Posts

Showing posts from January, 2021

घाटावरची सांजवेळ काव्य पुष्प-१९४

Image
        घाटावरची सांजवेळ नदीच्या घाटावर रम्य सांजवेळ  जलावर उमटली तरंगाची सळसळ  मंद प्रकाशाने मंतरलेली कातरवेळ  झाडांची गर्दछाया पानांची सळसळ| निवांतपणाने विषय चघळतात काहींचे गप्पांचे फड रंगतात काहींची पावले फेरफटका मारतात  छोट्यांचे मजेशीर खेळ रंगतात| पाखरांचं स्वच्छंद विहारणं  पक्षी कोलाहल करतात  आभाळातील तेजाची किरणं  हळूहळू धूसर होतात | मग तिन्हीसांजेच्या गप्पा  दिवसाचा आढावा घेतात काळोखाच्या आगमनापूर्वी पक्षी घरट्याकडे परततात | माजलेलं विचारांचे काहूर  क्षणभरासाठी शांत होते  हलणारी पानं थबकतात   वाऱ्याची झुळूक मंदावते | कडूस पडलंकी बल्ब पेटतात  जलात दिसते प्रकाशाची रोषणाई   पावले घराकडे ओढू लागतात चालताना ऐकू येते शयनाई| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प-१९४

चौकट काव्य पुष्प-१९३

Image
                 चौकट  वेधक टिपलेली छबी  छायाचित्रात बध्द होते टेबल अथवा भिंतीवरील दर्शनी भागात झळकते| चौकट असते नात्याची  विश्वासाच्या रेघांची  नात्यांच्या कोनाची  एकत्र नांदण्याची | मनपसंत देखाव्याची  निसर्ग सौंदर्याची  ऐतिहासिक ठेव्याची पुरातन वास्तू वस्तूंची | विशेष पोजमधला फोटो  सुंदर मनमोहक वाटतो  दिवाणखान्यातील दर्शनी भागात भिंतीवर तसबरीत झळकतो| आयत, चौकोनी आकार धारणं  चित्रांचे बाह्यांगी नजारा खुलवणं चौकटीत असतं साचेबंद जगणं आयुष्याची चौकट उठावदार करणं| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९३ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

थाटमाट मिसळीचा काव्य पुष्प-१९२

Image
थाटमाट मिसळीचा भारीच थाट राऊ मिसळीचा पितळेच्या भांड्यात वाढण्याचा आदराने पाहुणचार करण्याचा पुरातनपण खुलविण्याचा ❗ कुरकुरीत पोहे खमंग शेवपापडी  दिमतीला नाजुकशी दह्याची वाटी  लज्जत वाढवायला तळलेला पापड कट रस्स्यासह कांद्याची वाटी❗  मटकी वाटाणा बटाट्याचा  रस्सा झणझणीत तर्रीचा   एकदा तरी चाखायला जावा  रस्सा बारा गावच्या मिसळींचा❗ लुसलुशीत मऊ मऊ पाव गप्पांगणात मिसळ मारतेय भाव गोड चाखायला जिलेबीचं कडं मिसळीच्या प्रकारांचे मिळत्यात धडं❗ शेतातल्या भात्याणाची नक्षी बघत  शोभिवंत हॉटेलचा फेरफटका मारु मराठमोळ्या अल्पोपहाराची खवैयेगिरी  मनमुरादपणे क्षुधाशांती  करु❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

बालभारती काव्य पुष्प-१९१

Image
वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ❗  *****बालभारती धुळाक्षरांच्या पाटीवर अक्षरे गिरवली बोबड्या बोलीतचित्रं वाचली  चित्रं वाचत अक्षरे उमगली  शब्दांची जुळवाजुळव झाली|  लेखनाची अभिरुची वाढवली धडे कविता पाठ झाली वाचनाची आवड वाढवली  ज्ञान माहिती मिळत गेली| नव्या कोऱ्या पुस्तकाचा दरवळे गंध  विचारांचा लाभला संस्कार सुगंध पुस्तकासवे लाभला मैत्रीचा बंध वाचन खजिन्याचा दरवळला गंध | बहीण भावाचे चित्र मनात घर करते  गणन,रसास्वाद ,परिसर फिरवून आणते  विज्ञान-तंत्रज्ञानाचे कुतूहल वाढविते  कथा कविता नाट्यछटा सादर करविते | बालभारतीचे पुस्तक बघितल्यावर बालपणीच्या आठवणी स्मरतात व्यक्त होण्याची संधी मिळाल्यावर  बाई अन् गुरुजी डोळ्यासमोर येतात | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९१

