५|पुस्तक परिचय उद्याच्या आनंदासाठी, यशवंत पाटणे




💫🌿💫🌿🌿💫🌿💫


✒️५ |पुस्तक परिचय📔
🔰 उद्याच्या आनंदासाठी
लेखक- डॉक्टर यशवंत पाटणे
प्रकाशक- सौ सुनीताराजे पवार
संस्कृती प्रकाशन,पुणे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
   स्वत:शी व सर्वदूर पसरलेल्या वाचकांशी मनमोकळा संवाद साधण्याचे समाधान मला दैनिक 'लोकमत'मधील सलाम नमस्ते या ललित लेख सदराने २००६ ला दिले.समाजचिंतनाला प्रवृत्त करुन लिहितं करण्याचे काम सलाम नमस्तेने केले.पुढे लेखक म्हणतात की ,आजचे वृत्तपत्र उद्याची रद्दी असे म्हटले जात असले तरी अनेक अवलिया वाचक संकलक व संग्राह्य असतात.ते पत्र अथवा दूरध्वनी किंवा मोबाईल वरून आपल्या प्रतिक्रिया देतात.तेंव्हा लेखकाला आपल्या लेखनाची कोणीतरी नोंद घेते,हा आनंद लेखकाचा उत्साहित करीत असतो.जसं चोखून चोखून फेकून दिलेल्या कोयीत आंब्याचे बीज असते,त्याच विश्वासाने "उद्याच्या आनंदासाठी" हे पुस्तक त्या बीजातून आलेले अक्षररुप असल्याचे नमूद करतात.सलाम नमस्ते वाचकांच्या भेटीला येणारे भावभावनांचे प्रतिनिधित्व करणारे आहे.
     हे पुस्तक डॉ.यशवंत पाटणे यांनी महाराष्ट्राचे उपक्रमशीलउपमुख्यमंत्री नामदार आर.आर.पाटील ऊर्फ आबा यांना सस्नेह अर्पण केले आहे.
आबांशी लेखकांचे मित्रत्वाचे नाते.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमाणे राजकारणात सुसंस्कृतपणा आणि अभ्यासू वृत्ती जपणारी जी थोडीफार माणसं आहेत.त्यात आबांचा समावेश अग्रक्रमाने आहे.
ग्रामस्वच्छता अभियान वा तंटामुक्ती ग्राम हे उपक्रम समाज संस्कृती चे वैभव वाढविणारे आहेत.हे पुस्तक सादर करण्यासाठी ग्रंथपाल ते प्रकाशक यांचा आवर्जून उल्लेख सलाम नमस्ते मध्ये करतात.
    ललित लेखातील निवडक वेचे 'उद्याच्या आनंदासाठी' या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहेत.लेखन प्रासंगिक असलेतरी ते स्थल कालातील राहण्याची दक्षता डॉक्टरांनी घेतली आहे.चित्रविचित्र कालसंक्रमणात माणूस म्हणून आत्म सुखाने जगण्यासाठी मुल्यांची जपणूक करायला कश्याची गरज आहे ते ओळखून लेखन केले आहे.यामध्ये निवडक आणि सकस असे २८ वेचक लेख आपणास वाचायला मिळतात.हे वेचक वेधक लेख म्हणजे आचरणाचे संस्कारपीठ आहे.विचारांचे वैभव आहे.प्रत्येक पानावर आपणास काहीना काही एखादी ओळ,एखादा शब्द ,सुविचार किंवा श्र्लोक चिंतन करायला उद्युक्त करतो.या लेखात त्यांनी समर्पक उदाहरणे,दाखले ,गोष्ट व साहित्यिक आणि संतांचे विचार प्रस्तुत करुन आशयघन सहज सुंदर भाषेत गुंफण केली आहे.मन,गुणवत्ता,सुखाचा संसार ,पुतळे,जगण्यांच मोल आणि शुभेच्छा..! इत्यादी सदरातून आपणास मौलिक विचारांचे मार्गदर्शन होते.नेहमीच्या शब्दांचा उलगडा होतो.
   पुस्तकाच्या शीर्षकाचा लेख ही वाचनीय आहे.
'जीवनातील खरा आनंद म्हणजे एखाद्या उदात्त उद्दिष्टांशी जवळीक साधताना स्वत:ला विसरणे,आपले काम करीत राहणे ,यातच जीवनाचा खरा आनंद आहे.'असं मत पंडित जवाहरलाल नेहरूंचे दिले आहे.समाजाच्या  वेदना दुःख जाणण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते.याचे विवेचन करण्यासाठी 'डिअर वर्ल्ड'या पुस्तकाचा शांता शेळके यांनी घेतलेल्या मागोव्याचा उल्लेख केला आहे.
मनाच्या मशागतीसाठी मनोरंजन व करमणूकीची गरज आहे.ताणतणाव कमी करायला हास्याची गरज आहे.हास्याने मनावरचं ओझं कमी होऊन एकाकीपणा धूसर होतो.
