयी पु.ल.चें मत या लेखातून प्रकटते.'ज्यांना माडगूळकरांचा सहवास लाभला नाही, त्यांना गदिमा पुस्तकात खूप जवळून भेटतील. ज्यांना लाभला, त्यांना ते सहवासाचे दिवस पुन्हा एकदा आठवतील. त्यातल्या गदिमांप्रमाणेच राजा ठाकूर, राजा परांजपे, गोविंदराव घाणेकर पु.भा.भावे यासारख्या दिवंगतांची आठवण तीव्रतेने येऊन हुरहुरल्यासारखे वाटेल.ही भावना बाबांनी पुस्तकाच्या शेवटल्या दोन पानात मुक्तछंदासारख्या शैलीत कळवळून व्यक्त केली आहे.
गदिमांच्या सहवासात आल्याने त्यांच्या प्रतिभेला नानाप्रकारचे धुमारे फुटत आना पाहून आनंदाने वेडे होऊन गेले मित्रांचे दुःख त्यातून उमटले आहे. ज्योतीने तेजाची आरती ही भावनाही दिसून येते. चोखंदळ वाचकाइतकाच साध्यासीध्या वाचकांशी गदिमांविषयीची जवळीक साधण्यात बाबा यशस्वी झाला असे मला वाटते.श्रीनिवास खळे यांना दिलेली सदिच्छा,नव्या वर्षाचे स्वागत झालंच पाहिजे एक जानेवारी :संकल्प दिन ,नवं वर्ष आणि सुखाचा चेहरा,नवं वर्ष...कुणाचं?,नवर्या वर्षांचा संदेश,बोलावे आणू बोलू द्यावे हे लेखही रसभरीत वर्णन वाचताना आपण गुंगून जातो.आधी लगीन कोंडाण्याचे या लेखात इतिहासातील काही व्यक्ती अजरामर असतात,
तशी काही वाक्येही अजरामर असतात. "आधी लगीन कोंडाण्याचे"हे सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचे असेच एक वाक्य आहे.मुलाच्या लग्नाचे आवतनं द्यायला गेलेल्या तानाजी मालुसरे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील प्रसंगाचे वर्णन आणि विवेचन अप्रतिम शब्दांकनात केले आहे.जीवनात सर्वस्व पणाला लावून सामाजिक सुखासाठी एखादा गड सर करण्याचे प्रयोजन लाभणे हेच माणसाचे खरे भाग्य.
धर्म आणि संगीत, विसंगत संगीत,पुणे एक मुक्त चिंतन मध्ये पुणेरी संस्कृतीच्या खासियतीचे वर्णन केले आहे.पुणेरी पाट्या, शिष्टाचार आणि खास तऱ्हा ठळकपणे वाचताना लक्षात येतात.रसिकतेचा महापूर, आकाशवाणीवरुन 'कारवार' वर केलेलं आणि चौफेर साक्षीदार या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेलं भाषण .तिथल्या व्यक्तींनी दिलेली माया ममतेचे शब्दवर्णन अवीट गोडीचे आहे.
नाट्यनिकेतनची रौप्यमहोत्सवी स्मरणिकेतील नाट्यकृतींची माहिती,घटना प्रसंग इत्यंभूत लिहिले आहेत.ललितकलांचे स्मरण,मी-एक नापास आजोबा, रंगभूमीवरचे रहिवासी नायक,आजचे मराठी नाटक आणि माझ्या विनोदी कविता.वाऱ्यावरची वरात या कार्यक्रमाची जाहिरात पु.ल.देशपांडे सहकुटुंब सहपरिवार करीत.मुक्तांगण वास्तुत स्नेहभोजनाचे निमित्ताने त्यांनी जेवायला वाढेपर्यत रंगलेल्या गप्पात अठरा कलावंतांवर लिहिलेल्या विनोदी कविता वाचून दाखविल्या होत्या..या कविता डॉक्टर श्रध्दानंद ठाकूर यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.असं रसिक वाचकांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारं 'गाठोडं'आहे.देहभान हरपून आपण वाचनाचा आस्वाद घेऊ शकतो.
गाठोड्यातील प्रासंगिक पत्रलेखन प्रपंचाचा वाचास्वाद घ्यायला मिळाला.
------------------------------------------
पृष्ठे--२२१
किंमत--२५०₹
शब्दांकन-श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Very nice 🙂
ReplyDelete