दिवाकराचं मावळणं काव्य पुष्प-१९०

Image
दिवाकराचं मावळणं  कॅनव्हासवर सूर्यास्त रेखाटला   विलोभनीय दृश्य तिन्हीसांजेला भगव्या रंगाची छटा आभाळाला  ऊर्जा देवून पल्याड निघाला | काळ्या धूसर छटेत  बिंब खुलूनी सजते  झाडाच्या तोरणा सवे  बिंब नजरेत भरते | थंडगार वारं अंगावर घेत  सूर्यास्ताचं  दृश्य न्याहाळत  प्रवासाचा वेग मंदावतो  रमणीय दृश्याला टिपतो | सूर्यास्ताचे दृश्य सागर किनाऱ्याचे  सांजचे दृश्य डोंगराआडचे  सायंकाळचे दृश्य क्षितीजावरचे  उल्हासित करणाऱ्या मावळतीचे| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

साठवणीतल्या आठवणी कॅसेट--ऑडिओ

Image
                📼कॅसेट--ऑडिओ📼 साठवणीतल्या आठवणी                रिळाची कॅसेट  प्रजासत्ताक दिन आणि ७४ वा स्वातंत्र्यदिन कोविड१९ या संसर्गजन्य आजारामुळे शारीरिक अंतर ठेवून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांच्या समवेत साजरा करावा लागला. विना विद्यार्थी कार्यक्रम साजरा होतोय.. नाहीतर दोनचार दिवस अगोदर सरावाच्या तयारीसाठीलागायचे.प्रभातफेरी,ध्वजारोहण, भाषणं,शालेय साहित्य वाटप, खाऊवाटप व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित केले जायचे.त्याचे नियोजन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि कवायतीची रंगीत तालीम टेपरेकॉर्डरच्या कॅसेटवर केली जायची.सकाळी लवकर शाळेत जाऊन लाऊड स्पिकरवर देशभक्तीची गोडवे गाणारी अजरामर आणि श्रवणीय गाणी लावून स्वातंत्र दिनाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा माहोल तयार व्हायचा. बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो|, जयोऽस्तुतेऽऽ श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे|,आचंद्र सूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे | मेरे देश की धरती,नन्हा मुन्ना राही हूॅं,देश का शिपाई हूॅं,बोलो मेरे संग जयहिंद जयहिंद,सारे जहाँ से अच्छा हिं...

गावच्या आठवणी- कलाविष्कार नाट्य रंगभूमी, ओझर्डे

Image
गावच्या आठवणी नाट्य रंगभूमी 🔔🎙️📣🔔🎙️📣🔔🎙️📣🏵️            गावच्या आठवणी-नाटक          🎭  नाटयरंगभूमी 🎭           🌸 कलाविष्कार नाट्य मंडळ ,ओझर्डे  🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️      🔔तिसरी घंटा वाजते.🔔 📣📢🎙️ सुस्वागतम , सुस्वागतम श्री गणेशाला अभिवादन करुन  रंगदेवतेसह नाट्यदेवतेला विनम्र अभिवादन करून कलाविष्कार नाट्य मंडळ,ओझर्डे सहर्ष सादर करीत आहे.धमाल विनोदी तीन अंकी सामाजिक नाटक,'लहानपण देगा देवा,लहानपण देगा देवा,.पात्र परिचय पार्श्वसंगीताच्या हळू आवाजात सुरू व्हायचा.नायकाच्या भूमिकेत.चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत..असं करत करतशेवटी..निर्माता..दिग्दर्शक.श्री भाऊसाहेब कदम(माधवराव)..अन् नाटकाची नांदीने सुरुवात व्हायची...    प्रत्यक्ष  तीन अंकी नाटक मराठी शाळेच्या मैदानावर सादर व्हायचं.रसिक प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद द्यायचे.भूमिका गाजविलेल्या कलावंतांना बक्षीसे मिळायची.तीच कसदार अभिनयाची पोच पावती मिळायची.लय भारी वाटायचे नाटक ...

बालपणीच्या साठवणीतल्या आठवणी वात्रटपणा

Image
बालपणीच्या आठवणी       वात्रटपणा  〰️⚡〰️⚡〰️⚡〰️⚡ चेष्टामस्करी,अवखळपणा आणि वात्रटपणा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे खट्याळपणा..विभोर मन असतं.नंतर काय होईल याची तमा न बाळगता कुठेही उंडारण, फिरणं, समवयस्क दोस्तांशी गप्पागोष्टी करणं, खेळणं.प्रसंगी भांडणं आणि थोड्या वेळाने एक होणं. आळीतल्या लग्नात धमाल करणं,मुद्दाम उचापती करणं असं चालूच असतं.पंगतीला जेवाय वाढायची लय हौस असेलतर . पंगतीला काय हवनको बघणारे असतात.ते वाढप्यांना सतत दटावत असतात. हे असं नस्तं वाढायचं,हे अगोदर वाढा, तिथं पाणी वाढा,गंध नीट लावा. नुस्ती खेकसाखेकसी चालायची, लय राग यायचा अशा माणसांचा..पण काय करणार? कार्य व्यवस्थित पार पाडणं महत्त्वाचं असायचं. एकदा आमच्या आळीतल्या एका मित्राचे लग्न वीर ते जेजुरी भागातील एका वाडीत होत.गावातल्याच टेम्पोने व-हाड जाणार होतं. सकाळी सहाचे  वऱ्हाड सात वाजता  निघालं.टेम्पो खचाखच भरलेला होता.काहीजण टपावर, फाळक्यावर बसलेले होते.दाटीवाटीनं कोंडवाडा झाला होता.त्यात अचानक ब्रेक मारला की फाळक्यावली सगळी बसलेल्यांच्या अंगावर आदळायची.त्यामुळं कावाकावी आणि शिव्या तोंडातनं बाहेर पड...

यात्रेतलं जेवण

Image
                       पाहुणचार : यात्रेतलं जेवण  आपल्याकडं गावोगावी दरवर्षी ग्रामदैवताच्या  यात्रा दोन दिवस आयोजित करण्याचा प्रघात आहे.काहीजण या दोन दिवसांना काही ठिकाणी ताजी व शिळी यात्रा तर काही ठिकाणी भर व फूट यात्रा संबोधतात.ताज्या यात्रेला देवाच्या सवाष्णि असतात.पुरळपोळीचा बेत घरोघरी असतो.देवाचा त्या दिवशी छबिना असतो... सगळे परगावी असणारे गावकरी गावाकडे आलेले असतात.सासुरवाशिनी माहेराला आलेल्या असतात.इतरही सगेसोयरे, मित्रमंडळी आणि पाहुणेरावळ्यांचेही आगमन झालेले असते.त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते.. यात्रेच्या दुसऱ्या   दिवशी चिकन आणि मटणाचा  सामिष जेवणाचा बेत शिजत असतो. काहीजणांच्या गोतावळा  मोठा असल्यामुळे आख्खं बकर किंवा बोकडाचा बेत केलेला असतो.घराबाहेर  दगडवीटांची चूल मांडून त्यावर पातेलं किंवा तपेलं ठेवलेलं असतं.हळदमीठ लावलेलं, कांदा लसूण आणि आल्याच्या फोडणीचं मटाण तेलात परतून पातेल्यात शिजत घातलेलं असतं.त्याचा घमघमाट सगळीकडे सुटलेला असतो. नुसत्या तेलातल्या वाफेवर पहिल्यांदा व...

मैत्री टूर लवासा माऊंटन लेक सिटी भाग क्रमांक-१४५

Image
🦋🍁🌿💫🦋🍁🍀    मैत्री टूर  भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी २२ नोव्हेंबर २०२० माझी भटकंती भाग क्रमांक-१४५  क्रमशः भाग क्रमांक-४ 〰️〰️〰️〰️〰️〰️ वरसगांव धरण व लवासा माऊंटन लेक सिटी  🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁 लवकर सकाळी उजाडताना दिसणारे निसर्ग सौंदर्य बघायला कॉटेजच्या बाहेर पडलो.लॉन वरुन चालत चालत फेरफटका मारायला सुरुवात केली.सकाळच्या प्रहरी विहंगम दृश्य बॅंक वॉटरचे दिसत होते.पुर्वेला आभाळाला लाली आली होती.अथांग शांत निळेशार पाणी, मधूनच पाखरांची किलबिल कानावर पडत होती.पल्याडच्या डोंगरांचे विहंगम दृश्य नजरेत भरत होते.पाण्यावरुन येणारा हलका गार वारा शरीराला स्पर्शून गारवा देत होता.डोंगर झाडीचे जलाशयातील प्रतिबिंब मनाला भुरळ घालत होते.या सकाळच्या प्रहरातील चेतना देणारं उत्साहवर्धक वेचक दृश्य मोबाईलमध्ये साठवण्याची लगबग सुरू होती.हळू हळू लालसर आभाळाची जागी सोनेरी प्रकाश किरणात आसमंत आणि सृष्टी न्हाहून निघत होती.अप्रतिम बहारदार नजारा छायाचित्रात साठविला. निसर्गनिर्मित दृश्याला साजेशी सजावट निसर्ग लेक व्ह्यूची नजरेत भरत होती.मऊ लुशलुशीत लॉन,रंगीबेरंगी फुलझा...

मैत्री टूर वरसगांव धरण परिसर भाग क्रमांक-१४४

Image
🦋🍁🌿💫🦋🍁🍀   मैत्री टूर  भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी 💫🦋💫🦋💫🦋💫 २१ नोव्हेंबर २०२० माझी भटकंती भाग क्रमांक-१४४ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ क्रमशः भाग क्रमांक-३         वरसगांव धरण प्रवास ------------------------------------    कल्याणी धाब्यावरुन निघालो पुढं नसरापूर टोलनाका पास करुन खेडशिवापूर आल्यावर गाडीनं डावीकडचा सिंग्नल दिल्यावर खेडशिवापूर गावातून किल्ले सिंंहगडाकडे मार्गस्थ झालो. थोड्यावेळात गड भ्रमंती करण्याचा कयास मनात ठेवला होता पण काय घाट. शुभारंंभीच्या चेकपोस्टजवळ रस्ता बंद केला होता.लॉकडउनमुळे गडावर जाण्यास प्रवेशबंदी असल्याने रस्ताही बंद होता.रिटर्न घेऊन पुन्हा हायवेला यायला लागलो.धायरी फाट्यावर लेफ्ट टर्न घेऊन सिंहगड रस्त्यानेखडकवासला धरणाच्या कडेकडेने निघालो.. एव्हाना सायंकाळ होत आली होती.चहाची तलफ सगळ्यांना झाली होती.मग छोटेखानी "एकदा चहा प्याल तर पुन्हा पुन्हा याल" अशी खासियत असणारा खानापूर येथील बोर्ड बघून सारथ्यांनी गाड्या थांबविल्या.गुजराती चायवाला होता.त्याच्या पत्नीने कडकमिठा चहा बनविला.लज्जतदार मसाला चहाच...

मैत्री टूर नेकलेस पाॅंईट भाग क्रमांक-१४३

Image
🦋🍁🌿💫🦋🍁🍀                   मैत्री टूर  भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी २१ नोव्हेंबर २०२० माझी भटकंती भाग क्रमांक-१४३  〰️〰️〰️〰️〰️〰️ **भाटघर धरण व नेकलेस पाॅंईट ** क्रमशः भाग क्रमांक-२ ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️  काही वेळाने आम्ही घाटमाथ्यावर आल्यावर डावीकडून दुसरा घाट उतरायला सुरुवात केली.आंबाडे खिंडीपर्यंत हा घाट तीव्र उताराचा आहे. पुढे यु वळणावर थोडंसं थांबून दोन  जिल्ह्यांना सांधणाऱ्या घाटातल्या वाटेवर कृष्णा आणि निरा नद्यांच्या खोऱ्याच्या सीमेवर तर वाई सुभा आणि भोर संस्थानाच्या सीमारेषेवर उभारलो होतो.कारवीची बन आणि करवंदाच्या जाळ्या दाटीवाटीने दिसत होत्या.जणूकाही डोंगराच्या कॅनव्हासवर गवताचे लॉन जागोजागी लावलेले आहे.पायथा, घेऱ्यावर आणि डोंगर रांगांच्या सोंडेवर असणारी गर्द झाडीत लपलेली गाव ,वाडीआणि वस्त्या (पेडा,पाळी,टोंग) दृष्टिस पडत होत्या.थोडावेळ तिथंच रेंगाळत हा नजारा नजरेखाली घेऊन, फोटोग्राफी करुन घाट उतरत उतरत भोरकडे निघालो.कारण भोर जवळील दोन्ही जिल्ह्यांची जिवनदायनी निरा नदीवरील इंग्रजांच्या काळातील भाटघ...

मैत्री टूर वरसगाव व लवासा भाग क्रमांक-१४२

Image
🦋🍁🌿💫🦋🍁🍀 मैत्री टूर वरसगाव धरण बॅकवॉटर  🦋🍁🌿💫🦋🍁🍀 मैत्री टूर वरसगाव धरण बॅकवॉटर  २१ नोव्हेंबर २०२० माझी भटकंती भाग क्रमांक-१४२  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ मालवाठार मांढरदेव घाट   क्रमश:भाग क्रमांक-१  _______________________ आमची अॅमिक्यॅबिलीटी  मित्रांच्या ग्रुपची सफर निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती  करायला वाईतून सकाळीच  निघाली.प्रशांत आणि राहुलची गाडी दिमतीला होती.बऱ्याच वर्षांनी आमचा एक मित्रही सोबत होता.  बोपर्डी मार्गे मांढरदेव घाटाकडे निघालो.पांडवगडाचा लांबून दिसणारा नजारा खिडकीतून न्याहाळत आणि ऐंशीच्या दशकातील सुरेल श्रवणीय हिंदी गाणी ऐकत नेहमीच्याच घाटातून प्रवास करित होतो.घाट चढून मालवाठार भागात पोहोचलो तरीही मागची प्रशांतची गाडी दिसत नव्हती म्हणून शिवाजीला फोन करून विचारले.प्रशांतचे मालाज फॅक्टरीतले काम अजून झाले नाही त्यामुळे आम्ही अजून एमआयडी सीतच आहोत.मग 'ते येईपर्यंत आपण मालवाठार येथून दिसणारा धोम धरणाचे विलोभनीय दृश्य पाहूया,' असे म्हणून गाडी साइडला राहुलला थांबवायला लावली. भास्कर, सुनील, राहुल आणि मी खाली उतरून जाताना डाव्या बाज...

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१४१

Image
🍁🍂☘️🌿🍂🍁 छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग क्रमांक-६ माझी भटकंती भाग क्रमांक-१४१ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालय पोसेवाडी ता. खानापूर जि.सांगली संग्राहक श्री भगवान जाधव  📷📼💿☎️⏰⌛🔦⚔️    परतीच्या वाटेवरील तालुक्याच्या ठिकाणा पासून जवळच असणा-या तीन एक किमीवरील पोसेवाडी संग्रहालयाकडे आम्ही निघालो.मोबाईलवरुन संपर्क साधला.त्यांनी बसस्थानकासमोर थांबा मी तुम्हाला घ्यायला येतो.असं सूचित केले.तदनंतर थोड्याच वेळात सफारी परिधान केलेली व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून आमच्या गाडीजवळ आली.आदबीने स्वागत करुन त्यांच्याच इशाऱ्यावर आमच्या दोन्ही गाड्या थोड्याच वेळात कच्च्या रस्त्याने संग्रहालया जवळ आल्या.नुकतेच बांधकाम केलेला सुबक बंगला होता.या संग्राहकाने आपल्याच घरालाच संग्रहालय बनविले होते.संग्रहालयातील चीजवस्तूंच्या मांडणीचं काम चालू होते. सभागृहातील समोरील भिंतीवरची शोकेस गौरवशाली  सन्मानचिन्हांनी व सन्मान पत्रांनी ओसंडून वाहत होती.यावरुनच या संग्रहालयाचा द...

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१४०

Image
🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. 〰️〰️〰️〰️〰️ क्रमशः भाग क्रमांक ५ माझी भटकंती भाग क्रमांक-१४० ################ श्री रमेश जावीरकाष्ठशिल्प व चित्रसंग्रहालय खरसुंडी ता. आटपाडी जि.सांगली  🦋🍀🦋🍀🦋🍀💫         श्री सिध्दनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे श्री रमेश जावीर सरांची उत्कटतेने वाट बघत होतो.मंदिराच्या दर्शनी बाजूस श्री सिद्धनाथ भक्तगण तुरळक प्रमाणात दिसत होते.विशेषतः नवविवाहित दांपत्य कुलदैवताच जोडीनं दर्शन घेण्यासाठी आलेले होते. संसाराच्या  प्रारंभी शुभाशिर्वाद घेण्याची मनोकामना पूर्ण करीत होते.सर्वांच्या मनात काष्ठ शिल्पाचा जादुई किमयागार कधी भेटतोय असं झालं होतं.तेवढ्यात जावीर सर समोरुन चालत येताना आमच्या नजरेस पडले.साधी राहणी उच्च विचार सरणी असं आदरणीय व्यक्तिमत्त्व असणारे श्री रमेश जावीर सर आज प्रत्यक्ष भेटले.सर्वांशी हस्तांदोलन व राम राम करत परिचय झाला.प्रवास कसा झाला याची विचारपूस केली. मार्गदर्शक दीपक चिकणे सरांनी मस्तच रमत गमत भ्रमंती झाल्...

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३९

Image
  🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗ लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग -४  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️माणदेशी भागातून निघालो होतो.रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शिवारात रब्बीची ज्वारी रोपट्यात दिसत होती.काही ठिकाणी उसाचे क्षेत्रही दिसत होतं.पंधरा-वीस मिनिटांनी पळशी गाव पास करून पुढे आल्यावर उजवीकडे एकाच  टेकडीवर असणारा भूषणगड नजरेस पडला.गडावर जाणारी गाडीची वाट गर्दझाडीच्या ओळीमुळे  काहीअंशी दिसत होती.तेवढ्यात उध्दवने पूरक माहिती दिली,' मुख्य दरवाजापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो.' लगेच मी अमितला मोबाईलवरुन भेटीला जाण्याचा इरादा विचारताच त्यांच्याही गाडीत गडावर जाण्याचं बोलणं सुरु होतं. मग काय भूषणगडावर जाण्याचं शिक्कामोर्तबच झालं.थोडं पुढं गेल्यावर गावाकडे जाणारा रस्ता दिसताच राईट टर्न घेऊन भूषणगड गावात आलो.गाडीवरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहकाला गडाचा रस्ता विचारला.त्याने गाडीवाट वरती बंद केलीय.गडावर जायचं असेल तर पायऱ्यावरुन जावा,पण दरवाजा पर्यंतच जाताल.असं ऐकल्यावर थोडा विरस झाला.तरीही पुढं गेलोच.पार्किंग स...

छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३८

Image
🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी..... दिनांक  १० नोव्हेंबर २०२० 🍁ग्रेटभेट ❗लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग -३ माझी भटकंती भाग क्रमांक-१३८ 〰️〰️〰️〰️〰️〰️  श्री राजेन्द्र गुरव सर छांदिष्ट्य समुहातील एक अवलिया प्रसन्न आणि हसरे  व्यक्तिमत्व .त्यांनी दिल खुलासपणे आमचे स्वागत केले. सर्वांची ओळख आयोजक केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे सरांनी करुन दिली.परिचितांशी गळाभेट आणि नुकतीच ओळख झालेल्या मित्रांशी हस्तांदोलन करत ,आस्थेने संवाद साधायला सुरुवात केली.मग त्यांच्याच मागोमाग औंध निवासिनी यमाईदेवीच्या डोंगरावरील देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेकडे गेलो.दगडी तोडीची बांधिव पायऱ्यांची पायवाट होती. दुतर्फा सिताफळ व इतर वृक्षांची दाट सावलीतली वाट होती. तनमनाला शीतल गारवा देणारी वाट.आम्ही त्यावरच बैठक मारली.मग गुरव सरांनी पिशवीतून थर्मास आणि बिस्कीट पुडे काढले. आमचं आदरातिथ्य करायला घरुनच चहा बनवून आणला होता.प्लॅस्टिक कपात चहा भरुन सर्वांना दिला. बिस्कीटे घेण्याचाही आग्रह करत होते.तेवढ्यात श्री संतोष शिंदे सरांच्या लक्षात आले की घरुन आणलेल्या डब्यात ...