        जगण्याचं मोल सांगताना मंगेश पाडगांवकरांच्या 'चिऊताई, चिऊताई दार उघड' या कवितेतील ओळींचे मार्मिक भाष्य केले आहे.लुगड्याचे मोल नावाची कथा आपल्याला चिंतन करायला उद्युक्त करते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा व शिका' या योजनेची महती श्रमाधिष्ठीत शिक्षण या सदरात केली आहे. स्वाध्याय,स्वाभिमान आणि स्वावलंबन ही अक्षरे अण्णांनी गोरगरीब पोरांच्या आयुष्याच्या पाटीवर कोरली म्हणूनच "रयत शिक्षण संस्थेच्या" संस्कार पीठातून समाजाला सावली देणारे असंख्य वटवृक्ष निर्माण झाले.
स्त्रीशक्तीचा आदर 'दुर्गातत्व'..या लेखात केला आहे.
सेवा,त्याग,समर्पण आणि प्रेम हे तिच्या जीवनाचे सुत्र झाले.सध्या अनेक स्त्रिया कर्तबगारीची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहेत.अॅनी बेझंट म्हणतात ,'कोणत्याही राष्ट्राची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे स्त्रीची उन्नती होय.'
  पत्रलेखन शुभेच्छा पत्रे आणि मोबाईल संपर्क यांचे मार्मिकपणे विवेचन शुभेच्छा! या सदरात व्यक्त केले आहे.पु.ल.देशपांडे यांच्या पत्राचा उल्लेख आपल्या भावनांवर फुंकर घालणारा आहे.विवेकानंद, महात्मा गांधी,पंडित नेहरू,साने गुरुजी, यांच्या पत्रांचा उल्लेख करुन पत्राचा भावस्पर्शी आलेख सीमेवरील जवान,
परदेशी लेकरु यांच्या समर्पक उदाहरणात मांडला आहे.ते म्हणतात पत्र म्हणजे भावनांची शब्दयात्रा, वैचारिक देवाणघेवाण,दोन जीवांचा संवाद हितगुज करतो.
     माणसांना हसण्यासाठी उमदं मन लागतं.
माणूस भावना व्यक्त करतो.हसणं जीवन प्रसन्न करतं.विनोदी माणसाला मित्रांचा तुटवडा कधी पडत नाही.हसणे हेच उत्तम जगण्याचे टॉनिक आहे.हे मोफत असतं, त्यासाठी विनोदाला दाद देणाऱ्या उमद्या मनाची गरज असते.हास्यावर  कविवर्य कुसुमाग्रजांनी कळकळीने सांगितलेल्या ओळी फारच बोलक्या आहेत.'रडणं तर नेहमीचंच, थोडं तरी हसा,
अंधाराचा आसरा, थोडावेळ विसरा आणि काळजात जपा ,उजेडाचा वसा.'हसरा माणूस जणू पौर्णिमेचा चंद्र, आपल्या प्रसन्न शीतल,मंद स्मित हास्याने सारं वातावरण आल्हाददायक करतो.देवळातील व्याख्यानाचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.विनोद- विचारांची मुक्तपणे उधळण करणारे आदरणीय पु.ल.देशपांडे हे आनंद यात्री आहेत.लेखक म्हणतात, माणसाचं बोचरं आयुष्य हसरं करण्याचं कसब विनोदात असतं, हसण्यात असतं, हास्य माणसाला चिंतामुक्त करण्याची मात्रा आहे.तेव्हा त्यासाठी,थोडं तरी हसूया..
    मनाला आनंद देणारी ,मशागत करत विचारांची मिमांसा करणारी ही सदरं आहेत.मनाला सजग करत संस्कारधन पेरणारी,सुख  कश्यात आहे हे? शोधायला लावणारी,थोरांचे विचार ऐकायला लावणारी,
जीवनातील सुखाचा आनंद मानणारी,अनुभवाचे संदेश वाचायला लावणारी,मानवतेशी मैत्री जोडणारी
वाचनीय तर आहेतच.तसेच यातील लेख पारायण करण्यासारखेही आहेत.मनाला भावलं ते परिचयात व्यक्त केलं.'उद्याच्या आनंदासाठी' हे पुस्तक वाचनीय आहे.व्याख्यानाच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी या पुस्तकाचे वाचन शब्दसामर्थ्यासाठी वेचक वेधक ठरेल...
--------------------------------------------
पृष्ठे-१०२
किंमत-१४०₹
आवृत्ती-चौदावी
शब्दांकन-✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
💫〰️💫〰️💫〰️💫〰️

Comments

  1. लटिंगे सर....खूपच छान पुस्तक परिचय..! !

    ReplyDelete
  2. धन्यवाद दोस्त श्री नितीन जाधव सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड